स्तनी प्राण्यांच्या मुखद्वारापुढे आडव्या असलेल्या दोन मांसल अवयवांस ओठ म्हणतात. वरच्या व खालच्या ओठांच्या संधिस्थानाला मुखकोन किंवा तोंडाचा कोपरा असे म्हणतात.
मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) व सरीसृप (सरपटणारे) प्राणी यांच्यातही ओठसदृश अवयव असतात. पक्ष्यांमध्ये ओठांचे मांसल स्वरूप जाऊन त्यांची टणक अशी चोच होते; पण कांगारू व जरायुज (पिलांना जन्म देणाऱ्या) स्तनी प्राण्यांतच ओठ असे स्वतंत्र अवयव दिसतात. जबडा आणि हिरड्या व ओठांची आतली बाजू यांवर श्लेष्मकलेचा (समान रचना न कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांच्या म्हणजे ऊतकांच्या थरांचा) लाल रंगाचा थर असून त्या थरातील ओष्ठग्रंथीपासून होणाऱ्या श्लेष्मल (बुळबुळीत) स्त्रावामुळे ओठ नेहमी ओले राहतात. ओठांच्या बाह्य भागावर त्वचेचे आवरण असून त्यांत केशमूले, स्वेदग्रंथी (घाम उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी) व स्नेहग्रंथी (वसा साठविणाऱ्या ग्रंथी) असतात. श्लेष्मल आवरण व त्वचेचे आवरण या दोहोंच्यामध्ये संयोजी ऊतक तंतू (समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमूहांचे तंतू) व स्नायू असतात. हे स्नायू वदन-स्नायू तंत्रापैकी (चेहऱ्याच्या स्नायू व्यूहांपैकी) असून त्यांपैकी मुख-वलयी (तोंडाभोवती असलेल्या) स्नायूंमुळे ओठांची हालचाल होते. श्लेष्मकला (बुळबुळीत, नाजूक, पातळ पटल) व त्वचा यांच्या संयोगस्थानी ओठाची कड असून तेथे श्लेष्मल-अधिच्छदाचे (आवरणाचे) रूपांतर त्वगधिच्छदांत (त्वचेच्या आवरणांत) होते.
ओठांचे स्थान, आकार व चलनक्षमता यांमुळे चोखणे, अन्न घट्ट धरून ते दातांकडे ढकलणे या क्रिया ओठांकडून होतात. गिळण्यासही ओठांची मदत होते.
मनुष्य प्राण्यांतील ओठांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे शब्दोच्चार. प वर्गादी ओष्ठ्यवर्ण व उ, ओ वगैरे इतर वर्णाचे उच्चार ओठांशिवाय होऊच शकत नाहीत.
लेखक : श. ज. अभ्यंकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020
स्पर्शज्ञान त्वचेशी किंवा श्लेष्मल ( बुळबुळीत ) पट...
शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्...