हल्ली आपण कॉम्प्युटर (संगणक) बद्दल ऐकतो. मानवी मेंदू त्यापेक्षाही गुंतागुंतीचा व सक्षम आहे. स्मरणशक्ती, प्रवृत्ती,स्वभाव, हालचाली, शिकणे,स्वसंरक्षण करणे, शरीराचा व्यवहार सुरळीत चालू ठेवणे ही मेंदूचीच मुख्य जबाबदारी असते. इतर अवयव फक्त मेंदूने पाठवलेले आदेश पाळतात आणि मेंदूपर्यंत संदेश पाठवतात. मेंदू, त्यापासून पाठीच्या कण्यातून गेलेला दोरखंडासारखा चेतारज्जू व चेतातंतू, इत्यादींचे जाळे या सगळयांना मिळून (मज्जासंस्था) चेतासंस्था म्हणतात. आता मज्जासंस्था हा शब्द वापरत नाहीत. मज्जा हा शब्द आता हाडांमधील मगजाला वापरला जातो. मेंदूचे मुख्य तीन भाग आहेत (मूळ मेंदू ,लहान मेंदू आणि मोठा मेंदू). याशिवाय या मेंदूचे उजवे, डावे असे स्पष्ट भाग दिसून येतात. मेंदूवर तीन आवरणे असतात व त्याखाली मेंदूचा नाजूक भाग असतो.
मेंदूची जाडी सुमारे एक ते दीड इंच इतकी असते. याच्या आत मोठया मेंदूची पोकळी असते. मोठया मेंदूची पोकळी लहान मेंदूच्या पोकळीशी व त्यानंतर पाठीच्या कण्यातील चेतारज्जूमधील पोकळीला जोडलेली असते. एखाद्या घरात खोल्या खोल्या असतात तसेच हे असते. या सर्व पोकळीत एक विशिष्टपातळ द्रव म्हणजे मेंदूजल असते. पाठीच्या कण्यातून 'पाणी'काढताना हाच द्रव काढला जातो. मेंदूजलामध्ये साखर, पेशी व इतर काही घटक असतात. मेंदूच्या काही आजारांत या पाण्याचा रंग अथवा गुणधर्म बदलतात. हा द्रव तपासून काही आजारांचे निदान करता येते.
मेंदूमध्ये लक्षावधी पेशी असतात. बाहेरून संदेश आणण्यासाठी व आतून बाहेर संदेश पाठवण्यासाठी खास धाग्यांचे विद्युत मार्ग असतात. तसेच मेंदूच्या निरनिराळया भागांचे काम ठरलेले असते. या संदेशवाहक मार्गात किंवा विशिष्ट भागात बिघाड होऊ शकतो. असे झाले तर त्या त्या कामात अडथळा येतो किंवा पूर्णपणे काम बंद होऊ शकते. जर श्वसन वगैरे अत्यावश्यक कामांमध्ये अडथळा आला तर मृत्यू येऊ शकतो. हे आदेश पाठवण्याचे काम विशिष्ट चेतातंतूंमार्फत होते. संदेश मेंदूकडे आणण्यासाठी आणि मेंदूकडून आज्ञा परत अवयवांकडे पाठवण्यासाठी वेगवेगळे चेतातंतू असतात. हे संदेशवहनाचे काम सूक्ष्म विद्युतशक्तीने केले जाते. काही रासायनिक क्रियांचीही यास मदत होते. उदा. आपल्या हाताच्या कोपराखाली कठीण पदार्थाचा धक्का लागला, की कधीकधी अचानक मुंग्या येतात. याचे खरे कारण कोपराखाली जी नस असते तिला धक्का लागून विद्युतशक्तीने मुंग्यांचा परिणाम जाणवतो. 'नस' म्हणजे चेतातंतूंचे एक बंडल असते. या नसांचे जाळे रक्तवाहिन्यांप्रमाणेच शरीरभर पसरलेले असते. काही नसा केवळ मेंदूकडे संदेश, माहिती, संवेदना नेणा-या तंतूंच्या असतात. याउलट काही नसांमध्ये संदेश नेणा-या आणि आणणा-या अशा दोन्ही तंतूंचा समावेश असतो.
नस फार नाजूक असते व तिच्यावर आवरण असते. इजा झाली तर नसेचे काम बंद पडून संबंधित अवयव दुबळा होतो. तसेच कुष्ठरोगाच्या आजारांत या नसांना सूज येऊन अवयव दुबळे होतात.
पचन, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, इत्यादी अंतर्गत क्रियांसाठी मध्यमेंदूत एक वेगळेस्वतंत्र चेतामंडळ असते.
चेतासंस्थेचे हे काम(संवेदना आणि आज्ञा किंवा संदेशवहन) कोठेही बंद पडले की संबंधित भाग दुबळा किंवा निरुपयोगी होतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
परिसरात व शरीराच्या विविध भागांत होणाऱ्या बदलांमुळ...
तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) केंद्रीय विभ...
चेतासंस्थेमध्ये मेंदू, चेतारज्जू व चेतातंतू (नसा) ...
पूर्वी ज्याला मज्जासंस्था म्हणत त्याला आता चेतासंस...