অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तंत्र दूधविक्रीचे...

एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्‍वासावर अवलंबून आहे. यासाठी उत्पादकाने विक्री तंत्र, ज्ञान आणि कौशल्याची आवश्‍यकता आहे.
आपला विभाग आणि बाजारपेठेनुसार दूधविक्रीचे नियोजन करावे लागते; परंतु सर्वसाधारणपणे व्यवसाय पूर्ण क्षमतेने तग धरण्यासाठी; तसेच भविष्यातील वृद्धीसाठी काही गोष्टींचा विचार, अभ्यास आवश्‍यक आहे. बहुतेक वेळा नवीन लहान व मध्यम प्रक्रियादारांना विपणासंबंधी खूप कमी किंवा अजिबात अनुभव नसतो. व्यवसाय सुरू करताना काही प्राथमिक गोष्टींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्‍यक आहे.

पदार्थ वितरण व्यवस्था

वितरण व्यवस्था --------- मध्यस्थ 
1) उत्पादक - ग्राहक ------------ 0 
2) उत्पादक - फेरीवाले- ग्राहक --- 1 
3) उत्पादक - प्रक्रियादार - ग्राहक - 1 
4) उत्पादक - प्रक्रिया करणारा 
किरकोळ विक्री - ग्राहक ------------- 2 
5) उत्पादक - प्रक्रिया करणारा 
किरकोळ विक्रेता - ग्राहक ----------- 2 
6) उत्पादक - दूध सहकारी संघ- 
प्रक्रिया करणारा - किरकोळ विक्रेता ग्राहक-- 3 
7) उत्पादक - दूध वाहक - प्रक्रियादार 
किरकोळ विक्रेता - ग्राहक ------------------ 3

टीप

मध्यस्थांच्या संख्येमुळे उत्पादक आणि ग्राहकांवर किमतीच्या बाबतीत फरक पडतो. विक्रीची जेवढी साखळी लहान तितका ग्राहकाला फायदा जास्त (कमी किमतीमुळे) आणि उत्पादकालाही चांगला नफा मिळतो. जास्तीच्या मध्यस्थामुळे पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढण्यास एक प्रकारची संधीच मिळते.

विपणन आणि दूध, दुग्ध पदार्थांची किंमत


1) उत्पादनाची किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा ग्राहकाच्या मागणीवर प्रभाव पडतो. 
2) विक्रीसाठी उत्पादनाची किंमत ही स्पर्धात्मक हवी. 
3) उत्पादनाच्या टप्प्यात दूध खरेदी, प्रक्रिया, पॅकेजिंग, कच्चा मालाची किंमत, साठवणूक, वितरण इ. खर्च कमीत कमी ठेवावा. किंवा हा खर्च कसा कमी राहील हे पाहावे.

दुग्ध पदार्थांच्या किमतीतील घटक

1) कच्चा दुधाची किंमत, 2) कच्चे दूध गोळा करणे, वाहतूक करणे, 3) प्रक्रियेचा खर्च 
4) विपणन आणि वितरण यासाठी लागणारा खर्च, 5) पॅकेजिंगचा खर्च, 6) कर, 7) विक्री साखळीच्या प्रत्येक पायरीवरचा नफा (दूध गोळा करणे, प्रक्रिया आणि विक्रीतील मार्जीन)

पदार्थाच्या वास्तववादी किमतींसाठी

बाजारातील कार्य ---------------------- खर्चातील घटक 
1) कच्चे दूध खरेदी -- कच्च्या दुधाचा खर्च, मजूर, लागणारी सामग्री, खरेदीतील मार्जीन 
2) वाहतूक ः मात्र वाहतुकीचा खर्च, सामग्री येणारा खर्च, वाहतुकीचे मार्जीन. 
3) प्रक्रिया ः कच्चा माल, त्यासाठीची यंत्रणा, उपकरणे, मजूर, पॅकेजिंग, वीज, वितरण आणि विपणन, प्रक्रियेतला मार्जीन. 
4) मार्केटिंग आणि वितरण ः वाहतूक, मजूर, सामग्री, भाड्याने देणे, किरकोळ विक्री मार्जीन. 

