झोप आणि स्वप्ने झोप ही माणसाची मानसिक आणि शारीरिक गरज आहे. वयाप्रमाणे झोपेचा कालावधी हळू हळू कमी होत जातो. वृध्द माणसांना अगदी 2-4 तास झोप पुरते तर लहान बाळे दिवसाच्या 24 तासांपैकी बहुतेक वेळ झोपून काढतात. झोपेचा वैद्यकशास्त्राने सखोल अभ्यास केला आहे. त्यात उथळ आणि गाढ झोप अशा अवस्था आळीपाळीने येत राहतात असे दिसून येते. याचा अंदाज डोळयांच्या हालचाली आणि मेंदूचा विद्युत आलेख यावरून करता येतो. उथळ झोपेच्या अवस्थेत डोळे थोडया जोरजोरात फिरत/हलत राहतात. गाढ झोपेत डोळयांची हालचाल मंद होते. स्वप्ने पडतात उथळ झोपेच्या अवस्थेत.
स्वप्ने सर्वांनाच आणि रोज पडतात, फक्त बहुतेक वेळा ती आठवत नाहीत. म्हणून काही जणांना वाटते की त्यांना स्वप्नच पडत नाही. स्वप्नांचे विषयही सहसा ठरावीक असतात. बहुतेक स्वप्ने पाऊल चुकून खड्डयात पडणे, तोल जाणे, साप दिसणे,इ.असतात. यामागे प्राणिजीवनातले उत्क्रांतीतले अनुभव असतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही स्वप्ने दैनंदिन जीवनातल्या जास्त जाचक किंवा आनंददायक अनुभवाशी निगडित असतात.
स्वप्न आणि भविष्य याचा काही संबंध नसतो. पण काही लोकांना दूर किंवा भविष्यात होऊ घातलेल्या घटनांची कल्पना येते असा दावा केला जातो. हे 'सहावे इंद्रिय'किती खरे मानायचे हा प्रश्नच आहे. कारण पुढे घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या असतात असे मानणे बरेच अशास्त्रीय आहे. मात्र काही संभाव्य घटनांची चित्रे त्या दृष्टीने संवेदनाक्षम व्यक्तीच्या मनात येऊ शकतात हे खरे. त्यापैकी नंतर ख-या ठरलेल्या गोष्टींचा उल्लेख होतो आणि खोटया ठरलेल्या विसरल्या जातात हेही लक्षात ठेवले पाहिजे. अशी अंधश्रध्दा ही एक मानसिक समस्याच आहे.
दिवास्वप्न पाहणे (म्हणजे मनाने स्वप्न रचत राहणे) हा प्रत्येक निरोगी माणसाचा स्थायीभाव आहे. बहुतेक माणसे दिवसाचा बराच 'मोकळा वेळ' दिवास्वप्ने रचण्यात घालवतात असे दिसून आले आहे. यात काही गैर नाही.
अंधश्रध्दा हा एक मानसिक दुबळेपणा आहे. मागास व अशिक्षित समाजाचे हे एक वैगुण्य आहे. भारतीय समाजात तर सुशिक्षित माणसेही त्याला बळी पडतात. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दलचा वाद तर कायमच चालू असतो. देवधर्मकल्पनेशी त्याची फार सांगड असते.
अंधश्रध्देची अनेक उदाहरणे आहेत; काही सौम्य तर काही घातक व भयंकर आहेत.
आपल्यालाही अशी अनेक उदाहरणे माहीत असतील. हिंदू धर्मात अशा अंधश्रध्दांचा विशेष पगडा आहे. विज्ञान आणि शिक्षणाने आपण हा अंधश्रध्दांचा नायनाट केला पाहिजे. अंधश्रध्दाविरोधी कायदा लवकरच येणार आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्...
मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम कर...
अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी ...