मूत्राशयाच्या श्लेष्मकलास्तर (पातळ बुळबुळीत अस्तर) व अधःश्लेष्म या भागांच्या दाहयुक्त सुजेला ‘मूत्राशयशोथ’ म्हणतात. बहुधा तीव्र प्रकारात आढळणाऱ्या या विकृतीत मूत्रमार्गशोथही त्याच वेळी असतो. सर्वसाधारणपणे संपूर्ण मूत्रोत्सर्जक मार्गाची संसर्गजन्य विकृती असून प्रमुख लक्षणे ज्या भागासंबंधी अधिक स्पष्ट आढळतात, त्या भागावरून रोगास नाव देण्यात येते. मूत्राशयशोथ बहुधा सूक्ष्मजंतू संसर्गजन्य असून व्हायरस, कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) किंवा विषारी रासायनिक पदार्थ (उदा. सायक्लोफॉस्फामाइड) त्यास कारणीभूत असू शकतात. सायक्लोफॉस्फामाइड हे औषध अंतस्त्य प्रतिरोपणाच्या (एखादे सबंध इंद्रिय, उदा., हृदय, दुसऱ्या शरीरात बसविण्याच्या) शस्त्रक्रियेनंतर प्रतिरक्षादमनकारक (बाह्य पदार्थ शरीरात शिरल्यावर त्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रथिनांच्या- प्रतिपिंडाच्या-निर्मितीचे दमन करणारे) म्हणून वापरतात. सूक्ष्मजंतूंमध्ये ८०% ते ९०% कॉलिफॉर्म गटाचे (आंत्रमार्गात-आतड्यांत-नेहमी असणारे) सूक्ष्मजंतू असतात. याशिवाय प्रोटियस, स्यूडोमोनस, क्लेबसिएल्ला, एन्टोरोकोकाय (आंत्र गोलाणू) व पुंज गोलाणू हे सूक्ष्मजुंतू प्रकारही, विशेषेकरून रुग्णालयात ज्या रोग्यांच्या मूत्रमार्गात सुषिरीसारख्या (मूत्र काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नलिकेसारख्या) उपकरणांचा उपयोग करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये आढळतात. क्षयरोग सूक्ष्मजंतू व प्रमेहगोलाणू कधी कधी कारणीभूत असतात.
प्रवृत्तिकर कारणांमध्ये लिंग (स्त्रियांत पुरुषांपेक्षा दसपट अधिक), गर्भारपण, मूत्रावरोध, मुतखडा, अर्बुद (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ) वगैरे तंत्रिकाजन्य (मज्जातंतुजन्य) मूत्राशय विकृती इत्यादींचा समावेश होतो.
सर्वसाधारणपणे प्राकृतिक (सामान्य) मूत्र निर्जंतुक असते. मूत्र वारंवार बाहेर टाकण्याची क्रिया, मूत्राची प्रत्यक्ष जंतुनाशनक्षमता,त्यातील यूरियाचे अतिसांद्रण व अती तर्षण या गोष्टी अल्प प्रमाणात मूत्राशयात शिरलेल्या सूक्ष्मजंतूंच्या नाशास पुरेशा असतात. मूत्राशयात सूक्ष्मजंतूंचा शिरकाव बहुधा खालून वर (आरोही) म्हणजे मूत्रमार्गातून मूत्राशयाकडे होतो. स्त्रियांमध्ये आखूड मूत्रमार्ग, तसेच योनिमार्ग व गुदद्वार यांचे सान्निध्य यांमुळे गुदद्वाराभोवतालचे सूक्ष्मजंतू या मार्गाने सहज मूत्राशयात प्रविष्ट होत असावेत. या कारणामुळे १५% स्त्रियांमध्ये त्यांच्या जीवनकालात केव्हाना केव्हा तरी मूत्रोत्सर्जन तंत्राचा (संस्थेचा) सूक्ष्मजंतू संसर्ग झाल्याचे आढळते. पुरुषात हा रोग बहुधा पंचेचाळिशीनंतर आढळतो. पुरुषात अष्ठीला ग्रंथीचा स्रावही सूक्ष्मजंतुनाशक असतो.
प्रमुख लक्षणांमध्ये मूत्र वारंवारता, मूत्रकृच्छ्र (लघवी करताना वेदना होणे) व रक्तमेह (मूत्रात रक्त उतरणे) यांचा समावेश होतो. वेदनामय, वारंवार व थेंब थेंब लघवी होऊन मूत्रमार्गाची आग होणाऱ्या लक्षणसमूहाला उन्हाळे लागणे असेही म्हणतात. मूत्र गढूळ असून कधी कधी दुर्गंधी येते. अधिजघन भागात, तसेच पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात व नैश-बहुमूत्रता अथवा निशामेह (रात्रीतून बरेच वेळा लघवी होणे) ही लक्षणे उद्भवतात.
निदानाकरिता वरील लक्षणांसहित मूत्राची सूक्ष्मदर्शकीय आणि सूक्ष्मजंतुशास्त्रीय परीक्षा उपयुक्त असतात. सूक्ष्मजंतू संवर्धन (कृत्रिम रीतीने पोषकद्रव्ये पुरवून सूक्ष्मजंतूंची वाढ करणे) संसर्ग असल्याचे सिद्ध करण्यास मदत करते. पूमेह (मूत्रामध्ये पुवाची उपस्थिती) असूनही सूक्ष्मजंतू न आढळल्यास क्षयरोग सूक्ष्मजंतू संसर्गाची शक्यता असते. काही स्त्री रुग्णांमध्ये कधीकधी लक्षणे असूनही मूत्रापासून सूक्ष्मजंतू संवर्धित होत नाहीत. या विकृतीचा उल्लेख ‘मूत्रमार्ग लक्षणसमूह’ असा करतात.
उपचारामध्ये सूक्ष्मजंतूंची संवेदनशीलता बघून औषधयोजना करणे योग्य असते. कधी कधी लक्षणे एवढी तीव्र व गंभीर असतात की,उपाययोजना ताबडतोब सुरू करावी लागते. अशा वेळी रोगेतिहासावरून व अंदाजाने औषध ठरवावे लागते. कोट्रायमोक्साझोल,ट्रायमेथोप्रिम, अँपिसिलिन, नायट्रोक्यूरांटॉइन किंवा नालिडिक्सिक अम्ल यांपैकी कोणतेही एक सूक्ष्मजंतुनाशक योग्य मात्रेत तोंडाने देतात. उपचार पूर्ण आठवडा चालू ठेवतात. अलीकडे ॲमॉक्सिसिलीन ३ ग्रॅ. एकाच मात्रेत पुरते, असे आढळले आहे. लक्षणांचा जोर २४– ४८ तासांत कमी न झाल्यास औषध बदलून बघतात. मूत्राशयशोथाचा व संभोगाचा संबंध आढळल्यास संभोगानंतर वरीलपैकी कोणत्याही एका औषधाची एकच मात्रा लक्षणांची तीव्रता रोखू शकते. रोग पुनरावर्तित होण्याच्या कारणांमध्ये चुकीची औषधयोजना,अपूर्ण औषधोपचार काल, प्रतिरोधी सूक्ष्मजंतूंची निर्मिती, औषधाचे विकृतिस्थानी योग्य सांद्रण न होणे, पुरुषांत अष्ठीला ग्रंथीची वृद्धी, स्त्रियांत मूत्रवरोधाची कारणे आणि मूतखडे यांचा समावेश होतो. स्त्रियांमध्ये पुनरावर्तनाची अधिक शक्यता असते व दीर्घकालीन उपाययोजनेची गरज असते.
संदर्भ : 1. Datey, K. K.; Shah, S. J., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1979.
2. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, 1984.
लेखक : य. त्र्यं. भालेराव
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/9/2020
(रेटिक्युलो–एंडोथेलियल सिस्टिम). शरीरातील विविध भा...
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टि...
य विभागात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र ...
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील राजेंद्र निमकर या...