टीप ः स्थिर किंमती आणि बदलत्या किमती अशा श्रेणी पडतात. इमारत, यंत्रे यांचा घसारा इ. देखील यामध्ये ग्रहीत धरावा. हिशेब करताना खर्चाचे सर्व घटक ग्राह्य धरणे अभिप्रेत आहे.

विपणन माहितीची पद्धत आणि संशोधन


1) बऱ्याच ठिकाणी सर्व समावेशक विक्री माहितीचा अभाव असतो. अशा ठिकाणी प्रक्रियादाराने किंवा त्यांच्या संघटनेकडून छोटे मेळावे किंवा सभा आयोजित करून माहितीचा प्रसार करावा. 
2) बाजाराचे लहान सर्वेक्षण किंवा ग्राहकाचा अभ्यास यांद्वारे माहिती संकलित करावी. 
3) जो पदार्थ तुम्ही उत्पादित आणि विक्री करणार आहात, या संबंधीची जवळपास सर्व आवश्‍यक माहिती हवी. यामुळे कुठल्या प्रकारचा पदार्थ, कधी, कुठे आणि किती उत्पादित करावा आणि विक्री करावा यांचे ज्ञान होईल. यामुळे ग्राहकाला योग्य तो पदार्थ, योग्य त्या जागी निश्‍चित वेळेत पोहोचवल्यास तो ग्राहकांना उपलब्ध होईल.

नेमकी कोणती माहिती असावी ?

* कुठल्या विभागात विक्री करणार? 
* किमतीविषयक माहिती (किमतीतील बदल सवलत इ.). 
* एकूण ग्राहकांची संख्या आणि त्यांचे प्रकार. 
* सध्याची आणि भविष्यातील उत्पादन- पुरवठा पातळी. 
* बाजारातील स्पर्धेकांची संख्या आणि प्रकार. 
* दुधाचे विपणन, प्रक्रिया यांच्या व्यवहार्यतेचा अभ्यास. 
टीप ः दूध व दुग्धपदार्थांची विक्री किंवा प्रक्रिया या व्यवसायात उतरताना अगोदर व्यवहार्यतेचा अभ्यास करावा. जेणेकरून नियोजित व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता सिद्ध होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसायासाठी वास्तव्यकारक, वास्तववादी योजना करणे आवश्‍यक आहे.

व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी

* किती दूध उत्पादित होणार (सकाळ, संध्याकाळ). 
* त्या विभागातील सध्या दुग्धपदार्थ विकले जाण्याचे मार्ग. 
* स्थानिक उत्पादक किती पैसे घेतात? ताजे दूध तसेच प्रक्रिया पदार्थांच्या दराचा अभ्यास करावा. 
* आपल्या भागत उत्पादित होणाऱ्या पदार्थांच्या चवीचे ज्ञान असावे. यावरून ग्राहकाला पदार्थ आवडतो का नाही हे ठरविता येईल. 
* ऊर्जेचे स्रोत (इंधन, वीज, पाणी इ.) 
* मुख्य गुंतवणूक (जमीन, इमारत, यंत्रे, वीज इ.). 
* व्यवसायाचे स्पष्ट नियोजन. जे टिकून राहण्याची क्षमता व्यवहार्यता दर्शवेल.

व्यवसायाची मार्गदर्शक योजना

1. व्यवसायाचे वर्णन ः 
* कुठल्या प्रकारच्या व्यवसायाचे नियोजन आहे? 
* तुम्ही कशा प्रकारचे उत्पादन विकणार? 
* बाजारपेठेत कशा प्रकारची संधी आहे? (नवीन, विस्तार, हंगामाप्रमाणे, वार्षिक). 
* विक्रीच्या वाढीसाठी काय संधी आहेत? 

