चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र हे छोट्याशा खोलीत 2000 साली कार्यरत झाले. अपूर्ण जागा, अपूर्ण यंत्र सामग्री व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत होती. अनेकदा त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत वृत्तपत्रातून टिका-टिपणी देखील होत असे. मात्र होत असलेल्या टिकेमुळे विचलित न होता ही टिका सकारात्मक घेत जागेबाबत, यंत्रसामग्रीसाठी प्रयत्न करत असलेले आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश पाटील यांनी वरिष्ठांकडे व ग्राम पंचायतीकडे पाठपुरावा सुरू ठेवला. त्यात त्यांना अखेर यश मिळाले.
ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. या जागेवर नवीन इमारत बांधकामास सुरुवात झाली. 2013 मध्ये ही इमारत पूर्णत्वास आली. 26 जानेवारी 2013 या दिवशी आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले. स्थलांतरीत होऊन कार्यान्वित झाले तरी विजेचा, पाण्याचा यासह आवश्यक सुविधांची वाणवा होती. पातोंडा आरोग्य केंद्र हे आय.एस.ओ. झाल्यानंतर जि.प. मुख्याधिकारी श्री.पांडे यांनी जिल्ह्यात आणखी 20 आरोग्य केंद्र आय.एस.ओ. झाले पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली. त्यातून प्रेरणा घेत आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आपले तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्र ही आय.एस.ओ. व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले.
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विजेचा मार्गी लावला. कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने आरोग्य केंद्रास कुपनलिका भेट दिली. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक असलेला पाणी प्रश्न सुटला. कल्याणमल चोरडिया या दात्याने रुग्णांना थंड पाणी पिण्यासाठी वॉटर कुलर भेट दिले. रोटरी क्लब व इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव या समाजसेवी संघटनेच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करणारे आर.ओ.वॉटर प्लांट व कॅन्सर संबंधी, बेटी बचावविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदान केले. सर्व कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून परिसर शोभिवंत केला.
1 जुलै 2015 पासून आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वीत करण्यात आले. आजपर्यंत 100 च्या वर शस्त्रक्रिया तर, 70 च्या वर प्रसुतीदेखील तेथे करण्यात आल्या आहेत. आय.एस.ओ. च्या प्रतिनिधींनी या केंद्रास जवळपास 5 ते 6 वेळेस अचानक भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची तपासणी केली व त्याबाबतचा अहवाल त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयास कळविला. त्या अहवालानुसार 24 तास चांगली रुग्णसेवा, शुद्ध पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड या मुद्यांवर या केंद्राला आय.एस.ओ. मानांकन देत असल्याचे घोषीत केले.
या केंद्रात 14 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रास आय.एस.ओ. मानांकन मिळाले आहे. यापुढे देखील दर्जेदार रुग्णसेवा देत राहू, असा संकल्प कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव, मो.नं. ७५८८६४६७५०
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...