অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तंत्रिका तंत्र

तंत्रिका तंत्र

मज्जासंस्था

बाह्य परिसरात व शरीराच्या विविध भागांत होणाऱ्या बदलांमुळे ज्या संवेदना उत्पन्न होतात त्यांचा समन्वय करून योग्य त्या शारीरिक क्रिया घडवून आणणे व अशा क्रियांवर नियंत्रण ठेवणे, हे कार्य करणाऱ्या शरीरातील यंत्रणेला तंत्रिका तंत्र म्हणतात. शरीराचे अखंडत्व, स्वास्थ्य आणि मूळ स्थिती टिकविण्याचा त्यामागे हेतू असतो. तंत्रिका तंत्रातील कोशिका (पेशी) विशिष्ट कार्यास योग्य अशाच असतात.

सर्व सजीवांमध्ये परिसरातील बदलाला योग्य अशी शारीरिक प्रतिक्रिया घडवून आणण्याची तरतूद असते. उदा., अती उष्णता टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक प्राणी करतो, कारण तीमुळे शरीराची हानी होण्याचा संभव असतो. या सर्व प्रतिक्रियांचा हेतू स्वतःचे आणि त्या योगे प्रजातीचे अस्तित्व टिकविण्याचा असतो. अमीबाकिंवा पॅरामिशियम यासारख्या एक कोशिकीय (एकाच कोशिकेच्या बनलेल्या) प्राण्यांत परिसरानुवर्ती बदल घडवून आणणारी स्वतंत्र यंत्रणा नसते. परंतु या प्राण्यांच्या जीवद्रव्यातच (कोशिकेतील जीवनावश्यक जटिल द्रव्यातच) संवेदनक्षमता हा गुणधर्म असतो. बहुकोशिकीय व जटिल प्राणिशरीराकरिता निरनिराळ्या शरीरभागांचे सहकार्य अशा प्रतिक्रियांकरिता जरूर असल्यामुळे उद्दीपक आणि अनुक्रिया यांमध्ये नियंत्रक असणे जरूर झाले. बहुकोशिकीय प्राण्यामध्ये या नियंत्रणाकरिता दोन स्वतंत्र यंत्रणा असतात : (१) अंतःस्रावी ग्रंथी व (२) तंत्रिकाजन्य यंत्रणा. प्राणिसृष्टीमध्ये जसजसा क्रमविकास (उत्क्रांती) होत गेली तसतशी तंत्रिकाजन्य यंत्रणेच्या रचनेतही वाढ होत गेली. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) व सस्तन प्राण्यांत तिचे प्रगत व स्वतंत्र स्वरूपच बनले. ज्या प्राण्यांमध्ये स्वतंत्र तंत्रिका तंत्र असते त्या प्राण्यांचे असे तंत्र नसलेल्या प्राण्यांपेक्षा अधिक जटिल वर्तन होऊ शकते. अगदी कनिष्ठ प्राण्यात अत्यंत साधी रचना असलेल्या या तंत्राची क्रमविकासाबरोबर गुंतागुंत वाढत जाऊन ते अत्यंत क्लिष्ट व घोटाळ्याचे बनले. अनेक पिढ्यांमध्ये लाखो वर्षे होत गेलेला क्रमविकास या रचना बदलास कारणीभूत असल्यामुळे तंत्रिका तंत्र समजण्याकरिता या क्रमविकासाची थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे.

क्रमविकास

प्राणिशरीरात तंत्रिका कोशिका कशी उत्पन्न झाली, याविषयी अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. सुरुवातीच्या एका सिद्धांतानुसार अगदी साध्या तंत्रिका चापाचे (ज्यातून तंत्रिका संवेदना वाहून नेली जाते त्या मार्गाचे) अनुक्रमे ग्राहक, संवाहक आणि प्रभावकारक (ज्याच्या द्वारे संवेदनेचे वितरण होऊन स्नायूचे आकुंचन व ग्रंथीचे स्रवण या क्रिया घडवून आणल्या जातात तो तंत्रिकेचा टोकाचा भाग) हे तीनही विभाग एकाच कोशिकेत समाविष्ट झालेले असावेत. या कोशिकेला ‘तंत्रिका–स्नायू’ कोशिका असे संबोधण्यात आले; परंतु अशी कोशिका असलेला एकही प्राणी आढळत नसल्यामुळे हा सिद्धांत मान्य झाला नाही. या सिद्धांतापेक्षा अधिक समंत सिद्धांतानुसार प्रभावकारक प्रथम उत्पन्न झाले असावेत. स्पंजामध्ये फक्त प्रभावकारकच आढळतात. त्यांच्या छिद्रांतून पाणी आत शिरते व बाहेर पडते. या छिद्रांभोवती स्नायू असून त्यांच्या आकुंचन–प्रसरणामुळे ती लहान मोठी होतात. या स्नायूंची हालचाल कोणतेही ग्राहक व संवाहक नसताना होते म्हणजे फक्त प्रभावकारकच (स्नायू) असतात. त्यापुढची पायरी म्हणजे ग्राहक व प्रभावकारक दोन्ही असणे. त्यानंतर चापाचा मधला दुवा म्हणजे संवाहक तयार झाला असावा. सर्व अपृष्ठवंशी व पृष्ठवंशी प्राण्यांच्या तंत्रिका तंत्राचा ‘तंत्रिका चाप’ हा पायाच असतो असे म्हणता येईल.

