অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूत्रोत्सर्जक तंत्र


तंत्र मूत्रोत्पादनाद्वारे शरीरातील द्रवीय त्याज्य पदार्थ गोळा करणे आणि त्यांचे उत्सर्जन करणे (शरीराबाहेर टाकणे) या क्रिया ज्या अवयव समुच्चयाकडून केल्या जातात, त्याला‘मूत्रोत्सर्जक तंत्र’ म्हणतात. काही निरुपयोगी पदार्थांचे उत्सर्जन ⇨ घर्म ग्रंथी (घाम), ⇨ फुप्फुसे (वायू व जलबाष्प) आणि आंत्रमार्ग [आतड्यांनी बनणारा व अन्नद्रव्ये वाहून नेणारा मार्ग; → मलोत्सर्ग] यांच्या मार्फतही होते.

मूत्रोत्सर्जक तंत्रामध्ये दोन ⇨ वृक्क (मूत्रपिंडे), दोन मूत्रनलिका, एक मूत्राशय व एक मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. प्रस्तुत नोंदीत वृक्क सोडून इतर भागासंबंधी माहिती दिली आहे. मूत्रोत्सर्जक तंत्र आणि ⇨ जनन तंत्र यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. दोन्ही तंत्रांतील कार्य एकाच अवयवामार्फत केले जाते; उदा., पुरुषातील मूत्रमार्ग फक्त मूत्र वाहून नेण्याचेच कार्य करीत नसून संभोगाच्या वेळी वीर्यवाहकही असतो. तंत्रांच्या हेतुसाध्यतेकरिता झालेल्या रचनात्मक मिश्रणामुळे दोहींचा विचार ‘मूत्र-जनन तंत्र’ किंवा ‘जनन-मूत्र तंत्र’ या नावाखालीही करतात. वैद्यकाच्या ‘मूत्रविज्ञान’ शाखेत पुरुषाच्या मूत्र-जनन तंत्राचा आणि स्त्रीच्या फक्त मूत्रोत्सर्जक तंत्राचा अभ्यास केला जातो.

प्रस्तुत नोंदीची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे :

(१)मानवेतर प्राण्यांतील उत्सर्जन तंत्र,

(२) भ्रूणविज्ञान,

(३)शारीर,

(४) शरीरक्रियाविज्ञान,

(५) मूत्रोत्सर्जक तंत्राच्या विकृती.

मानवेतर प्राण्यांतील उत्सर्जन तंत्रे

अपृष्टवंशी प्राणी (पाठीचा कणा नसलेले प्राणी)

आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील प्राण्यांत संकोचशील रिक्तिका (लहान पोकळ्या) उत्सर्जनाचे कार्य करतात. चापटकृमींत व इतर काही अपृष्ठवंशी प्राण्यांत ज्वालाकोशिकांमध्ये (एक प्रकारच्या पोकळ पेशींमध्ये) उत्सर्जक अवयवांची वैशिष्ट्ये आढळतात.

त्या मोठ्या व पोकळ कोशिका असून त्यांत ⇨ पक्ष्माभिकांचे (केसासारख्या वाढींचे) पुंजके असतात आणि त्यांच्या हालचालीमुळे द्रव निरुपयोगी पदार्थ उत्सर्जक नलिकांतून बाहेर टाकले जातात. वलीय (अनेलिडा) प्राणिसंघातील गांडूळ या प्राण्यात पक्ष्माभिका वृक्कक मुख (उत्सर्जक मुखे) देहगुहेतील (शरीरातील पोकळीतील) व रक्तवाहिन्यांतील त्याज्य पदार्थ वृक्कक रंध्रातून बाहेर टाकतात. कीटकवर्गीय मधमाशीचे मालपीगी नलिका (मार्चेल्लो मालपीगी या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिका) तिच्या शरीरद्रव्यातून निरुपयोगी पदार्थ गोळा करतात.

पृष्ठवंशी प्राणी

पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये यथाक्रमाने तीन वृक्क तयार होतात : (१) अग्रवृक्क, (२) मध्यवृक्क व (३) स्थायी वृक्क. अल्पवयीन भ्रूणात अग्रवृक्क अल्प नलिकांच्या स्वरूपात देहगुहेच्या अग्रपृष्ठीय भित्तीच्या आतील भागावर दिसू लागतो. अग्रवृक्कीय नलिका नावाच्या भागात या सर्व नलिका निःसारण करतात. लाळ्या मासा या प्राण्याशिवाय इतर सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये या नलिका अल्पजीवी असतात.

या नंतरच्या अवस्थेत अधिक गुंतागुंत असलेल्या नलिकांचा मध्यवृक्क तयार होतो. मासे व उभयचर (पाण्यात व जमिनीवरही राहणाऱ्या) प्राण्यात मध्यवृक्क तसाच राहून अंतिम वृक्क कार्य करतो. अग्रवृक्कीय नलिकेचे मध्यवृक्कीय नलिकेत अथवा व्होल्फीयन (के. एफ्. व्होल्फ या जर्मन भ्रूणवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या) नलिकेत नामांतरण होऊन तिच्या मार्फत मूत्र अवस्करात (ज्यात गुदद्वार, जनन-कोशिका वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा शरीराच्या मागील भागातील कोष्ठात, मूत्रपूरिषात) वा शरीराबाहेर टाकले जाते.

सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी व सस्तन प्राणी यांमध्ये तिसऱ्या प्रकारचा वृक्क मध्यवृक्काच्या मागच्या बाजूस तयार हातो. सूक्ष्मशारीरदृष्ट्या हा तिसरा वृक्क अधिक गुंतागुंतीचा आणि जटिल रचनेचा असतो; परंतु अधिक कार्यक्षमही असतो. तो आपली स्वतंत्र निःसारण नलिका बनवतो व तिला मूत्रवाहिनी म्हणतात. पुल्लिंगी प्राण्यात मध्यवृक्कीय नलिकेपासून रेतोवाहिनी बनते आणि स्रील्लिंगी प्राण्यात तिचा अपकर्ष होतो. साप, मगर अथवा सुसर आणि पक्षी यांमध्ये मूत्राशय नसतो आणि मूत्रवाहिन्या मूत्र अवस्करात नेतात व तेथून ते मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.

भ्रूणविज्ञान

मानवी मूत्रोत्सर्जक तंत्राचा पुष्कळसा भाग विशेषकरून उत्सर्जक भाग मध्यस्थ मध्यस्तरापासून बनतो आणि संकलक अथवा मूत्र गोळा करणारा भाग आद्य अवस्करांच्या अंतःस्तरापासून बनतो. कनिष्ठ वर्गीय सस्तन प्राण्यांप्रमाणेच मानवातही वृक्क तीन प्रकारच्या अवस्थांतून निर्माण होतो. पहिल्या दोन अवस्था अग्रवृक्क व मध्यवृक्क अल्पकालीन असून नाहीशा होतात; परंतु त्यांच्या नलिका जनन तंत्रात वापरल्या जातात. तिसरी अवस्था ‘पृश्चवृक्क’ या नावाने ओळखली जाते. तिची रचना अतिशय जटिल असून तीपासून अंतिम अवयव तयार होतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate