लैंगिक क्रियेतला मुख्य भाग म्हणजे ताठ झालेल्या शिश्नाचा योनिमार्गात प्रवेश, व काही मिनिटानंतर शिश्नामधून वीर्यपतन होणे व स्त्रियांच्या ओटीपोटात सुखद आकुंचन क्रिया होणे. यामुळे स्त्री-पुरुषांना शारीरिक पातळीवरचा सर्वोच्च आनंद होतो व गर्भधारणा होऊ शकते.
या मुख्य क्रियेआधी चुंबन, आलिंगन, स्पर्श, इत्यादी 'कामक्रीडा' असतात व एकूण शरीर सुखात व उद्दीपनात या कामक्रीडांचा भाग महत्त्वाचा असतो.
शारीरिक संबंधाच्या वेळी एक प्रकारची सुरक्षितता व एकांत आवश्यक असतो, तसेच स्त्रीपुरुषांमध्ये एक विश्वासाचे व प्रेमाचे नाते आवश्यक असते.
प्रत्यक्ष योनि-शिश्न संबंधाच्या वेळी दोन्ही इंद्रियांना काही स्त्राव (पाझर) सुटतात,त्यामुळे लैंगिक संबंध सोपा होतो. कोरडेपणामुळे दोन्ही इंद्रियांना वेदना-इजा होऊ शकते. स्त्री-पुरुषांच्या मानसिक-शारीरिक कारणांमुळे लैंगिक इच्छा, स्त्राव, समागमाचा काळ (एकूण मिनिटे) यात थोडेफार बदल होत असतात.
पुरुषजननेंद्रियाची 'ताठपणा' आल्यावरची लांबी 4 ते 7 इंचापर्यंत असू शकते. लांबी किंवा जाडी यावर सुख अवलंबून नसते. लैंगिक सुख ताठरपणा व त्यानंतरचे वीर्यपतन यावर अवलंबून असते, तसेच स्त्री जोडीदाराकडून मिळणा-या प्रतिसादावर अवलंबून असते.
स्त्रीयोनीचा आकार शिश्नासाठी पुरेसा मोठा असतो, कारण बाळंतपणात पूर्ण वाढलेले बाळ त्यामार्गाने बाहेर येणार असते. मात्र योनिमार्गाचे प्रवेशद्वार दोन कारणांमुळे लहान असू शकते. पहिल्या काही शरीरसंबंधाच्या वेळी ते अजून पुरेसे सैल झालेले नसते व त्यावर एक पातळ पडदा असतो. पहिल्या दोन तीन संबंधांनंतर बहुधा ही समस्या संपते. मात्र आपल्याकडे मुलींची लग्ने इतक्या लवकर लागतात (बालविवाह) की अनेक मुलींची यासाठी पुरेशी वाढच झालेली नसते. अशा लहान मुलींना संबंधाच्यावेळी खूप वेदना होते,इजाही होते. (शरीरसंबंधाची भीती निर्माण होण्यात हे एक प्रमुख कारण आहे)
शरीरसंबंध (म्हणजे योनिप्रवेश ते वीर्यपतन) सुमारे सामान्यतः 2-5 मिनिटे टिकतो. क्वचित तो जास्तकाळ म्हणजे 15-20 मिनिटेपण टिकू शकतो. अनेक वेळा शिश्नाचे उद्दीपन (उत्तेजन) खूप आधी झाले असेल तर अधीरपणामुळे वीर्यपतन लगोलग होऊ शकते. अनुभवाने व काही युक्त्यांमुळे ही समस्या सुटत जाते.
साधारणपणे जोडप्यांमध्ये आठवडयातून 3/4 वेळा किंवा रोजही शरीरसंबंध होतो. काही जोडपी दिवसातून 2/3 वेळाही शरीरसंबंध करतात. इच्छा व प्रकृतीनुसार हे प्रमाण बदलते. कमी किंवा जास्त असे माप याला लावता येणार नाही. मात्र उभय जोडीदारात फरक असेल तर एकाला हा त्रास (अपुरेपणा किंवा अतिरेक) वाटण्याचा संभव आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/1/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...