অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेह आणि किडणी

मधुमेह आणि किडणी

  1. मधुमेहामुळे होणाऱ्या किडणी फेल्युअरसंदर्भात प्रत्येक रोग्याला माहिती असणे का जरुरी आहे ?
  2. मधुमेहाच्या रोग्यांची किडनी खराब होण्याची शक्यता किती असते ?
  3. मधुमेहामुळे किडणीचे कशा प्रकारे नुकसान होते ?
  4. मधुमेहामुळे किडनीवर होणारा परिणाम केव्हा आणि कुठल्या रोग्यांवर होऊ शकतो ?
  5. मधुमेहामुळे किडणीच्या होणाऱ्या नुकसानीची लक्षणे
  6. मधुमेहाचा किडणीवर होणारा परिणाम कसा थांबविता येतो ?
  7. किडणीवर मधुमेहाच्या परिणामांचे त्वरित निदान कशा प्रकारे केले जाते ?
  8. लघवीतील मायक्रोअल्बुमिन्युरियाचा तपास ही सर्वोत्तम पद्धत का आहे ? हा तपास केव्हा आणि कोणी करायला पाहिजे ?
  9. मधुमेहाच्या किडणीवर होणार्या परिणामांवरील उपचार

जगात तसेच भारतात वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच मधुमेहाच्या रोग्यांची संख्या वाढते आहे. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये क्रॉनिक किडणी फेल्युअर (डायबेटिक नेफ्रोपॅथी) आणि लघवीद्वारे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

मधुमेहामुळे होणाऱ्या किडणी फेल्युअरसंदर्भात प्रत्येक रोग्याला माहिती असणे का जरुरी आहे ?

  1. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या कारणांपैकी मधुमेह हे सगळ्यात महत्वपूर्ण कारण आहे.
  2. डायलिसीस करणाऱ्या क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या १०० रोग्यांमध्ये ३५ ते ४० रोग्यांची किडणी खराब होण्याचे कारण मधुमेह असते.
  3. मधुमेहामुळे रोग्याच्या किडणीवर झालेल्या परिणामांवर जर तातडीने योग्य उपचार केले गेले तर किडनी फेल्युअर थांबवता येते.
  4. मधुमेहामुळे किडणी खराब व्हायला सुरुवात झाल्यानंतर हा रोग बारा होऊ शकेलच अशी शक्यता नसते. मात्र त्वरित योग्य उपचार आणि पथ्य पाळले तर डायलिसीस आणि किडणी प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार दीर्घकाळापर्यंत टाळता येतात.

मधुमेहाच्या रोग्यांची किडनी खराब होण्याची शक्यता किती असते ?

मधुमेहाच्या रोग्यांचे दोन भागांत वर्गीकरण करता येईल.

  • टाईप १ किंवा इन्शुलीनवर अवलंबून मधुमेह

(IDDM  - Insulin Dependent Diabetes Mellitus)

साधारणपणे कमी वयात होणार्या ह्या प्रकारच्या मधुमेहावर उपचारासाठी इन्शुलिनची गरज भासते. अशा प्रकारच्या मधुमेहात ३० ते ३५ रोग्यांची किडणी खराब होण्याची शक्यता असते.

  • टाईप २ किंवा इन्शुलिनवर अवलंबून नसणारा मधुमेह

(NIDD – Non Insulin Dependent Diabetes Mellitus)

मधुमेहाचे बहुतेक रुग्ण ह्या प्रकारचे असतात. प्रौढ व्यक्तींमध्ये ह्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते, जो प्रामुख्याने औषधांच्या मदतीने नियंत्रणात आंत येऊ शकतो. अशा प्रकारच्या मधुमेह रोग्यांमध्ये किडणी खराब होण्याची शक्यता १० ते ४० टक्के असते.

मधुमेहामुळे किडणीचे कशा प्रकारे नुकसान होते ?

  • किडणीमध्ये प्रत्येक मिनिटाला १२०० मिली रक्त प्रवाहित होऊन शुद्ध होते.
  • मधुमेह नियंत्रणात न येण्याचे किडणीतून प्रवाहित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे किडनीवर अधिक ताण पडतो, जो नुकसानकारक असतो. जर दीर्घकाळ किडनीचे असे नुकसान झाले तर रक्तदाब वाढतो आणि किडणीचे अधिक नुकसान होऊ शकते.
  • उच्च रक्तदाब खराब होणाऱ्या किडणीवर आणखी भार टाकून किडणी अधिक कमजोर करतो.
  • किडणीला झालेल्या नुकसानीमुळे सुरुवातीला लघवीतून प्रथिने जाऊ लागतात. ही भविष्यात होणाऱ्या किडणीच्या गंभीर रोगाची पहिली खुण असते.
  • ह्यानंतर शरीरातून पाणी आणि क्षार बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरावर सूज येऊ लागते आणि वजन वाढू लागते, तसेच रक्तदाबही वाढतो. किडणी आणखी खराब झाल्यानंतर शुद्धीकरणाचे काम कमी होऊ लागते आणि रक्तात क्रिअॅटिनीन आणि युरियाचे प्रमाण वाढू लागते. यावेळी केलेल्या रक्तचाचणीतून क्रॉनिक किडणी फेल्युअरचे निदान होऊ शकते.
  • मधुमेहामुळे ज्ञानजंतूंना इजा पोहोचते. परिणामी मूत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यात अडथळा येतो. त्यामुळे मुत्राशयात लघवी साठून राहते.
  • मूत्राशयात जास्त लघवी साठल्यानंतर किडणी फुगते आणि तिला नुकसान होते.
  • साखरेचे (ग्लुकोज) जड प्रमाण असलेली लघवी मूत्राशयात दीर्घकाळ राहिल्यास मूत्रसंसर्ग (Urine Infection) होण्याची शक्यता वाढते.

मधुमेहामुळे किडनीवर होणारा परिणाम केव्हा आणि कुठल्या रोग्यांवर होऊ शकतो ?

साधारणपणे मधुमेह झाल्यानंतर ७ ते १० वर्षांनी किडणीचे नुकसान व्हायला लागते. मधुमेहग्रस्तांपैकी कुठल्या रोग्याच्या किडणीचे नुकसान होणार आहे, हे आधीच जाणून घेणे अतिशय कठीण आणि असंभव आहे. खाली दिलेल्या परिस्थितीमध्ये किडणी फेल्युअरची शक्यता अधिक असते.

  • कमी वयात मधुमेह झाला असेल,
  • दीर्घकाळ मधुमेह असेल,
  • उपचार सुरु झाल्यापासूनच इन्शुलिनची गरज असेल,
  • मधुमेह आणि रक्तदाबावर नियंत्रण असेल,
  • लघवीतून प्रथिने जात असतील,
  • मधुमेहामुळे रोग्याच्या डोळ्यांचे नुकसान झाले असेल तर, (Diabetic Retionpathy)
  • मधुमेहामुळे कुटुंबात किनाचे किडणी फेल्युअर झाले असेल तर,

मधुमेहामुळे किडणीच्या होणाऱ्या नुकसानीची लक्षणे

  • प्राथमिक अवस्थेत किडणीच्या रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. डॉक्टरांनी केलेल्या लघवीच्या तपासणीत अल्बुमिन (प्रथिने) जाणे हे किडणी रोगाचे प्राथमिक लक्षण असते.
  • रक्तदाब हळूहळू वाढू लागतो आणि त्याचबरोबर पाय आणि चेहऱ्यावर सूजही येऊ लागते.
  • मधुमेहासाठी आवश्यक औषधे किंवा इन्शुलिनचे प्रमाण क्रमशः कमी व्हायला लागते.
  • पहिल्यांदा औषधाच्या ज्या प्रमाणामुळे मधुमेह नियंत्रणात राहत नसे, तेच प्रमाण आता मधुमेहाला चांगले नियंत्रण करू लागते.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी होते.
  • किडणी अधिक खराब झाल्यानंतर अनेक रोग्यांमध्ये मधुमेहावरील औषधे न घेताच मधुमेह नियंत्रणात राहू लागतो. असे अनेक रोगी मधुमेह संपला म्हणून आनंद व्यक्त करतात. पण प्रत्यक्षात हि किडणी फेल्युअरची गंभीर खुण असे शकते.
  • डोळ्यांवर मधुमेहाचा परिणाम झालेल्या आणि त्यासाठी लेझर उपचार करणाऱ्या प्रत्येक तीन रोग्यांमागे एका रोग्याची (१/३) किडणी भविष्यात खराब झालेली दिसते.
  • किडणी खराब होण्याबरोबरच, रक्तातील क्रिअॅटिनीन आणि युरियाचे प्रमाणही वाढू लागते. याचबरोबर क्रॉनिक किडणी फेल्युअरची लक्षणेही दिसू लागतात आणि त्यात हळूहळू वाढ होताना दिसते.

मधुमेहाचा किडणीवर होणारा परिणाम कसा थांबविता येतो ?

  1. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणे.
  2. मधुमेह आणि उच्चरक्तदाबावर नियंत्रण.
  3. त्वरित निदानासाठी योग्य तपासणी करणे.
  4. इतर सल्ले : नियमित व्यायाम करणे, तंबाखू, गुटखा, पान, विडी, सिगारेट आणि दारू न पिणे

किडणीवर मधुमेहाच्या परिणामांचे त्वरित निदान कशा प्रकारे केले जाते ?

  • उत्कृष्ट पद्धत : लघवीत मायक्रोअल्बुमिन्युरियासाठी (Microalbuminuria)  तपासणी.
  • साधी पद्धत : तीन महिन्यातून एकदा रक्तदाबाची तपासणी आणि लघवीतील अल्बूमिनची तपासणी करणे ही साधी आणि कमी खर्चात होणारी तपासणी आहे, जी कुठेही होऊ शकते. कोणतीही लक्षणे नसतानाही उच्च रक्तदाब आणि लघवीतून प्रथिने जाणे ही किडणीवर मधुमेहाचा परिणाम झाल्याची लक्षणे आहेत.

लघवीतील मायक्रोअल्बुमिन्युरियाचा तपास ही सर्वोत्तम पद्धत का आहे ? हा तपास केव्हा आणि कोणी करायला पाहिजे ?

मधुमेहाच्या किडणीवर होणाऱ्या परिणामाचे पहिले निदान ह्या चाचणीद्वारे करता येते. या अवस्थेत जर निदान झाले तर किडणीवर होणारे मधुमेहाचे दुष्परिणाम अंशतः संपवता येतात. त्यामुळेच हि तपासणी सर्वोत्तम पद्धत आहे.

टाईप १ च्या (IDDM) रुग्णांमध्ये मधुमेह झाल्याचे निदान झाल्यापासून पाच वर्षानंतर प्रत्येक वर्षी ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. तर टाईप २ च्या मधुमेही रुग्णांमध्ये सुरुवातीपासूनच दरवर्षी ही तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

मायक्रोअल्बुमिन्युरियाचा सकारात्मक निष्कर्ष मधुमेह रोग्यांमधील किडणी संबंधित रोगाची पहिली खुण असते आणि किडणी वाचविण्यासाठी तातडीने व सर्वोत्तम उपचार करणे गरजेचे असल्याची सूचनाही असते.

मधुमेहाच्या किडणीवर होणार्या परिणामांवरील उपचार

  • मधुमेहावर नेहमी योग्य नियंत्रण ठेवणे.
  • उच्चरक्तदाब नेहमी नियंत्रणात ठेवणे, दररोज रक्तदाब तपासून त्याची नोंद करणे, रक्तदाब १३०- ८० पेक्षा जास्त होऊ न देणे हे किडणीची कार्यक्षमता स्थिर राखण्यासाठीचे सर्वात महत्वपूर्ण उपचार आहेत.
  • ACEI आणि ARB ग्रुपच्या औषधांचा सुरुवातीला वापर केला गेला तर हि औषधे रक्तदाब कमी करण्याबरोबरच किडणीला होणारे नुकसान कमी करण्यातही मदत करतात.
  • सूज कमी करण्यासाठी डाई-युरेटिक्स औषधे घेण्याचा, तसेच खाण्यात कमी मीठ आणि कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
  • जेव्हा रक्तात युरिया आणि क्रिअॅटिनीनचे प्रमाण वाढते तेव्हा क्रॉनिक किडणी फेल्युअरसंबंधी जे उपचार सुचवले जातात, ते सर्व करण्याची गरज असते.
  • किडणी फेल्युअरनंतर मधुमेहावरील औषधातील बदल हे केवळ रक्तातील साखरेच्या तपासाच्या रिपोर्टवरच ठरवले गेले पाहिजेत. फक्त लघवीतील साखरेच्या रिपोर्टच्या आधारावर औषधांत परिवर्तन करू नये.
  • किडणी फेल्युअरनंतर साधारणपणे मधुमेहावरील औषधाचे प्रमाण कमी करण्याची गरज पडते.
  • मधुमेहासाठी दीर्घकाळापेक्षा, कमी काळापर्यंत प्रभावी ठरणाऱ्या औषधांना पसंती दिली जाते. मधुमेहावर उत्तम नियंत्रण राहावे यासाठी डॉक्टर बहुतेक रोग्यांमध्ये इन्सुलिनचा वापर करणे पसंत करतात.
  • बायगुएनाइडस (मेटफॉर्मिन) नावाने ओळखली जाणारी औषधे किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी घटक ठरत असल्याने ती बंद केली जातात.
  • किडणीचे काम जेव्हा पूर्णपणे बंद होते तेव्हा औषधे घेत असूनही रोग्याचा त्रास वाढतच जातो. अशा स्थितीत डायलिसीस किंवा किडणी प्रत्यारोपणाची गरज भासते.

 

स्त्रोत : Kidney Education Foundation

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate