प्रस्तुत नोंदीत मानवी पित्ताशय व त्याच्या काही विकारांसंबंधी माहिती दिलेली आहे.
पित्ताशय हे यकृताच्या [ ⟶ यकृत ] उजव्या खंडाच्या अध:स्थ पृष्ठभागावर असलेल्या एका खाचेत असते. उजवी व डावी यकृत नालिका मिळून बनणारी समाईक यकृत नलिका, पित्ताशय, पित्ताशय नलिका तसेच समाईक यकृत नलिका आणि पित्ताशय नलिका मिळून बनणारी पित्तरस नलिका किंवा संयुक्त पित्तनलिका या सर्वांना मिळून यकृतबाह्य पित्तमार्ग म्हणतात.
(भ्रूणाची उत्पत्ती व विकास यांचा अभ्यास). भ्रुणाच्या अग्रांत्रापासून (घशापासून ते लहान आतड्याचा सुरूवातीचा भाग हा अन्नमार्गाचा विभाग भ्रूणाच्या ज्या भागापासून तयार होतो त्यापासून) उजवीकडे एक प्रवर्ध (विस्तार) उगवून वाढत जातो. या प्रवर्धापासून यकृत, ⇨अग्निपिंडाचा अग्रभाग व पित्ताशयासहित सर्व पित्तमार्ग तयार होतो. हा प्रवर्ध लांब वाढत जाऊन त्याच्या मध्यभागी पोकळी निर्माण होते. या पोकळीचे वरचे व उजवे टोक विस्तार पावते आणि त्यालाच पुढए पित्ताशय म्हणतात. अग्निपिंड व पित्तमार्ग ग्रहणी भागापासून एकाच प्रवर्धापासून विकसित होत असल्यामुळे अग्निपिंड नलिका व संयुक्त पित्तनलिका ह्या दोन्ही ग्रहणीत एकाच ठिकाणी उघडतात.
वर्णनाच्या सोयीसाठी पित्ताशयाचे तीन भाग कल्पिले आहेत : (१) बुघ्न, (२) काय आणि (३) ग्रीवा किंवा मान.
(१) बुघ्न : सर्वांत अधिक पसरट भागाला बुघ्न असे नाव असून तो यकृताच्या अध:स्थ कडेपासून पुढए डोकावल्यासारखा असतो. त्यामुळे तो उदर अग्रभित्तीच्या लगेच मागे व नवव्या बरगडीच्या उपास्थिच्या टोकाखआली असतो. त्याचा पश्चभाग आडव्या बृहदांत्रावर (मोठ्या आतड्यावर) टेकलेला असतो. सर्व बुघ्नावर पर्युदराचे आच्छादन असते.
(२) काय (किंवा मुख् भाग) : हा भआग बुघ्न व ग्रीवा यांच्या दरम्यान असून तो उजवीकडून डावीकडे व अग्रपश्च दिशेने खोल जातो. त्याचा वरचा पृष्ठभाग यकृताला संयोगी ऊतकाने जोडलेला असतो. खालचा पृष्ठभआग बृहदांत्र व ग्रहणीवर (लहान आतड्याच्या सुरूवातीच्या भागावर) टेकल्यासारखा असतो.
(३) ग्रीवा किंवा मान : हा सर्वांत जास्त अरूंद भाग असून पुढच्या भागात वळलेला असून त्यापासून पित्ताशय नलिका निघते. या ठिकाणी म्हणजे पित्ताशय नलिकेची सुरूवात होते त्या ठिकाणी थोडे संकोचन असते. कायेप्रमाणेच ग्रीवा हीच यकृताला अवकाशी ऊतकाने (घटक दूरदूर असल्यामुळे पोकळसर वाटणार्या ऊतकाने) चिकटलेली असून या ऊतकातच पित्ताशय रोहिणी बसविलेली असते. ग्रीवेच्या पित्ताशय नलिका सुरू होण्यापूर्वीच्या भागात छोटासा फुगीर भाग असतो. त्याला आर्. हार्टमान (१८३१-९३) या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून हार्टमान कोष्ठ म्हणतात.
पित्ताशय नलिका पित्ताशयाच्या ग्रीवेपासून सुरू होते व ती ३ ते ४ सेंमी. लांब असते. ती मागे खाली व डावीकडे वळण घेऊन समाईक यकृत नलिकेस मिळते. पित्ताशय नलिकेच्या आतील श्लेष्मकलास्तराला (बुळबुळीत पातळ अस्तराला) जागजागी घड्या पडलेल्या असतात. अशा एकूण ५ ते १२ घड्या असतात. या घड्यांमुळे सर्पिल झडपेसारखी रचना [ या झडपेला एल्. हिस्टर (१६८३-१७५८)या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून हिस्टर झडप (किंवा सर्पिल झडप) म्हणतात ] होऊन नलिका नेहमी उघडी राहते. त्यामुळे पित्ताशयातील पित्तरस केव्हाही खाली किंवा खालून वर वाहू शकतो.
पित्तरसनलिका किंवा संयुक्त पित्तनलिका ७.५ सेंमी. लांब आणि ६ मीमी. व्यासाची असते. ग्रहणीच्या अवरोही भागाजवळ पित्तरस नलिका आणि अग्निपिंडनलिका एकमेकींजवळ येतात व ग्रहणीच्या भित्तीत शिरताच एकमेकींस जोडल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी जो किंचित फुगीर भाग बनतो. त्याला ‘यकृत-अग्निपिंड कुंभिका’ किंवा ए. फाटर (१६८४-१७५१) या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून ‘फाटर कुंभिका’ म्हणतात. या कुंभिकेचे तोंड ग्रहणीत ज्या छोट्या उंचवट्यावर असते त्याला ‘फाटर पिंडिका’ व तोंडाभोवती पिंडिकेत जो चक्राकार परिसंकोचक स्नायू असतो त्याला आर्. ओडी या एकोणिसाव्या शतकातील इटालियन शरीरक्रियाविज्ञांच्या नावावरून ‘ओडी परिसंकोची’ म्हणतात (आ.१).
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020