न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष होतो. हा जंतुदोष फुप्फुसांच्या दुपदरी आवरणापर्यंत पोचला तर या आवरणासही जंतुदोष होतो. निरोगी अवस्थेत या दुपदरी आवरणात थोडा द्रव असतो. फुप्फुसाच्या हालचालीस असे आवश्यक असते. जंतुदोषामुळे यात पाणी, पू होतो. यामुळे त्या भागातल्या फुप्फुसाची हालचाल कमी होते व श्वसनाला अडथळा येतो. क्ष किरण चित्राने याचे चांगले निदान होऊ शकते.
लक्षणे-तपासणी
छातीच्या संबंधित भागात दुखते व दम लागतो. जंतुदोषामुळे ताप आणि थकवा जाणवतो. या भागात बोटाने ठोकल्यावर 'ठक्क' असा (घट्ट) आवाज येतो. आवाजनळीने तपासल्यावर श्वसनाचे आवाज त्या भागात अजिबात ऐकू येत नाहीत.
उपचार
या रोगावर तज्ज्ञ डॉक्टरच उपचार करू शकतात. पाणी खूप असेल तर दम लागतो. अशा वेळी सुई टोचून पाणी काढून टाकणे आवश्यक आहे.
पू असेल तर छातीतून पू काढून टाकण्यासाठी छोटी नळी बसवावी लागते. यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागते.
जंतुदोष आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती जंतुविरोधी औषधे देण्यात येतात. जोपर्यंत जंतुदोष आटोक्यात येत नाही तोपर्यंत पाणी, पू जमतच राहील. बहुधा अशा आजाराचे क्षयरोग हेच कारण असते.