2. विक्रीची योजना 
* आपले संभावित ग्राहक कोण? 
* तुमचा बाजारपेठेतील हिस्सा, बाजारपेठेत ग्राहकांच्यामध्ये उत्पादन कसे प्रसिद्ध होईल ते कसे टिकून राहील? 
* तुमचे स्पर्धेक कोण? त्यांच्या व्यवसायाची कशी प्रगती होत आहे? 
* तुमच्या उत्पादनाची विक्रीसाठी प्रयत्न कसे करणार? 
* तुमचे पुरवठादार कोण? 
* तुमचा व्यवसाय कोठे स्थिर आहे?


3. संघटित नियोजन ः 
* व्यवसायाचे व्यवस्थापन कोण करेल? 
* व्यवस्थापकासाठी कुठली शैक्षणिक अर्हता पाहाल? 
* किती कर्मचाऱ्यांची गरज भासेल? 
* पैशाचे नियोजन कसे कराल? (यामध्ये सुरवातीस आवश्‍यक गुंतवणूक ग्राह्य धरलेली आहे.) 
* तुम्ही नोंदी कशा ठेवाल? 
* कायदेशीर मालकी कशी निवडाल आणि का? 
* कुठल्या प्रकारच्या परवान्यांची गरज आहे? 
* कुठल्या नियमांचा व्यवसायावर परिणाम होईल?
4. आर्थिक नियोजन 
* पहिल्या वर्षी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज. 
* व्यवसाय सुरू करण्यास किती खर्च आवश्‍यक आहे? 
* पहिल्या वर्षी फायदा घेण्यासाठी किती विक्रीची गरज आहे? 
* उत्पादनात कसा विराम असेल? 
* यंत्रांसाठी किती भांडवल आवश्‍यक आहे? 
* एकूण किती पैशांची गरज आहे? 
* संभवनीय निधीचा स्तोत्र. 
* कर्ज कसं घ्याल? (तारण, सुरक्षितता)

विक्री तंत्रातील अनुभवाचे बोल

(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत)

आपल्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ होण्यासाठी उत्पादनाला विशिष्ट "ब्रॅंड नेम' तसेच लोगो आवश्‍यक आहे. विक्री करताना पॅकेजिंगही चांगले हवे. 
विक्रीचे नियोजन ः 
* किरकोळ विक्रीसाठी विविध दुकाने, मॉल. 
* हॉटेल्ससाठी रोज लागणारे पदार्थ म्हणजे पनीर, दही, चक्का. यात पनीर हा जास्त आवश्‍यक पदार्थ आहे. 
* आचारी, जेवणाचे कंत्राट घेणारे यांच्याशी संपर्क ठवून त्यांना वेळोवेळी आवश्‍यक पनीर, दही, चक्का, खवा, बासुंदी, अंगुर रबडी, रसमलाई पुरवता येईल. 
* आचारी, जेवणाचे कंत्राट घेणाऱ्या लोकांशी सतत संपर्क ठेऊन लग्नाच्या तारखेनुसार पदार्थांची आगाऊ नोंदणी करता येईल. 
* लग्नसमारंभासाठीचे हॉल, लॉन्स यांच्या मालकांशी संपर्क ठेऊन त्या ठराविक दिवशी आवश्‍यक दुग्धपदार्थ पुरवता येतील. 
* हॉस्पिटलसाठी आवश्‍यक, कमी फॅटचे दूध, चॉकलेट दूध इ. पुरवता येईल. 
* आपल्या आजूबाजूच्या भागातील कॉलनीमध्ये काही खास दुग्धपदार्थांचे तांत्रिकदृष्ट्या आरोग्यासाठीचे महत्त्व पटवून देऊन दुग्धपदार्थ विकता येईल. 
* पदार्थाची पौष्टिकता, गुणवत्ता, त्यांची आवश्‍यकता (वैज्ञानिक दृष्टिकोनातून), तयार करतानाची स्वच्छता याचे संगणकावर सादरीकरण करून ग्राहकाचा विश्‍वास संपादन करता येईल.
संपर्क डॉ. धीरज कंखरे ः 9405794668.

स्त्रोत : अग्रोवन

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate