অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तोंड येणे

तोंड येणे : लहान मुले

 

 

 

 

 

दूधपित्या मुलांमध्ये ब-याच वेळा एका प्रकारच्या बुरशीमुळे तोंड येते. शाईसारखे एक औषध (जेंशन) यावर गुणकारी आहे. याचा एक थेंब जिभेवर टाकला, की आपोआप तोंडभर पसरतो. या औषधाचा उपयोग तीन-चार दिवस होतो. हे औषध पोटात गेले तरी चालते.

तोंड येणे : नंतरच्या वयात

  • 'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो व तिथे झोंबते. हळूहळू तिथे जखम तयार होते व ती खूप दुखते. हा आजार 8-10 दिवस चालतो व नंतर बरा होतो.
  • जेवणात पालेभाज्या असल्या, की बहुधा हा आजार होत नाही.
  • सतत चहा-कॉफी, तंबाखू, धूम्रपान, दारू, इत्यादी व्यसनांनीही तोंड येते.
  • पोटात जंत, आमांश वगैरे जुने आजार असले तर तोंड येते. अशा वेळी मूळ आजारावर उपचार करावा.
  • काही जणांना विशिष्ट पदार्थामुळे किंवा औषधाने वावडे म्हणून तोंड येते. उदा. काही जणांना 'मसाला' गरम पडून तोंड येते.
  • दातांमध्ये गालाचा किंवा जिभेचा भाग चावला गेल्याने तोंड येते.
  • एड्स या आजारात तोंडात बुरशीने व्रण येतात.

हिरडयांचा आजार

काही वेळा हिरडयांना सूज आल्यामुळे तोंड येते. अशा वेळी दिवसातून तीन-चार वेळा मिठाच्या पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. जेंशनचे एक-दोन थेंब औषध हिरडयांवर लावावे. लिंबू, पेरू किंवा आवळा अशी 'क' जीवनसत्त्वयुक्त फळे खाण्यात असल्यास हिरडया मजबूत व निरोगी राहण्यास मदत होते.

कर्करोगाची सुरुवात ?

तोंडात किंवा जिभेवर दीर्घकाळ बरी न होणारी जखम किंवा पांढरट चट्टा असल्यास कर्करोगाची भीती असते. यासाठी वेळीच तज्ज्ञाला दाखवा. तसेच आत कोठेही चट्टा खरखरीत भाग, गाठ आल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाला दाखवा.

एड्सची शंका

वारंवार तोंड येणे, बुरशी होणे हे एड्सच्या आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे. मात्र याबद्दल डॉक्टरच तपासणी करु शकतील.

उपचार

मूळ कारण माहीत असल्यास त्यावर उपचार व्हावेत. 'ब' जीवनसत्त्वाच्या गोळया रोज एक याप्रमाणे पाच दिवस घेतल्यावर उपयोग होईल. याबरोबरच मेडिकल स्टोअरमध्ये'लॅक्टोबॅसिलस' (पचनसंस्थेतील जिवाणूंच्या गोळया) मिळतात. अशी रोज एक गोळी पाच दिवस द्यावी. या जिवाणूंमुळे पचनसंस्थेतील समतोल साधला जातो. दही खाल्ल्याने देखील हे जंतू आपोआप मिळतात. म्हणून अशा रुग्णांनी दही खावे.

तोंड येण्यावर आयुर्वेदिक उपचार

खालीलपैकी काही घरगुती उपचार करून पाहा

  • तोंड येण्यावर जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. यासाठी जाईची 5-6 पाने स्वच्छ धुवून चघळावीत. चघळताना रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अशी काळजी घेणे आवश्यक आहे. रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. असे दिवसातून 3-4 वेळा,या प्रमाणे 4-5 दिवस करायला सांगावे.
  • दुसरा एक उपाय म्हणजे सहाणेवर तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठमध उगाळून गंध तयार करावे. तोंडातील अंतर्भागात हे गंध सगळीकडे झोपताना लावावे (चूळ भरू नये). असे 4-5 रात्री करावे.
  • सोनकाव सायीत मिसळून व्रणावर लावल्यास वेदना कमी होते.
  • तुरटीच्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने चूळ भरल्यास वेदना काही काळ कमी होते.
  • हळद लावण्याने व्रण लवकर भरुन येतो.
  • तोंड आलेल्या ठिकाणी जात्यादि तेलाने गुळणी करावी.
  • इरिमेदादी तेल लावल्याने तोंडातला व्रण सौम्य होतो.
  • वारंवार तोंड येण्याचा त्रास असल्यास त्यामागे (काही जणांच्या बाबतीत) बध्दकोष्ठाचा त्रास असण्याची शक्यता असते, अशांना संध्याकाळच्या जेवणानंतर दोन-तीन तासांनी तेल किंवा तूप (पाच-सहा चमचे) द्यावे. त्यानंतर लगेच एक कप गरम पाण्याबरोबर गंधर्वहरीतकी किंवा बहाव्याचा मगज (दीड ग्रॅम) घेण्याचा सल्ला द्यावा. यामुळे पहाटे पोट साफ होते. असे दर 2-3 दिवसांनी चार-पाच वेळा करावे. याबरोबरच तोंड येणा-या व्यक्तींनी तिखट, अतिखारट व आंबलेले अन्नपदार्थ टाळावेत.

होमिओपथी निवड

नायट्रिक ऍसिड, आर्सेनिकम,फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, सिलिशिया, सल्फर

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate