অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वल्कचर्म

वल्कचर्म

‘ब’ गटातील जीवनसत्‍त्‍वांपैकी निअ‍ॅसीन  व उच्च प्रतीची (प्राणिज) प्रथिने या अन्नघटकांच्या न्यूनतेमुळे हा रोग होतो. त्वचाविकार, अतिसार व मनोविकार ही याची मुख्य लक्षणे असतात. मका हे धान्य मुख्य अन्नघटक असणाऱ्या आणि उच्च प्रतीची प्रथिने (दूध, अंडी, मांस इ.), ताज्या भाज्या व फळे यांचा आहारात अभाव असणाऱ्या गरीब लोकांमध्ये हा रोग मुख्यत्वे आढळतो. मक्यातील निअ‍ॅसीन हा घटक बद्ध रूपात असल्याने खाणाऱ्यास त्याचा उपयोग होत नाही. तसेच ज्या  ट्रिप्टोफेन या आवश्यक अ‍ॅमिनो अम्ला पासून शरीरात निअ‍ॅसीन तयार केले जाऊ शकते ते अ‍ॅमिनो अम्ल मक्यात नसते.

खरखरीत त्वचेवरून या रोगास वल्कचर्म (झाडांच्या सालीसारखी वा खवलेदार कातडी) हे नाव पडले आहे (इटालियन भाषेतील पेले आग्रा-खरखरीत त्वचा-या शब्दांवरून याचे पेलाग्रा हे इंग्रजी नाव पडले आहे). विशिष्ट रोग म्हणून याचे प्रथम वर्णन स्पेनमधील कासाल यांनी १७३० मध्ये केले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिण भाग, आग्न्येय यूरोप व आफ्रिका या भागांत हा रोग मुख्यत्वे आढळतो. तसेच आशिया, दक्षिण अमेरिका व भारताच्या काही भागांत हा आढळतो; परंतु आता याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. मक्यावर अवलंबून नसणाऱ्यां मध्येही विशेषतः मद्यपानाच्या आहारी गेलेल्यांमध्ये व अन्नाच्या कुशोषणास (अयोग्य शोषणास) कारण होणाऱ्या पचन तंत्राच्या (पचन संस्थेच्या) कोणत्याही चिरकारी (जुनाट विकारात) हा रोग आढळतो. या रोगाची (विशेषतः त्वचाविकाराची) तीव्रता उन्हाळ्यात वाढते व हिवाळ्यात कमी होते.

सूर्यप्रकाशात उघड्या राहिलेल्या शरीराच्या भागांवर त्वचा भाजल्याप्रमाणे लाल दिसते व सुजते. तिथे खाज येते व आग होते. नंतर कातडीवर पुरळ व फोड येतात. चिरण्या पडतात. काही वेळा चिघळणाऱ्या जखमाही होतात. चिरकारी रोग्यांत त्वचा जाड व खडबडीत होते व ती कोरडी, खवल्याखवल्यांसारखी व काळपट तपकिरी दिसते.

तोंड सोलून निघते, ओठांच्या कोपऱ्यांना चिरण्या पडतात व जीभ गुळगुळीत लाल होऊन सुजते व दुखते. वरच्या पोटात आग होते. तोंडाप्रमाणेच सर्व पचनमार्गाचा शोध (दाहयुक्त सूज) हे अतिसाराचे कारण असून पाण्यासारखे, मोठ्या प्रमाणात व काही वेळा रक्त शेमयुक्त जुलाब होतात. चिरकारी रोग्यात क्वचित मलावरोधही असू शकतो.

सौम्य रोगात थकवा, चिंता, विषण्णता, उत्तेजनक्षमता, मन एकाग्र करता न येणे इ. लक्षणे आढळतात. रोगाच्या तीव्र स्वरूपात उन्मादावस्था येते; तर चिरकारी स्वरूपात विस्मरण, मानसिक दौर्बल्य इ. गोष्टी आढळतात (यामुळेच या रोग्यांना काही वेळा मनोरूग्णालयात दाखल केले जाते.) जास्त चिरकारी रोग्यांत मेरु रज्जूच्या पार्श्व स्तंभामध्ये ऱ्हास होऊन त्यानुसार इतर तंत्रिका तंत्रीक (मज्जा संस्थेशी संबंधित) लक्षणे आढळतात.

विशिष्ट लक्षणांबरोबरच सर्वसाधारण कुपोषण व इतर विशिष्ट अन्नघटकांचा अभाव दर्शविणारी लक्षणेही आढळतात.

रोग्याच्या स्थितीत त्वरित बदल घडवून आण्ण्यासाठी निअ‍ॅसीन किंवा त्याहीपेक्षा निकोटिनामाइड (निअ‍ॅसिनामाड) १०० मिग्रॅ. रोज चार ते सहा वेळा तोंडावाटे दिले जाते. इतर अनेक सर्वसाधारण कुपोषणाची व विशिष्ट घटकांच्या कमतरतेची लक्षणे आढळत असल्याने ते ते घटकही ( मुख्यतः ‘क’ व ‘ब’ गटातील इतर जीवनसत्त्वे ) योग्य प्रमाणात द्यावे लागतात. उच्च प्रतीची प्राणिज प्रथिने, पुरेशी कार्बोहायड्रेटे, स्नि ग्ध पदार्थ, फळांचे रस, ताज्या भाज्या इत्यादींची आहारात जरूरी असते. जुलाबाची तक्रार असल्यास प्रथम हलका आहार आवश्यक असतो. यांशिवाय विश्रांती व त्या त्या लक्षणांप्रमाणे उपचारांची जरूर पडते (उदा., मानसिक विकारांत शामके, जुलाबात द्रव पदार्थ वाहिनीमार्फत शरीरात भरणे इत्यादी).

रोग सौम्य असल्यास उपचारांचा लगेच परिणाम होतो. बराच काळ तीव्र स्वरूपात रोगग्रस्त असणाऱ्या व्यक्तीत मात्र उपचारानंतरही ऱ्हासयुक्त कायमस्वरूपी बदलांमुळे तंत्रिका तंत्रीय व पचन तंत्रीय लक्षणे पूर्ण नाहीशी होत नाहीत. या रोगात सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने इतर रोग (उदा., क्षयरोग, जुलाब इ.) होण्याची शक्यता वाढते व पूर्वी त्यामुळे मृत्यूही येत असे. शिक्षणाचा प्रसार, आहारातील बदल, बदललेली सामाजिक परिस्थिती, बदललेले शेतीधोरण, सुधारित दळणवळण इ. अनेक कारणांमुळे या रोगाचे प्रमाण व तीव्रता आता खूप कमी झालेली आहे.

 

संदर्भ : 1. Bicknell, F.; Prescott, F.The Vitamins in Medicine, London, 1953.

2. Boyd, W. A. Textbook of Pathology, Philadelphia, १९६१.

3. Petersdorf, R.G.; Adams, R. D. and others, Eds. Harrisen’s Principles of Internal Medicine, New Delhi, 1983.

लेखक - रा. प. प्रभुणे,/ म. आ. रानडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate