औषधिक्रियाविज्ञान
अन्नद्रव्याखेरीज इतर बाह्य पदार्थ शरीरात दिले गेल्यास त्यांच्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास आणि विवेचन करणाऱ्या वैद्यकशास्त्राच्या विभागाला औषधिक्रियाविज्ञान असे म्हणतात. अशा बाह्य पदार्थांना औषधी असे म्हणतात. परंतु व्यवहारात मानव व इतर प्राणी यांच्या रोगांचा प्रतिबंध, निदान, उपशम आणि उपचार यांकरिता वापरण्यात येणाऱ्या पदार्थांनाच औषधी (औषध) ही संज्ञा वापरतात.
या व्याख्येप्रमाणे अन्नद्रव्यांचा अभ्यास या शास्त्रात होत नाही; तसेच, शरीरातच उत्पन्न होणाऱ्या प्राकृत (सर्वसामान्य) अथवा विकृत पदार्थांचा अभ्यासही या शास्त्रात होत नाही. उदा., इन्शुलीन, थायरॉक्सिन वगैरे पदार्थ शरीरातच उत्पन्न होतात व त्यांचे प्रमाण अनेक रोगांत कमीजास्त होऊ शकते. त्यांच्या संबंधीचा विचार शरीरक्रियाविज्ञान (प्राणिशरीरात घडणाऱ्याक्रियांचा अभ्यास करणारे विज्ञान) आणि विकृतिविज्ञान (रोगाचा उद्गम, स्वरूप व प्रसार यांच्या अभ्यासाचे विज्ञान) या वैद्यकशास्त्र विभागांत होतो.
वैद्यकशास्त्राच्या इतरही अनेक विभागांचा औषधिक्रियाविज्ञानाशी निकटचा संबंध आहे. जीवरसायनशास्त्र, शरीरशास्त्र वगैरे शास्त्रांप्रमाणेच भौतिकी आणि रसायनशास्त्र यांचाही या विज्ञानाशी संबंध येतो; किंबहुना औषधिक्रियाविज्ञान हे जीवशास्त्राचेच एक अंग आहे.
या शास्त्रात शरीरातील घटकद्रव्ये आणि औषधिद्रव्ये यांच्या एकमेकांवर होणाऱ्याआंतरक्रियांचा अभ्यास व विचार केला जातो. या दोहोंचा एकमेकांवर परिणाम झाल्यामुळे घटकद्रव्याप्रमाणेच औषधिद्रव्यामध्येही बदल होत असतो. पुष्कळ वेळा औषधींची क्रिया, त्यांचे परिणाम आणि फल यांमध्ये भेद करता येत नाही.
औषधिक्रियाविज्ञानाचे दोन मुख्य विभाग कल्पिले आहेत : (१) सामान्य औषधिक्रियाविज्ञान आणि (२) विशिष्ट औषधिक्रियाविज्ञान. विशिष्ट औषधांचा शरीरातील विविध तंत्रांवर (संस्थांवर) होणाऱ्या परिणामाचे वर्णन विशिष्ट औषधिक्रियाविज्ञान या विभागात करण्यात येते.
इतिहास
औषधिक्रियाविज्ञान हे मानवाइतकेच जुने आहे. अगदी आरंभापासून मानवाला अनेक आपत्तींशी झगडावे लागले; त्यांतच रोगांची गणना होते. रोगांवरील उपायांचा शोधही तेव्हापासूनच सुरू झाला. काही पदार्थ, विशेषतः वनस्पती, शरीरपोषणास उपयुक्त आहेत असे आढळले; त्यांचा अन्नात अंतर्भाव झाला. काही पदार्थ विपरित परिणाम करणारे आढळले; त्यांचा विषात अंतर्भाव झाला; तर काहींमध्ये रोगनिवारणाचे गुण आढळले. अशा पदार्थांची संख्या हळूहळू वाढत गेली व त्यां त खनिज आणि प्राणि ज पदार्थांची भर पडत गेली. हे पदार्थ वापरणारांचा पुढे एक वर्ग उत्पन्न झाला. पुढे लेखनकला अवगत झाल्यानंतर अशा औषधिद्रव्यांच्या याद्या तयार होऊ लागल्या. अशा याद्या आणि शिलालेख बॅबिलन देशात विटांवर लिहिलेले सापडलेले आहेत. ईजिप्त देशात अतिप्राचीन अशा पपायरसातही (पपायरस नावाच्या वनस्पतीपासून तयार केलेल्या विशिष्ट पदार्थांवर केलेल्या लिखाणातही) अशा याद्या आढळतात. इसवी सनापूर्वी लिहिलेल्या भारतातील चरक-सुश्रुतादींच्या प्राचीन ग्रंथांतही अशा द्रव्यांचे वर्णन आढळते. इ. स. चवथ्या शतकातील वाग्भटांच्या अष्टांगहृदय या ग्रंथातही अनेक औषधिद्रव्यांची नावे, स्वरूप, आणि क्रिया यांचे वर्णन आढळते. त्यानंतरच्या काळात औषधिद्रव्यांच्या याद्या देणारे अनेक ‘निघंटु’ या नावाने लिहिलेले ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. सुश्रुतसंहितेत सु. ७०० औषधांची नावे दिली आहेत, तर वाग्भटांनी सु. ४०० वनौषधींचा उल्लेख केला आहे. इ. स. पू. सु. ३,००० वर्षे चीनमध्येही एक औषधिसंग्रह रचिला गेला. त्यातील सु. १०० औषधांपैकी कापूर, एफेड्रा, रुबार्ब ही औषधे आजही प्रचारात आहेत. इ. स. पू. सु. ४६० या वर्षी जन्मलेल्या हिपॉक्राटीझ या प्रख्यात ग्रीक वैद्यांनी व त्यां च्या शिष्यांनी सु. २३६ औषधांचा उल्लेख केलेला आहे. इ. स. पहिल्या शतकातील डायस्कॉरिडीझ यांनी आपल्या ग्रंथात सु. ५०० औषधांचे वर्णन केलेले आहे. हाच ग्रंथ युरोपात १,०००–१,२०० वर्षे आधारभूत मानला जाई. ग्रीक व रोमन साम्राज्ये नष्ट झाल्यावर तेथील विद्वान मंडळी अनेक देशांत विखुरली. त्यांपैकी कित्येक इस्तंबूल, बगदाद व इराण येथे जाऊन तेथे त्यांनी ग्रीक ग्रंथ नेले व त्यांचे अरबी भाषेत भाषांतर केले. अरबांचे व्यापारी दळणवळण चीन, हिंदुस्थान वगैरे देशांशी असल्यामुळे त्या त्या देशातील बऱ्याच औषधांची त्यांना माहिती मिळाली, इतकेच नव्हे तर चरक-सुश्रुतादी ग्रंथांची त्यांनी अरबी भाषेत भाषांतरेही केली. या सर्व ग्रंथसंपत्तीतील ज्ञानाचा आणि स्वानुभावाचा परिपाक म्हणून अनेकांनी ग्रंथ लिहिले. त्यात इब्न सीना (अॅव्हिसेना) यांचा अल-कानून हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध असून त्याचे लॅटिन भाषांतर अनेक शतके पाठ्यपुस्तक म्हणून युरोपात वापरले जाई.
स्त्रोत: मराठी विश्वकोश