मूत्रसंस्था ही पूर्णपणे निर्जंतुक संस्था असते.
मूत्रपिंडाचा नरसाळयासारखा तोंडाचा भाग, मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रनलिका या सर्वांना मिळून मूत्रमार्ग असे म्हणतात. मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आजार आहे.
याची कारणे अनेक प्रकारची आहेत. मूत्रमार्गात जंतुदोष सहसा खालून प्रवेश करतो. याला मुतखडे, लिंगसंसर्ग बाधा, शस्त्रक्रिया, इत्यादी अनेक कारणांपैकी एखादे कारण असते. लघवी अडल्याने नळी घालून ती काढल्यावरही कधीकधी जंतुदोषाची बाधा होते.
स्त्रियांमध्ये मूत्रनलिका आखूड असल्यामुळे बाहेरून जंतू आतपर्यंत लवकर पोचतात व जंतुदोष होतो. मासिकपाळीत स्वच्छता न पाळल्यास बाहेरचा जंतुदोष मूत्रमार्गात येण्याचा धोका असतो.
लैंगिक संबंधानंतर, विशेषतः पहिल्या काही दिवसांत स्त्रीपुरुषांना मूत्रसंस्थेचा जंतुदोष होऊ शकतो.
काही वेळा शरीरात इतरत्र असलेला जंतुदोष मूत्रसंस्थेत येऊन हा आजार तयार होतो.
काही रुग्णांच्या बाबतीत असे कोणतेही कारण दिसत नसतानाही स्वतंत्रपणे मूत्रमार्गाचा जंतुदोष झालेला दिसतो.
अशा प्रकारे मूत्रपिंडाकडून 'वरून' किंवा मूत्रनलिकेतून 'खालून' मूत्रसंस्थेचा जंतुदोष होतो. यामुळे आतील नाजूक आवरणास सूज येते व तयार झालेला पू लघवीत उतरतो. अशा वेळी लघवी गढूळ होणे, वारंवार होणे, जळजळ यांपैकी लक्षणे दिसतात. याबरोबरच ताप, पोटात दुखणे, उलटया, इत्यादी त्रास होतो.
आग होऊन लघवीला वारंवार जावे लागणे (उन्हाळी) यावरून मूत्रमार्गदाह झाला अशी शंका घ्यावी. लघवी गढूळ असणे हे याचे प्रमुख चिन्ह आहे. यासाठी एका (पांढऱ्या काचेच्या) स्वच्छ बाटलीत लघवी घेऊन थोडेसे हलवून पाहिल्यावर गढूळपणा कळतो. याशिवाय वारंवार मूत्रदाह होत असल्यास जंतुदोषाचे कारण कळण्यासाठी आणखी तपासण्या करणे आवश्यक ठरते. यात मुख्य म्हणजे पोटाचे क्ष-किरणचित्र किंवा सोनोग्राफी आवश्यक असते. बऱ्याच वेळा मुतखडे हेच जंतुदोषाचे कारण असते.
मूत्रमार्गाचा जंतुदोष हा नेहमी आढळणारा आजार आहे. या बाबतीत काही वेळा तज्ज्ञांचा सल्ला व उपचार आवश्यक ठरतात. पण काही विशिष्ट नियम पाळून गावपातळीवर आपण उपचार करू शकतो. कोझाल गोळया देऊन उपचाराची सुरुवात करा. कोझाल ऐवजी डॉक्सी किंवा ऍमॉक्सी या गोळयाही उपयुक्त आहेत. त्याबरोबर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
याबरोबर तापासाठी पॅमाल किंवा ऍस्पिरिन द्यावे.
लघवीची आग, जळजळ तात्पुरती कमी होण्यासाठी फेनाडिन ही गोळी वापरावी.
काही स्त्रियांना मूत्रमार्गाचा जंतुदोष वारंवार होतो. अशा स्त्रियांनी शरीरसंबंधाच्या आधी व नंतर लघवी करावी आणि पाणी वापरून स्वच्छता करावी. यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता कमी होते. याचबरोबर कोझालची एक गोळी शरीरसंबंधानंतर घेणे उपयुक्त आहे. जास्त पाणी पिण्यामुळे जंतुदोष लवकर बरा होतो.
उपचाराने एक-दोन दिवसांत फरक न पडल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे. नुसती लघवीस जळजळ असल्यास बहुधा एवढया उपचाराने आराम पडतो. मात्र पुरेसे उपचार घेणे आवश्यक असते. अर्धवट उपचार झाले तर जंतुलागण शिल्लक राहते. यामुळे मूत्रपिंडालाच धोका पोहोचू शकतो.
खूप ताप, पोटात कळ येणे, उलटया, पोटात मूत्रपिंडाच्या जागी दाबल्यावर दुखरेपणा,लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तदाब वाढणे, इत्यादी खाणाखुणा दिसल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाकडे पाठवावे.
मूत्रमार्गाचा किरकोळ जंतुदोष-(लघवीस जळजळ) वारंवार होत असल्यास एकदा तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. याचे मूळ कारण शोधणे आवश्यक असते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 4/25/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...