वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड हजार लोकसंख्येचं गाव. जानेवारी महिना उजाडला की गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडायची. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागायचा. तसेच विहीर अधिग्रहण करून त्याचे पाणी गावाला पुरवावे लागायचे. मात्र मार्च २०१३ मध्ये जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मानव विकास मिशन अंतर्गत ‘आपलं गाव, आपलं पाणी’ हा भूजल पुनर्भरण प्रकल्प या गावात राबविला आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याची चिंताच मिटली. या प्रकल्पाक्षेत्रातील विहिरींची पाणीपातळी वाढल्याने शेतीसाठी सुद्धा हा प्रकल्प उपयुक्त ठरला आहे.वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या जाणवते.
या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करणे अथवा विहिरींचे अधिग्रहण यासारख्या उपाययोजना प्रशासनाला हाती घ्याव्या लागतात. दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असल्याने पाणी टंचाईची समस्या भीषण होत आहे. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी सुद्धा खालावत आहे. त्यामुळे गावाच्या क्षेत्रात पडणारे पाणी गावातील जमिनीतच जिरवणे व त्याद्वारे भूजल पातळी वाढविणे, हा उद्देश समोर ठेवून मानव विकास मिशन अंतर्गत ‘आपलं गाव, आपलं पाणी’ हा पथदर्शी प्रयोग सुदी येथे राबविण्यात आला. सुदी गावाच्या पश्चिम बाजूने वाहणाऱ्या छोट्याशा ओघळीचे सुमारे एक ते दीड किलोमीटर लांब अंतरात खोलीकरण करण्यात आले आहे.
याची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ओघळीची रुंदीही काही प्रमाणात वाढविण्यात आली आहे. ज्यामुळे या ओघळीतील जास्तीत जास्त पाणी साठवणे शक्य झाले. तसेच पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारी माती रोखण्यासाठी ओघळ खोलीकरणाच्या प्रारंभी व मध्यभागी अशा दोन ठिकाणी दगड व जाळीपासून गॅबियन पद्धतीचा बंधारा बनविण्यात आला आहे. खोलीकरण केलेल्या ठिकाणी जमा झालेले पाणी जमिनीतील खडकांच्या विविध स्तरांमध्ये जिरावे यासाठी ओघळीमध्ये सुमारे ३० ते ६० फुट खोलीचे अकरा बोअर घेण्यात आले आहेत.
तसेच ओघळीमध्ये साठवण झालेल्या पाण्याचा अंतर्गत प्रवाह रोखण्यासाठी दोन ठिकाणी भूमिगत सिमेंट बंधारे घेण्यात आले आहेत. ‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्प राबविण्यासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहिलेल्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बी. एस.गजभिये यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले की, भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने भूजल पुनर्भरण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला.
हा प्रकल्प राबविण्यापूर्वी भूभौतिक सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून येथील भूस्तरांचा अभ्यास करण्यात आला होता. त्याआधारे या परिसरातील खडकांची जाडी लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. याद्वारे ओघळीद्वारे वाहून जाणारे पावसाचे पाणी आपल्या गावाच्या क्षेत्रातच साठवून ते जमिनीत जिरवणे हा उद्देश होता. मार्च २०१३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागातील भूजल पातळी उंचावली असून त्याचा आसपासच्या विहिरींना मोठा फायदा झाला आहे. या प्रकल्पासाठी कोणत्याही शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करण्याची गरज पडली नाही.
तसेच शेतकऱ्यांना यामुळे कोणते नुकसानही होणार नसल्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीने हा प्रकल्प पूर्ण झाला, असे श्री. गजभिये म्हणाले.पाणी टंचाईला तोंड देऊन हैराण झालेल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे दिलासा मिळाला असून त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ झाली आहे.
याविषयी माहिती देताना येथील शेतकरी विनोद भोयर यांनी सांगितले की, हा प्रकल्प होण्यापूर्वी आम्ही केवळ वर्षातून दोनच पिके घेत होतो, मात्र आता विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध असल्याने गेल्या वर्षीपासून मुग, भुईमुग याचे तिसरे पीक ही घेत आहोत. यापूर्वी जानेवारी महिन्यातच विहिरीत फक्त पिण्यापुरतेच पाणी मिळत होते. मात्र आता मार्च महिन्यात सुद्धा विहिरीत मुबलक पाणी मिळत आहे.
मानव विकास मिशनसमितीच्या गावस्तरीय समितीचे सदस्य मनोज भोयर यांनी ‘आपलं गाव, आपलं पाणी’ या प्रकल्पामुळे गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचे सांगितले. मार्च २०१३ नंतर गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवलेली नाही. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात नळ पुरवठा करणारी विहीर कोरडी पडत होती.
मात्र आज मार्च महिना सुरु असला तरीही या विहिरीची पाणी पातळी कायम आहे. शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा फायदा झाला आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र एकरी अडीच ते तीन क्विंटल इतकेच सोयाबिन निघाले. मात्र या प्रकल्पाच्या परिसरातील शेतकऱ्यांना एकरी पाच ते सहा क्विंटल सोयाबिन निघाले.
या प्रकल्पामुळे सुमारे १०० ते ११० एकर शेतीला फायदा झाला असल्याचे श्री. भोयर यांनी सांगितले.‘आपलं गाव, आपलं पाणी’ या प्रकल्पामुळे गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी गावातच जिरवले गेल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. या परिसरातील विहिरींची पाणी पातळी दोन ते तीन मीटरवर आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भुईमुग, मुग आदी पिकांची पेरणी केल्याचे दिसत आहे.
तानाजी घोलप,
जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
एखाद्या गावाचा इतिहास त्या गावाच्या स्मृतिपटलाच्या...
डोंगरपायथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातलं माळीण गाव.
‘एक गाव तीन तुकडे’ किती विचित्र वाटतं ना? एका गावा...
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभि...