पुरुषांमध्ये मूत्रनलिका लांब असते आणि वळण घेऊन शिश्नात जाते. स्त्रियांमध्ये मूत्रनलिका आखूड आणि सरळ असते. म्हणून स्त्री मूत्रनलिकेतून जंतुदोष मूत्राशयात जाणे त्या मानाने सोपे असते. म्हणून स्त्रियांमध्ये मूत्राशयदाह जास्त प्रमाणात आढळतो.
मूत्रपिंडाचे मुख्य काम म्हणजे मूत्र तयार करणे. यामुळे शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात. शरीरातील अनेक जैवरासायनिक क्रियांमध्ये टाकाऊ पदार्थ तयार होतात. या टाकाऊ पदार्थांपैकी काही पदार्थ मूत्रपिंडात वेगळे काढले जातात. मूत्रपिंड म्हणजे एक नैसर्गिक गाळणे आहे. रोहिण्यांमार्फत शरीरातले रक्त मूत्रपिंडात येते. इथे ते केशवाहिन्यांच्या जाळयातून खेळवले जाते. मूत्रपिंडात असंख्य सूक्ष्म गाळण्या असतात. केशवाहिन्यांमधून काही टाकाऊ पदार्थ व पाणी या गाळण्यांमध्ये उतरते. हेच मूत्र असते. मूत्रपिंडातल्या असंख्य गाळण्यांतून तयार झालेले मूत्र थेंबाथेंबाने मूत्रवाहिनीतून मूत्राशयात जमते. मूत्राशय पुरेसे भरले, की लघवीची जाणीव होऊन इच्छेनुसार आपण मूत्र बाहेर टाकतो.
लघवी होणे ही शरीराची अगदी महत्त्वाची क्रिया आहे. मूत्रनिर्मिती बंद पडली तर अनावश्यक पदार्थ शरीरात तुंबतात व मृत्यू ओढवू शकतो. मूत्रनिर्मितीचे काम अनेक कारणांनी बंद पडू शकते. एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुलाब व उलटयांमुळे जास्त प्रमाणात शोष होणे. यामुळे मूत्रपिंडाचे काम पाण्याअभावी व कमी रक्तपुरवठयामुळे बंद पडते. म्हणूनच खूप जुलाब,उलटया होऊन शुष्क झालेल्या रुग्णाला लघवी होते की नाही हे विचारणे फार महत्त्वाचे आहे.
चोवीस तासांत लघवी झाली नसल्यास मूत्रपिंडे कायमची बंद पडू शकतात. अशा रुग्णांना जीवनजल, सलाईन यांबरोबर लॅसिक्सचे इंजेक्शन किंवा गोळी देणे आवश्यक आहे. लॅसिक्स या औषधामुळे मूत्रपिंडाचे काम पंधरा मिनिटांत सुरू होते पण त्यासाठी शरीरातले पाण्याचे प्रमाण सुधारणे आणि ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे. लघवी बंद होण्याची इतरही कारणे आहेत.
शरीरात दोन मूत्रपिंडे असली तरी एका मूत्रपिंडावर काम चालू शकते. म्हणूनच मूत्रपिंडदान (एक मूत्रपिंड) करणे शक्य असते. मूत्रपिंडाची व मूत्रनलिकेची रचना व स्थान लक्षात घेता, या अवयवांच्या आजारात दुखण्याची जागा थोडीफार निश्चित असते.
मूत्रपिंडाच्या आजारात दुखणे पाठीमागे असते,तर मूत्रवाहिनीच्या (खडे, इत्यादी कारणांमुळे) दुखण्याचा 'पट्टा' ही निश्चित असतो. मूत्रनलिकेचे दुखणे लघवीच्या जागी जाणवते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 5/7/2020
उत्सर्जनसंस्था म्हणजे शरीरात तयार होणारे टाकाऊ पदा...
मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आज...
लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्ह...