तंत्रिका कोशिकांची उत्पत्ती बाह्यत्वचा किंवा शरीराच्छादनातून झाली असावी. कारण काही कनिष्ठ अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये त्या याच ठिकाणी आढळतात. याशिवाय तंत्रिका ऊतकाची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाची) उत्पत्ती भ्रूणातही बाह्यस्तरापासूनच झालेली आढळते. ज्या मूळ कोशिकेपासून तंत्रिका कोशिका बनते ती कोशिका प्रोटोझोआप्रमाणेच उद्दीपनक्षम आणि संवाहक गुणधर्मयुक्तच असावी. ही पूर्वगामी तंत्रिका कोशिका स्रावोत्पादकही असावी व तिच्यामध्ये असलेले गुणधर्म मूळ तंत्रिका कोशिकेत उतरले असावेत. विशिष्ट गुणधर्म असलेली तंत्रिका कोशिका प्रथम अगदी कनिष्ठ बहुकोशिकीय प्राण्यात तयार झाली असावी.

तंत्रिका कोशिकेविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहेच. येथे आवश्यक तेवढीच माहिती दिली आहे. तंत्रिका कोशिकेपासून दोन प्रकारचे प्रवर्ध (वाढी) निघतात : (१) आखूड व शाखायुक्त आणि (२) लांब. आखूड व शाखायुक्त प्रवर्ध कोशिका पिंडाकडे संवेदना वाहून नेतात म्हणून त्यांना अभिवाही प्रवर्ध म्हणतात. लांब प्रवर्ध संवेदना दूर वाहून नेतात म्हणून त्यांना अपवाही प्रवर्ध म्हणतात. अगदी कनिष्ठ प्राण्यामध्ये अभिवहन आणि अपवहन एकाच कोशिकेच्या प्रवर्धाद्वारे न होता त्याकरिता स्वतंत्र कोशिकाच तयार झाल्या. उदा., आंतरगुही (सीलेंटरेट प्राणी). पोरिफेरा या प्राण्यामध्ये अभिवाहक कोशिका परीसरीय बदलामुळे उत्पन्न होणाऱ्या संवेदना मिळताच त्या अपवाहक कोशिकेद्वारे स्नायूंना पोहोचवून योग्य हालचाल घडवून आणतात.

अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये दोन प्रकारची तंत्रिका तंत्रे आढळतात : (१) प्रसृत (पसरलेली) व (२) केंद्रीकृत. यांपैकी प्रसृत प्रकार प्रारंभिक व आदिम (आद्य) स्वरूपाचा आहे. क्रमविकासाबरोबरच केंद्रीकृत प्रकार तयार झाला.

प्रसृत पद्धती आंतरगृही प्राण्यात उदा., हायड्रात आढळते (आ. १ अ). या प्रकारात तंत्रिका कोशिका प्राण्याच्या सर्व शरीरावर बहुतकरून शरीरकवचालगत विखुरलेल्या असतात. तंत्रिका कोशिकांचे मोठे समूह, ज्यांना मेंदू म्हणता येईल, असे या प्राण्यात नसतात. फारच थोडे छोटे छोटे पुंज असतात व त्यांना तंत्रिका गुच्छिका म्हणतात. कोशिका व त्यांचे प्रवर्ध मिळून एक जाळेच बनलेले असते. कोशिकांमध्येही काही प्रकार उदा., स्रावोत्पादक, संवेदनाग्राही वगैरे असतात.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate