অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ताप मोजणे

ताप मोजण्याच्या पध्दती

तापमापक नळीने ताप मोजता येतो. तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन हातांचा वापर करून तुलना करता येते. यासाठी एक हात आपल्या कपाळावर तर दुसरा हात समोरच्या माणसाच्या कपाळावर सोबत दाखवल्याप्रमाणे ठेवा. दोन्ही हाताच्या तपमानात फरक वाटतो का ते पहा. कोणत्या हाताला जास्त गरम वाटते ते पहा. आता हातांची अदलाबदल करून पहा. तुमचे तपमान जास्त की समोरील व्यक्तीचे हे आता स्पष्ट होईल. परंतु नेमका ताप किती आहे ते या पध्दतीने कळणार नाही

तापमापक (थर्मामीटर)

ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करावा लागतो. थर्मामीटरचा निमुळता भाग तोंडात काखेत किंवा गुदाशयात ठेवून तापमान मोजता येते. काखेत, तोंडात,गुदाशयात क्रमाने एक एक डिग्री फॅरनहाईटने तापमान वाढत जाते. फक्त लहान बाळांसाठी गुदाशयाचे तपमान घेतले जाते. सामान्यपणे तपमान तोंडात किंवा काखेतच मोजतात.

थर्मामीटर (तापमापक नळी) तोंडात एक मिनिट ठेवला असता निरोगी व्यक्तीचे तापमान97 ते 98 अंश इतके भरते. काखेत ते यापेक्षा एक अंश कमी (960+) तर गुदाशयात धरले असता एक अंश जास्त (980+) भरेल. वापरानंतर नळी स्वच्छ करून सौम्य जंतुनाशकात ठेवा.

तोंडातले तपमान लक्षात घेतले तर

सुमारे 98 पर्यंत ताप नाही असे समजा.

99 ते 100 पर्यंत

सौम्य किंवा बारीक ताप समजा

100 च्या वर 103 पर्यंत मध्यम ताप समजा.
103 व पुढे जास्त ताप असे आपण समजू या.

जास्त ताप आला असेल तर विषमज्वर, न्यूमोनिया, मेंदूसूज किंवा मूत्रमार्गदाह यांपैकी आजाराची शक्यता असते. जास्त ताप असल्यास रुग्णास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. थंडी वाजून येत असेल, घाम येत असेल, रुग्णाला नुकतेच बाहेरून आणले असेल तर मूळचे जास्त तपमान 'कमी' भरण्याचा संभव असतो. अशा वेळी पाच मिनिटे थांबून योग्य तेव्हा तपमान घ्या. तापात चढउतार असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा तरी तापमान घ्यावे लागेल. ताप,कधी किती चढतो आणि उतरतो यावरून रोगनिदानाला मदत होते. साध्या थर्मामीटरऐवजी डिजिटल थर्मामीटर मिळतो. यात तापाचा सरळ आकडाच दिसतो. काही थर्मामीटरवर सेंटीग्रेडचेही आकडे असतात. मात्र फॅरनहीट स्केल वापरणे जास्त सोपे होते.

तापाप्रमाणे नाडी वाढते

शरीराच्या तपमानाप्रमाणे नाडीचे ठोके वाढतात. सर्वसाधारणपणे एक डिग्री फॅरनहाईटने ताप वाढला, की नाडीचे ठोके प्रतिमिनिट दहाने वाढतात. नाडीचा हा अपेक्षित दर एक-दोन अपवाद सोडता सर्व आजारांमध्ये दिसतो. अपवाद म्हणजे विषमज्वर,कावीळ आणि मेंदूच्या आवरणाची सूज. या तीन आजारांमध्ये, अपेक्षित असल्यापेक्षा नाडीचा वेग कमीच असतो. (उदा. जर 99 अंतर्गत तापमान असेल आणि नाडीचा वेग 70 असेल तर 100 फॅ.ला 80, 101 ला 90, 102 ला 100 याप्रमाणे नाडीचा वेग अपेक्षित आहे. परंतु वरील तीन आजारांमध्ये नाडीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी वाढलेला दिसेल. उदा. 99 ला70 असेल तर 100ला 75, 101 ला 80, 102 ला 95,इ.)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate