क्षयरोगास कारणीभूत असलेला जीवाणू मायक्रोबॅक्टेरीयम ट्यूबरक्लोसीस हा आपला खरा शत्रू. याविरुद्धचा लढा 1960 पासून सुरु आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व नंतर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सातत्त्याने निदान व उपचाराचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला जात असूनही आतापर्यंत मानवाला अंतिम विजय प्राप्त झालेला नाही. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन...याविषयी.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार भारतामध्ये 1990 साली रुग्णसंख्या दर (प्रिव्हालन्स) हा एक लाख लोकसंख्येत 583 होता. तो आज घडीस 250 पेक्षा कमी झाला आहे, म्हणजे 50 टक्केपेक्षा जास्त रुग्ण कमी झाले आहेत, ही चांगली बाब आहे.
परंतु अजूनही नियंत्रण खूप दूर आहे. याचे कारण आपल्यासारखाच आपला शत्रुदेखील हुशार आणि शक्तीशाली आहे. आज आपण बघुया ह्या मायक्रोबॅक्टेरीयमचे दुर्गुण, ज्यामुळे आपला लढा लांबत आहे.
क्षयरोग (टीबी) झालेला रुग्ण जेव्हा खोकतो तेव्हा त्याच्या खोकल्याद्वारे असंख्य तुषार हवेत उडतात. त्यामध्ये स्थिरावलेले क्षयरोगाचे जंतू (अंदाजे 50,000) एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे मार्गक्रमण करतात. जर खोकताना तोंडावर, नाकावर रुमाल, कापड, मास्क लावला तर हवेत वेगाने प्रवेश करणाऱ्या जंतुची संख्या एकदम अल्प होते व दुसऱ्या व्यक्तीला होणारा धोका टळतो. हा जीवाणू हवेद्वारे शरीरात फुफ्फुसांच्यामार्गे प्रवेश करतो. हवेतील अनेक सूक्ष्म जंतू श्वासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात. ज्या जीवाणूचे आकारमान 0.5 मायक्रॉन आहे, ज्यामुळे तो प्रवेश घेतो परंतु बाहेर येऊ शकत नाही. तो मानवाच्या फुफ्फुसामध्ये राहतो. याला आपण संसर्ग झाला असे म्हणतो, भारतात एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोक याप्रकारे संसर्गित आहेत.
रोज अनेक प्रकारचे जीवाणू-विषाणू शरीरात शिरतात. परंतु शरीराची रोग प्रतिकारक शक्ती असणारे पेशी गट त्यांचा नायनाट करतात. पण मायक्रोबॅक्टरीयम टीबीच्या जिवाणूवरील स्निग्ध आवरण मात्र त्याचा बचाव करते. हा जीवाणू हळू-हळू संख्येत वाढू लागतो. रोगप्रतिकार शक्ती चांगली असली तरी तो मरत नाही, पण सुप्त अवस्थेत जातो व ज्या वेळेस मानवाची प्रतिकारशक्ती कमी होते त्या वेळेस पुन्हा वाढीस लागतो व क्षयरोग होतो.
आज आपल्या जवळ क्षयरोगाच्या उपचारासाठी जवळपास 15 प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु यातील फक्त 5 औषधेच हे खऱ्याअर्थाने कार्यक्षम आहेत. जसे आय.एन.एच., रिफॅमपीसीन, पायरीझीनामाईड, स्ट्रेप्टोमायसिन व इथेम्बुटॉल. या औषधी जर एकाच वेळी म्हणजे उदा. 4 गोळ्या किंवा 4 गोळ्या व इंजेक्शन दिवसातून एकदाच सोबत घेतल्या तरच त्याचा चांगला परिणाम मिळतो. टीबीची औषधे सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे इतर आजारांच्या औषधी सारखी घेतली तर परिणामकारक राहत नाही. जिवाणू मरत नाही.
औषधी अनियमित, किंवा 6-8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी घेतली की, क्षयरोगाचे जंतू स्वत:मध्ये बदल करुन घेतात व नंतर पुन्हा वाढतात. मात्र यावेळीच वरील 5 औषधींना ते दाद देत नाही, यालाच एमडीआरटीबी (मल्टी ड्रग रेसिस्टेंट टीबी) असे म्हणतात.
सर्व जीवाणू विभाजन गुणाकर पद्धतीने वाढतात. इतर जीवाणू हे लवकर 15 मिनिटात एकाचे दोन उदा. ई कोली विभाजन पद्धतीने वाढतात. पण क्षयरोगाचे जीवाणू 18 तासानंतर विभाजन पद्धतीने वाढत असल्यामुळे याचा उपचार देखील 6 ते 8 महिने घ्यावा लागतो.
क्षयरोगाच्या जंतुच्या अनेक विविध जाती असून त्यामध्ये बदल होतात. सध्या भारतामध्ये असलेल्या जीवाणूचे पूर्वज हे 40 हजार वर्ष आधीचे आहे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. हा मायक्रोबॅक्टेरीयम ट्युबरल बॅसीला उपजतच शक्तीशाली आहे. सुप्त अवस्थेतही कितीही वर्ष मानवाच्या शरीरात तो राहु शकतो. रुग्णाने औषधे सुरु केल्याबरोबर तो स्वत:मध्ये बदल घडवू लागतो, अनियमित औषध झाल्याबरोबर तो एमडीआर हे नवे रुप धारण करतो. अशा या शक्तीशाली आणि हुशार शत्रुसोबत लढण्याचे शस्त्र म्हणजे आरएनटीसीपी या सुधारित राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करणे. खासगी डॉक्टरांनी देखील आरएनटीसीपी प्रमाणेच उपचार करणे व प्रत्येक क्षयरुग्णाची माहिती शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
रुग्णांनी खोकताना नेहमी तोंडावर रुमाल ठेवल्यास क्षयरोगाचा प्रसार थांबू शकतो व नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग हा हमखास बरा होतो. ही लढाई आता जिंकायची आहे.
डॉ. दिलीप देशमुख वैद्यकीय अधीक्षक, अमरावती
माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, २३ मार्च, २०१५.
अंतिम सुधारित : 1/30/2020
न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष ह...
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
प्रत्येक क्षय रुग्णांपर्यंत पोहचूयात, मिळून सगळे ए...
लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूं...