(1) अपघात टाळणे
संभाव्य अपघात टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक असते. बरेच अपघात टाळता येतात. यंत्रसामग्रीत सुधारणा, योग्य ती साधने पुरवणे,कामकाजाच्या पध्दतीत बदल, प्रशिक्षण, इ. उपायांनी काही अपघात टाळता येतात. प्रत्येक व्यवसायात वेगळे धोके असल्याने त्याची प्रतिबंधक उपाययोजनाही वेगळी आहे. उदा. शेतात काम करताना सर्पदंश टाळण्यासाठी बूट घालण्याची गरज आहे, तर बांधकामावर काम करताना लोखंडी हेल्मेट घातले तर डोक्याचे संरक्षण होते. वाहन चालवणा-याने दारू पिणे टाळले तर बरेच अपघात टळू शकतात.
(2) नेमका धोका नीट ओळखावा
एखाद्या व्यवसायातून आरोग्याला असणारा धोका आधी नीट लक्षात घेतला पाहिजे. उदा. शेतात कीटकनाशक फवारणी करणा-याने हे औषध आपल्या श्वासातून आत जाऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे. गाईगुरांशी वागताना शिंगांची हालचाल घातक ठरेल असे मनात धरून वागले पाहिजे. काही धोके उघड असतात तर काही सहज समजत नाहीत. ब-याच रासायनिक पदार्थाचे परिणाम खूप उशीरा कळतात. व्यवसायजन्य आजारांच्या पुस्तिका मिळतात. त्या त्या व्यवसायाप्रमाणे तपशील दिलेले असतात. या प्रकरणातही एक सूचनापत्रक दिले आहे त्याचा तुम्हांला उपयोग होईल.
(3) प्रथमोपचार, आरोग्यतपासणी, उपचार
एकदा नेमके धोके, आजार कळल्यानंतर त्यानुरूप काय प्रथमोपचार करायचे त्याची साधने, प्रशिक्षण वगैरे तयारी केली पाहिजे.
काही आजार हळू हळू वाढतात, त्या दृष्टीने आरोग्यतपासणीत दखल घेतली पाहिजे. उदा. ज्या कारखान्यात गोंगाट जास्त असतो तिथे कामगारांच्या नियमित तपासणीत श्रवणशक्तीची नोंद झाली तरच पुढचे नुकसान कळू शकते व उपाय करता येतात. ब-याच रासायनिक कारखान्यांत रक्त-लघवीचे नमुने घेणे आवश्यक असते, नाहीतर शरीरात रसायन किती प्रमाणात आहे हे कळणारच नाही, नुसतीच वरवर तपासणी होईल.
आजार कळल्यानंतर योग्य उपचारांची व्यवस्था करायला पाहिजे.
(4)धोके,आजार कमी करण्यासाठी उपाय शोधा
त्या त्या व्यवसाय-संबंधितांनी धोके, आजार टाळण्याचा सातत्याने विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. ब-याच व्यवसायांत याची फिकीरच केली जात नाही. यात कामगारांचे नुकसान होते आणि कारखान्याचेही. उदा. पिठाच्या गिरणीत ज्यातून पीठ पडते त्या नळीवर कापडाचे फडके (शर्टाच्या बाहीप्रमाणे) बांधल्यास पीठ, धूळ उडणे खूप कमी होते हे याचे उदाहरण आहे.
(5) आजार, अपघातांची नोंद ठेवा, अहवाल पाठवा
नियमित नोंद ठेवण्याने आजार-अपघातांचे प्रमाण कमी होते आहे की वाढते आहे हे लक्षात येते. फॅक्टरी ऍक्टनुसार त्या कारखान्याला याचा अहवाल कारखाना निरीक्षकाला देणे आवश्यक आहे.
पण ही व्यवस्था कारखान्यात काम करणा-यांसाठीच उपयोगाची आहे. बाहेर काम करणा-या बहुसंख्य कामक-यांसाठी अशी सोय, कायदा नाही. तुम्हीपण अशा नोंदी ठेवायला सुरुवात केल्यास बरीच माहिती जमू शकेल.
नुकसान भरपाई व पुनर्वसन
नोकरीतल्या कामामुळे काही आजार, अपघात झाला तर त्याचे उपचार वगैरेचा खर्च,नुकसान भरपाई, इ. गोष्टी हक्काच्या असतात. मालकाने हे करणे अपेक्षित आहे. कायद्यानुसार सर्व कारखान्यांना हे बंधनकारक असले तरी यात पुष्कळ टाळाटाळ होते. राज्य कामगार विमा योजनेप्रमाणे अशी तरतूद आहेच. यात उपचार, हक्काची रजा,पुनर्वसन, इ. भरपाई असते. पण हे झाले कारखान्यांचे किंवा सरकारी नोकरीचे. इतरांनी कोणाकडे नुकसान भरपाई मागायची? जिथे मालक-नोकर असा संबंध असतो तिथे अर्थात अशी भरपाई मालकाकडे मागता येईल. स्वयंरोजगार असेल त्यांना विमा कंपन्यांची ठरावीक पॉलिसी घेतली असेल तरच भरपाई मिळते. सामाजिक संरक्षणाच्या विमा योजना वाढवणे हा यावरचा उपाय आहे.
अपघात हे तर उघड असल्याने सहानुभूती व मदत मिळणे शक्य असते. पण इथेही नुकसान भरपाई व पुनर्वसन या गोष्टी सहजासहजी घडत नाहीत. त्याला खूपच कटकटी व विलंबातून जावे लागते. प्रत्यक्ष अपघातांची ही उपेक्षा तर नकळत शरीरात वाढणा-या अनेक व्यवसायजन्य आजारांची दखल कोण घेणार?