शरीराच्या तापमानाचे नियंत्रण मस्तिष्काच्या (मेंदूच्या) तळाशी असलेल्या अधोथॅलॅमसाच्या (मोठ्या मेंदूच्या पुढच्या भागाच्या मध्य भागातील थॅलॅमस नावाच्या भागातील खालील भागाच्या) केंद्राकडून होत असते. त्या केंद्राकडे शरीरातून येणाऱ्या संवेदनांनुरूप तेथे प्रतिक्रिया होते आणि त्या केंद्रापासून निघणाऱ्या प्रेरणांमुळे रक्तवाहिन्यांचे आकारमान कमी-जास्त होते. असे झाल्याने शरीराच्या अंतर्गत भागातील आणि त्वचेतील रक्तप्रवाहाचे प्रमाण कमी-जास्त होते व त्यामुळे रक्ताची उष्णता त्वचेच्या मार्गाने नियंत्रित केली जाते. तसेच त्वचेतील स्वेद ग्रंथींचा (ज्या ग्रंथींमुळे घाम येतो त्या ग्रंथींचा) स्राव जरूरीप्रमाणे कमी-जास्त करणे, स्नायूंच्या तणावात वाढ अथवा घट करून आणि त्वचेतील बारीक केशमूळांतील स्नायूंचे आकुंचन घडवूनही उष्णतेचे नियंत्रण केले जाते.
ज्वर ही शरीराची एक संरक्षक क्रिया असते. वाढलेल्या तापमानामुळे रक्तप्रवाह वेगाने चालतो व त्यामुळे रक्तातील प्रतिविषे अधिक प्रमाणात शरीरभर पसरतात.
(१) जंतुसंसर्ग,
(२) ऊतकांमध्ये झालेली इजा,
(३) कर्करोग, रक्तदोष वगैरे रोगांमध्ये होणारा ऊतकनाश,
(४) अंतःस्रावी (वाहिनीविहीन) ग्रंथींचे विकार,
(५) रक्तपरिवहन (रुधिराभिसरणातील) विकार, उदा., हृद्विकार,
(६) तापमान नियंत्रक केंद्राचे विकार अथवा नाश,
(७) शरीराचे निर्जलीभवन,
(८) काही औषधे व रसायनांची क्रिया. तापाधिक्य (हायपरथर्मिया) आणि ज्वर यांमध्ये फरक आहे. ज्वरामध्ये सार्वदेहिक लक्षणे दिसतात, उदा., मळमळ, अस्वस्थता, डोके दुखणे वगैरे. तापमानच नुसते वाढले, तर ही लक्षणे दिसत नाहीत [→ तापाधिक्य व तापन्यूनता]
ज्वरामुळे त्वचेतून व श्वासातून शरीरातील जल अधिक प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे मूत्राचे प्रमाण कमी होते. प्रथिन-अपचय अधिक प्रमाणात झाल्यामुळे मूत्रात नायट्रोजनयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात दिसतात. क्वचित श्वेतकही (एक विशिष्ट प्रकारचे प्रथिनही, अल्ब्युमीनही) मूत्रमार्गे जाते.
<ज्वर जितका अधिक तितकी इतर लक्षणेही अधिक प्रमाणात दिसतात. अस्वस्थता; बडबड; वात; हाताला चटका बसेल इतकी उष्ण व रुक्ष त्वचा; डोळे लाल होणे; कोरडी बुरसटलेली जीभ; अरुची; ओकाऱ्या; डोके, अंग, कंबर दुखणे वगैरे लक्षणेही दिसतात.
ज्वर उतरण्याच्या वेळी रोग्याला पांघरूण नकोसे वाटते, चर्या लाल होते, घाम येऊ लागतो व नंतर ज्वर पूर्णपणे उतरतो किंवा कमी होतो. काही वेळा ज्वर हळूहळू उतरतो तेव्हा घाम येत नाही. रोग्याला गुंगी अथवा झोप येते. थकवा व अशक्तपणा मात्र फार वाढतो.
ज्वराचे संतत (एकसारखा राहणारा), स्वल्पविरामी (थांबून थांबून येणारा) आणि खंडित (उतरून पुन्हा चढणारा–पाळीचा ) ज्वर असे प्रकार आहेत.
ढमढेरे, वा. रा.
कोठ्याच्या बाहेर गेलेले पचन कोठ्यात आणून सुरू करणे, ही मुख्य चिकित्सा होय. हे साध्य साधण्याकरिता वांती, लंघन, घाम आणणे, हलके पातळ अन्न (पेज) व कडू रस देणे व दोषांच्या पचनाची काही काळ वाट पाहणे इ. अनेक उपचार अवस्थांना अनुसरून करावे लागतात. उदा., जेवण होताच ज्वर आला, तर अन्न त्या तापाच्या दोषांना मदत करील आणि प्रसंगी मारक होईल म्हणून वांती करून दोषांची कुमक ताबडतोब थांबवलीच पाहिजे. ज्वर कफ भूयिष्ट आहे; कफ चल आहे. घशाशी येते, तोंडाला पाणी सुटते, ओकारी होईल की काय असे वाटते, अन्नाचा द्वेष वाटतो. याचा अर्थ शरीर हे तोंडावाटे दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न करते व दोषांना वाढविणारी द्रव्ये वाढविणाऱ्या अन्नाचा द्वेष करते. हे समजून घेऊन वैद्याने वांतीच्या औषधाने ज्वरकर दोष वांतीद्वारे काढून टाकून बाकी शिल्लक राहिलेल्या दोषांच्या पचनाकरिता वांती झाल्यावरही लंघन द्यावे. लंघनानंतर कफनाशक पातळ कढण प्रथम देऊन नंतर हळूहळू दाट कफनाशक अन्न देऊन कोठ्यातील अन्नपचन, दोषनाश व शरीरपोषण वाढवावे. कोठ्याबाहेर गेलेले पचन कार्य कोठ्यात आणून बलवान करावे म्हणजे ज्वर नाहीसा होतो. वांतीचे औषध देता येत नाही असा रोगी असल्यास केवळ लंघन करावे. निरोगी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाच्या अंतर्गत प्रयत्नांना वैद्याने मदत करावी. या रीतीने चिन्हांचा अर्थ लावून शरीराचे ज्वर (व इतरही रोग) निवारणाचे प्रयत्न समजावून घेऊन उपचार करावे [ ⟶ आतुर चिकित्सा].
जोशी, वेणीमाधवशास्त्री
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/8/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...