অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गंभीर मानसिक आजार

भ्रमिष्टावस्था, दुभंग व्यक्ती

सर्वसाधारणपणे ज्याला 'वेड' म्हणता येईल असा हा आजार. यांत मनोरुग्णाला स्वतःला व इतरांना पुष्कळ त्रास होतो.उपचार न केल्यास वर्षानुवर्षे हा आजार चालूच राहतो. याची सुरुवात 15-25वयोगटात होते आणि कधीकधी एखाद्या घटनेतून अचानक सुरुवात होते. हा आजार आनुवंशिक असू शकतो. यात मुख्य म्हणजे विचारशक्ती,जाणीव व भावना यात गोंधळ होतो. त्यामुळे वागणे, बोलणे, कृती हे सर्व बिघडते. अशा व्यक्तींच्या मनात अयोग्य कल्पना व विचार घर करून बसतात (ग्रह), नसलेल्या गोष्टी जाणवतात (भ्रम),आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा संबंध तुटतो आणि नेहमीच्या घटनांबद्दल वेगळा (चुकीचा) अर्थ लावला जातो. उगीचच खूप आनंद किंवा दुःख किंवा पूर्ण अलिप्तता, इतरांना न समजणारे बोलणे-वागणे,अतिशय बडबड किंवा कमी बोलणे, मौन, स्वतःशीच हसणे-बोलणे, अस्वस्थ किंवा अगदी स्वस्थ, कधी एकदम आक्रमक, शिवीगाळ करणे, विचित्र स्थितीत बराच वेळ राहणे, (उदा. गुढघ्यात मान घालून तासनतास बसून राहणे.), इत्यादी विविध पैलू दिसून येतात. अशा व्यक्तींनी आत्महत्या करणे, इतरांना इजा करणे हे शक्य आहे, पण असे होईलच असे नाही. अशा व्यक्तींना ब-याच वेळा इतर लोक बांधतात, कोंडतात किंवा हाकलून देतात. पण अशा रुग्णांनाही औषधोपचारांनी खूप उपयोग होतो. मात्र नातेवाईकांनी चिकाटी, संयम, सहनशक्ती दाखवून उपचार चालू ठेवणे आवश्यक असते.

उदाहरणे

सायबू हा गेली दोन-तीन वर्षे आमच्या गावात आलेला 16-17 वर्षाचा मुलगा आहे. कोठून आला माहीत नाही पण तो कधीच कपडे घालत नाही, कोणी घातले तर काढून टाकतो. बाजारात दुकांनामधून किंवा हॉटेलमधून अन्नपदार्थ पळवणे व खाणे एवढेच त्याचे दिवसभराचे काम. लघवी, संडास, इत्यादींबद्दल त्याला कसलाही नियम नाही. यासाठी तो ब-याच वेळा लोकांकडून मार खातो व रडतो. कधी तो दिवसभर पारावर गप्प बसून राहील नाहीतर हसतच सुटेल. त्याचे बोलणे कोणालाही समजत नाही. त्याला आतापर्यंत कोणीही घ्यायला आला नाही . 'ठार वेडा' म्हणून घरच्यांनी त्याला सोडून दिलेला दिसतो. पार्वती गेली 20-25 वर्षे या गावात दिसते. खूप बडबड, लोकांच्या अंगावर धावून जाणे, हसत सुटणे, कपडयांची शुध्द नसणे, काहीतरी हातवारे करणे, कोठेही झोपणे वगैरे गोष्टींमुळे ती 'वेडी पार्वती' म्हणून ओळखली जाते. खूप त्रास द्यायला लागली तर आजूबाजूचे लोक तिला बांधून घालतात, शांत झाली, की सोडून देतात. शंकर हा दिवसभर फक्त 'माझी जमीन घेतली ती परत द्या', असे ओरडत फिरतो. गेली चार-पाच वर्षे तो एवढेच करतो. ब-याच वेळा जमिनीवर डोके आपटून घेतो. रात्री दोन-तीन मैलांवरच्या त्याच्या गावी जाऊन झोपतो. सकाळी परत कचेरीसमोर ओरडायला सुरुवात करतो.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate