অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अग्निपिंड

उदराच्या वरच्या भागात असलेली आणि पचनक्रियेसाठी जरूर असलेली ग्रंथी‘अग्निपिंड’ या नावाने ओळखली जाते. अग्निपिंड उदरात अगदी मागे दुसऱ्‍या व तिसऱ्‍या वक्षीय मणक्यावर बसविलेला असून त्याच्या मागच्या बाजूस महारोहिणी आणि अध:स्थ महानीला असतात. हा पिंड पर्युदराच्या (पोटातील इंद्रियांवरील आवरणाच्या) बाहेर असून तो उजव्या बाजूस ग्रहणीच्या (लहान आतड्याचा पहिला भाग) कमानदार भागात घट्ट बसविलेला असतो. तेथून तो डावीकडे निमुळता होत जाऊन प्लीहेच्या (पानथरीच्या) नाभिस्थानाला टेकलेला असतो.

अग्निपिंडाच्या पुढच्या बाजूस बृहदांत्राचा आडवा भाग आणि जठर असते. या पिंडाचा आकार हातोडीसारखा असून त्याचे तीन भाग कल्पिलेले आहेत. ग्रहणीच्या कमानीत बसविलेल्या रुंद व जाड भागाला ‘शिर’ म्हणतात. जठराच्या खाली असलेल्या मधल्या भागाला ‘शरीर’ आणि प्लीहेला टेकलेल्या भागाला ‘पुच्छ’ असे म्हणतात.

अग्निपिंडाची एकूण लांबी १५ ते १८ सेंमी. वजन सु. ८५ ग्रॅम असते. शरीर त्रिकोणाकृती असते. अग्निपिंडाच्या मागच्या पृष्ठभागावर प्लीहेकडील पुच्छापासून उजवीकडे शिरापर्यंत अग्निपिंडवाहिनी (नळी) असते. या वाहिनीच्या वाटेनेच पिंडात उत्पन्न होणारा स्त्राव ग्रहणीत जातो.

या वाहिनीस ‘विरसंग-वाहिनी’ असे नाव असून ती ग्रहणीत पोचण्याच्या आधी तिला पित्तवाहिनीशी संयोग होतो. त्या दोन्ही वाहिन्या ग्रहणीच्या दुसऱ्‍या भागात असलेल्या कुंभाकार उंचवट्यामध्ये ग्रहणीत उतरतात. त्या भागाला ‘फाटर कुंभ’ असे म्हणतात. त्याशिवाय अग्निपिंडातून निघणारी दुसरी लहान वाहिनी त्या कुंभाजवळच ग्रहणीत उतरते. तिला ‘सांतोरीनी वाहिनी’ असे नाव असून त्या दोन्ही वाहिन्यांच्या वाटेने अग्निपिंडस्त्राव ग्रहणीत जातो. (चित्रपत्र ६१)

अग्निपिंडाला रक्ताचा पुरवठा उदरगुहीय (उदर-पोकळीतील) रोहिणीच्या शाखेमार्फत होतो. या शाखेच्या काही उपशाखा उदर व ग्रहणी यांसही रक्त पुरवितात.

अग्निपिंडाला दोन तऱ्‍हेच्या तंत्रिकांचा पुरवठा असतो : अनुकंपी तंत्रिकेच्या शाखा व प्राणेशा तंत्रिकेच्या शाखा [→तंत्रिका तंत्र]. या तंत्रिकांच्या उद्दीपनामुळे अग्निपिंडाचा स्त्राव कमीअधिक होतो. अग्निपिंडाची उत्पत्ती भ्रूणाच्या आदिम आंत्राच्या दोन शाखांपासून होते; पुढे हे दोन भाग एकत्र येऊन त्यांचा अग्निपिंड बनतो. पित्तवाहिनी आणि अग्निपिंडवाहिनी या दोहोंची उत्पत्ती आदिम यकृत मुकुलापासून (यकृताच्या अंकुरापासून) होते म्हणून या दोन्ही वाहिन्या एकत्रच ग्रहणीत प्रवेश करतात.

रचना

अग्निपिंडाच्या रचनेत तीन जातींच्या कोशिका (शरीराचे सूक्ष्म घटक) दिसून येतात :

(१) एका जातीच्या कोशिका बहुकोनी असून त्यांचे गुच्छ बनलेले असतात. गुच्छातून निघणाऱ्‍या वाहिन्यांमुळे त्यांच्या खंडिका बनतात आणि अशा अनेक खंडिकांचा मिळून एक खंड तयार होतो. प्रत्येक खंडाभोवती संयोजी ऊतक [→ऊतक] असून त्याला रक्तवाहिन्या, लसीकावाहिन्या व तंत्रिका यांचा पुरवठा असतो. खंडिकांमधून निघणाऱ्‍या सूक्ष्मवाहिन्यांची मिळून खंडवाहिनी तयार होते. सर्व खंडवाहिन्यांची मिळून अग्निपिंडवाहिनी तयार होते. या बहुकोनी कोशिकांमध्ये अग्निपिंडाचा स्त्राव उत्पन्न होतो. त्या कोशिकांचे स्वरूप पचनक्रियेच्या अवस्थेवर अवलंबून असते. जठरातील अन्न ग्रहणीत उतरण्याच्या वेळी या कोशिकांच्या जीवद्रव्यात अनेक सूक्ष्म कण जमतात. हे कण कोशिकांच्या परिघापाशी जमून यांच्यामुळे कोशिकाकेंद्र एका बाजूस सरकल्यासारखे दिसते. पुढे हे कण कोशिकांच्या टोकांपासून बाहेरच्या सूक्ष्मवाहिनीत विसर्जित होतात. हे कण म्हणजेच अग्निपिंडात उत्पन्न होणाऱ्‍या प्रवर्तकाचे [→हॉर्मोने] जनक होत. त्यांना ‘ट्रिप्सोजेन’ म्हणतात.

(२) दुसऱ्‍या जातीच्या कोशिकासमूहांना ‘लांगरहान्स द्वीपके’ असे म्हणतात. वर वर्णन केलेल्या बहुकोनी कोशिकांच्यामध्ये बेटासारखे दिसणारे या कोशिकांचे समूह असून त्यांच्यापासून वाहिन्या निघत नाहीत. कारण त्यांच्यापासून बाह्यस्त्राव होत नाही. द्वीपकांमध्ये दोन तऱ्हेच्या कोशिका असतात. एका जातीच्या कोशिकांमध्ये ‘ग्लुकाजेन’ नावाचा अंत:स्त्राव उत्पन्न होतो. त्या कोशिकांना ‘आल्फा कोशिका’ म्हणतात. दुसऱ्या जातीच्या कोशिकांना ‘बीटा कोशिका’ असे नाव असून त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकाला ⇨ इन्शुलीन (द्वीपीप्रवर्तक) असे नाव आहे. या इन्शुलिनामुळे शर्करा व पिठूळ पदार्थांच्या चयापचयास मदत होते. ग्लुकाजेन व इन्शुलीन यांची क्रिया एकमेकांविरूद्ध आहे. इन्शुलिनाचे प्रमाण कमी पडल्यास मधुमेह हा रोग होतो. मधुमेहावर इन्शुलिन हे एक उत्कृष्ट औषध आहे.

(३) तिसऱ्या जातीच्या कोशिका अग्निपिंडवाहिनीच्या अंतःस्तरावर असून त्यांचा उपयोग त्या वाहिन्यांच्या अस्तरासारखा होतो.

अग्निपिंडस्त्राव

हा स्त्राव दिवसभर अखंड चालू असतो पण ग्रहणीत अन्न उतरल्यानंतर त्याचे प्रमाण फार वाढते. दोन प्रकारांच्या प्रेरणांमुळे स्त्राव वाढतो. अन्न खाण्यास सुरुवात केल्याबरोबर मस्तिष्कातून निघालेली तंत्रिका प्रेरणा प्राणेशा तंत्रिकेद्वारे अग्निपिंड-कोशिकांत पोचते व कोशिकागुच्छांचे उद्दीपन होऊन स्त्राव वाढतो.

दुसऱ्या प्रकारची प्रेरणा तंत्रिकाजन्य नसून ती रसायनिक असते. जठरात अन्न पोचल्यावर त्याचा जठरातील ग्रहणीच्या पहिल्या भागातील श्लेष्मक कोशिकांवर परिणाम होऊन तेथे सिक्रिटीन (स्त्रावक) नावाचे प्रवर्तक तयार होते; ते रक्तात शोषिले जाऊन रक्तामार्गे अग्निपिंडात पोचल्यावर तेथील कोशिकांचे उद्दीपन होऊन स्त्राव वाढतो. तंत्रिकांमार्गे येणाऱ्या प्रेरणेमुळे अग्निपिंडाच्या स्त्रावातील एंझाइमांचे प्रमाण वाढते तर रक्तामार्गे होणाऱ्या उद्दीपनामुळे सोडियम बायकार्बोनेट, क्लोराइड व पाणी यांचे प्रमाण वाढते. अग्निपिंडाचा स्त्राव दररोज सु. ६०० ते १,५०० घ.सेंमी. इतका होतो. तो क्षारीय असून त्याचे विशिष्ट गुरूत्व १․००७ पासून १․०पर्यंत असू शकते.

साधारणपणे ते १․०१० ते १․०१८ इतके असते. या स्त्रावाला गंध किंवा रंग नसतो. त्यात बायकार्बोनेटाचे प्रमाण पुष्कळ असून शिवाय क्लोराइडे व फॉस्फेटे हे अजैवी पदार्थही असतात. जठरातून ग्रहणीत उतरलेले अन्न अम्ल असून बायकार्बोनेटामुळे अम्लाचे ⇨उदासिनीकरण होते. असे उदासीनीकरण झाल्याशिवाय आंत्रातील पचनक्रिया योग्य प्रकारे चालत नाही. अग्निपिंडाच्या स्त्रावात तीन प्रकारांची एंझाइमे असतात. त्यांपैकी पहिल्या प्रकारच्या एंझाइमाला ‘ट्रिप्सीन’ असे म्हणतात. अग्निपिंडातून बाहेर पडताना त्याचे स्वरूप ट्रिप्सीनोजेन असे असून ग्रहणीत गेल्यावर त्याचे ‘ट्रिप्सीन’ मध्ये रुपांतर होते.

हे एंझाइम प्रथिन पदार्थांचे विभंजन आणि पचन करते. प्रथम प्रथिनांचे विभाजन होऊन त्यांचे ‘पॉलिपेप्टाईड’ बनते व पुढे पेप्टाईड व शेवटी ‘ॲमिनो अम्ल’ असे स्वरूप त्यांना प्राप्त होते. या अमिनो अम्ल स्वरूपातच प्रथिने रक्तात शोषिली जातात. याशिवाय ‘कायमोट्रिप्सीन’ आणि ‘कारबॉक्सीपेप्टडेज’ अशी दोन एंझाइमे अग्निपिंडस्त्रावात असून त्यांची क्रिया ट्रिप्सिनाला पोषक असते.

या एंझाइमांना ‘प्रथिनभंजक एंझाइमे’ म्हणतात. त्याचे कार्य फार महत्वाचे असून अग्निपिंडविकारांमुळे त्यांचे प्रमाण कमी पडल्यास प्रथिनांचे पचन नीट होत नाही. दुसऱ्या प्रकारच्या एंझाइमाला ‘लायपेज’ (वसाभंजन एंझाइम) असे नाव असून त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थाचे पचन होते. ते होण्यापूर्वी वसेचे पायसीकरण [→पायस] होणे आवश्यक असते. हे पायसीकरण पित्तरसामुळे होते व त्यानंतर वसाभंजक एंझाइमाच्या क्रियेमुळे वसेचे विभंजन होऊन ग्लिसरीन व वसाम्ले तयार होतात व त्याच स्वरूपात लसीकेवाटे शोषिली जातात. तिसऱ्या प्रकारच्या एंझाइमाला ‘अमायलेज’ (पिष्ठभंजन एंझाइम) असे नाव असून त्याच्यामुळे पिठूळ व शर्करावर्गीय पदार्थांचे पचन होऊन त्यांचे स्वरूप द्राक्षशर्करा (ग्लुकोज) असे बनते व याच स्वरूपात ते रक्तात शोषिले जाते.

अग्निपिंडास्त्रावातील या तीन प्रकारांच्या एंझाइमांमुळे अन्नपचनाला फार मदत होते. आंत्रमार्गामध्ये इतरत्र उत्पन्न होणाऱ्या एंझाइमांमुळे प्रथिने आणि पिष्ठमय पदार्थांचे पचन होऊ शकते; परंतु वसाभंजन एंझाइम अन्यत्र उत्पन्न होत नसल्यामुळे अग्निपिंडविकारांत अन्नातील वसा अर्धवट पचलेल्या स्थितीत मलातून विसर्जित होते. अग्निपिंड-विकार : अग्निपिंडाच्या विकारांचे प्रमाण फार कमी असले तरी त्यांपैकी तीव्र विकार फार मारक असतात.

(१) तीव्र अग्निपिंडाशोथ : मद्यप्राशी आणि पित्ताश्मरी अथवा पचनज व्रण हे विकार असलेल्या लोकांत अग्निपिंडशोथ (सूज) होण्याचा संभव असतो. क्वचित अभिघातामुळेही (इजेमुळे) असा शोथ होऊ शकतो. पोटावर जोराने मार बसला तर किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी चुकून असा अभिघात होऊ शकतो.

या रोगाची लक्षणे अतितीव्र असून फार थोड्या वेळातच मारक ठरतात. स्त्रावातील एंझाइमे अग्निपिंडातच साठून राहिली किंवा अग्निपिंडवाहिनीतून बाहेर पडली तर त्या तीव्र एंझाइमांचा परिणाम अग्निपिंडाच्या व आजुबाजूच्या कोशिंकांवर होऊन त्यांचे पचन होऊ लागते. वाहिनीमध्ये रोध उत्पन्न झाल्यास अथवा तीक्ष्ण शस्त्रामुळे वाहिनीभेद झाल्यासही हा विकार होतो. स्त्रियांत व मुलांत हा रोग विशेष प्रमाणात दिसत नाही. प्रौढ पुरूषांत मात्र त्याचे प्रमाण अधिक दिसते.

लक्षणे

पोटात वरच्या बाजूस भयंकर वेदना होऊ लागतात. त्या एकाएकीच सुरू होऊन अगदी असह्य असतात. कित्येक वेळा रोग्याला घाम सुटून एकदम बेशुद्धी येते. इतक्या भयंकर वेदना इतर कोणत्याही विकारात क्वचितच येतात.

मळमळ, ओकारी, पोटफुगी व मलावरोध ही लक्षणेही दिसतात. कावीळ झाल्यामुळे डोळे व त्वचा पिवळट दिसते.

मद्यपी लोकांत मानसिक विकृती दिसते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate