शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्यासाठी ज्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो, त्यांना ‘कृत्रिम अवयव’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 'कृत्रिम अवयव' या संज्ञेचा उल्लेख कृत्रिम हात व पाय यांच्या संदर्भात केला जातो. पाय आणि हात अशा कृत्रिम अवयवांचा वापर २,००० वर्षांपूर्वीपासून होत आहे. धातूंच्या पट्ट्यांवर लाकडाचे आवरण बसवून तयार केलेल्या कृत्रिम पायांचा वापर २,००० वर्षांपूर्वी केल्याचे आढळले आहे.
लढाईत, युद्धात गमाविलेल्या अवयवांसाठी पर्यायी कृत्रिम अवयव तयार करण्याचे आणि त्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम शतकानुशतके शल्यविशारद करीत आले आहेत.
आता त्रुटिभरणशास्त्र (प्रोस्थेटिक्स) ही नवीन तंत्र शाखाच यासाठी तयार झाली आहे. जन्मजात व्यंग, अपघात किंवा काही रोग यांमुळे कृत्रिम अवयवांची गरज भासते.
औद्योगिक अपघात, वाहनांचे अपघात, युद्ध इ. कारणांनी नैसर्गिक अवयव गमाविणार्या व्यक्तींना कृत्रिम अवयवांची गरज भासते. तसेच कर्करोग, संसर्ग आणि अभिसरण रोग इत्यादींमुळे नैसर्गिक अवयव कापावे लागून अशी गरज निर्माण होते.
आता शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम अवयव असे जोडले जातात की, मूळचे तुटलेले अवयव या नवीन अवयवांचे वजन पेलतात, शिवाय या कृत्रिम अवयवांद्वारे स्नायूंप्रमाणे हालचाल करणेही शक्य होते. उदा., कृत्रिम हातामधील स्प्रिंगांच्या साहाय्याने वस्तू पकडणे शक्य होते. तसेच दुसर्या खांद्याला जोडलेल्या पट्ट्याला हिसका देऊन बोटे आणि अंगठे दूर करता येतात.
भारतात 'जयपूर फुट'मुळे अनेक अपंग व्यक्ती स्वावलंबी झाल्या आहेत. हा फूट रबरयुक्त कृत्रिम अवयव आहे. सुरुवातीला गुडघ्याखाली जोडण्यासाठी हा पाय तयार करण्यात आला.
खाणीच्या स्फोटांमध्ये पाय गमाविलेल्या अपंग व्यक्तींसाठी इ.स. १९६९ मध्ये मास्टरजी राम चंदर यांनी डॉ. पी. के. सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अवयव तयार केला. जयपूर फूटची संरचना व बनावट पूर्णपणे भारतीय असून तो स्वस्त, तात्काळ जोडता येणारा, सहज निर्मिती करता येणारा आणि जलरोधी आहे.
या कृत्रिम अवयवाची किंमत सर्वांना परवडेल अशी ठेवलेली आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे तो मोफत बसविण्यात येतो.
विसाव्या शतकाच्या शेवटी इलेक्ट्रॉनिकीमधील प्रगतीमुळे कृत्रिम अवयवांचे मायक्रोचीपद्वारा थेट मेंदूकडून नियंत्रण करता येणे शक्य झाले आहे. इलेक्ट्रॉनिकी आणि जीवशास्त्र (बायॉलॉजी) अशा दोन शाखांची मिळून जैविकी (बायॉनिक्स) ही संयुक्त शाखा विकसित झाली आहे.
या शाखेच्या शास्त्रज्ञांनी कोपरापुढील हात किंवा मांडीपासून कापून टाकलेल्या पायाच्या ठिकाणी कार्बनाचे धागे, बहुवारिके आणि टिटॅनियमसारख्या मजबूत; परंतु वजनाने हलक्या धातूपासून तयार केलेला अवयव, अशा रीतीने मेंदूला जोडून नियंत्रित करण्यात यश मिळविले आहे.
लेखक मोहन मद्वाण्णा
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावर...
बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्...
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि ...
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही ...