অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेह

मधुमेह

कार्बोहायड्रेट या अन्नघटकाच्या चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमधील ) विकृतीमुळे मूत्रातून बरेचसे ग्‍लुकोज उत्सर्जित होत असलेल्या रोगाला मधुमेह (गोड अथवा मधुर मूत्रोत्सर्जन ) म्हणतात. केवळ या एकाच लक्षणावरून जरी या रोगाला हे नाव दिले गेले असले, तरी प्रत्यक्षात तो काही लक्षणसमूहांचा बनलेला असतो. या लक्षणांमध्ये प्रामुख्याने रक्तातील ग्‍लुकोजाच्या पातळीतील वाढ (अतिग्‍लुकोजरक्तता), केशवाहिन्यांचे (सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणाऱ्या अतिसूक्ष्म वाहिन्यांचे) काठिण्य, अविशिष्ट प्रकारचा रोहिणीविलेपीविकार (मोठ्या व मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांतील सर्वात आतील स्तरात वसा-स्‍निग्धपदार्थ-व तत्सम पदार्थ आणि कोलेस्टेरॉल यांची पुटे साचल्याने उद्‌भवणारा विकार ),⇨ अग्‍निपिंडातील ⇨इन्शुलीन उत्पादक बीटा कोशिकांची अकार्यक्षमता व तंत्रिकाविकृती (मज्‍जाविकृती) यांचा समावेश होतो; तसेच रोगोत्पादनाशी आनुवंशिक व परिसरीय अशा दोन्ही कारणांचा संबंध असतो.

इतिहास

ईजिप्त, चीन व भारत या देशांमध्ये मधुमेह या रोगाची कल्पना प्राचीन काळापासून असावी. इ. स. पू. सोळाव्या शतकात लिहिलेल्या ‘एबर्स पपायरस’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या वैद्यकीय कागदपत्रात मधुमेहाच्या लक्षणांचा उल्लेख सापडतो. सुश्रुत (इ.स.पू. पाचवे शतक ) व चरक (इ.स. दुसरे शतक ) या भारतीय प्राचीन वैद्यांना या रोगाच्या आज ज्ञात असलेल्या अनेक पैलूंविषयी माहिती होती. त्यांनी स्थूलता व मधुमेह यांच्या संबंधाचा, तसेच हा विकार एका पिढीतून दुसरीत ‘बीजा’ द्वारे प्रेषित होण्याचाही उल्लेख केला होता. इ. स. १००० च्या सुमारास अरबी वैद्य इव्‌न सीना (अँव्हिसेना) यांनी मधुमेही रुग्णाचे मूत्र गोड असल्याचा आणि मधुमेह व कोथ (शरीराचा एखादा भाग मृत होऊन तो सडू लागणे) यांचा संबंध असल्याचा उल्लेख केला होता. टॉमस विलिस (१६२१-७५) हे मधुमेहातील मूत्राच्या गोडीचा निर्देश करणारे पहिले यूरोपीय वैद्य होते व त्यांनी मधुमेहाचे रोगवर्णनही केले होते. यामुळे या रोगाला पूर्वी ‘विलिस रोग’ असे नाव दिले गेले होते. शंभर वर्षानंतर १७७५ च्या सुमारास डॉडसन यांनी ही गोडी शर्करेमुळे प्राप्त होते आणि ही शर्करा वृक्कनिर्मित (मूत्रपिंडनिर्मित) नसून वृक्के फक्त तिच्या उत्सर्जनाचे कार्य करतात, असे दाखविले.

इ. स. पहिल्या शतकात अँरिटीअस व सेल्सस यांनी ‘निनाल’ (सायफन) या अर्थाचा मोठ्या प्रमाणातील मूत्रोत्सर्जन दर्शविणारा ग्रीक शब्द प्रथम वापरला. त्यापासून इंग्रजी भाषेतील ‘डायाबेटिस’ हा शब्द तयार झाला. लॅटिन भाषेतील ‘मध’ या अर्थाच्या ‘मेलिटस’ या शब्दाची जोड देऊन या रोगाचे इंग्रजी नाव ‘डायाबेटिस मेलिटस’ तयार झाले.

क्लोद बेर्नार (१८१३-७८) या फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिकांनी १८५० मध्ये ग्‍लुकोजाची रक्तातील अती वाढ व मधुमेह यांचा संबंध प्रथम दाखविला. १८६९ मध्ये पाउल लांगरहान्स (१८४७-८८) यांनी अग्‍निपिंडातील विशिष्ट कोशिका पुंजांचे (पेशींच्या पुंजांचे) वर्णन केले होते व या इन्‍शुलीननिर्मितीशी संबंधित असलेल्या पुंजांना ‘लांगरहान्स द्वीपके’ असे नाव देण्यात आले. ओस्कार मिंको व्हस्की (१८५८-१९३१) आणि जोसेफ फोन मेरींग (१८४९-१९१०) या शास्त्रज्ञांनी शस्त्रक्रियेने प्राण्यातील अग्‍निपिंड काढून टाकून प्रायोगिक मधुमेह निर्माण केला होता. ई. एल्. ओपी या विकृतिवैज्ञानिकांनी १९०७ साली लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांचा अभ्यास करून त्यांचा मधुमेहाशी संबंध असल्याचे दाखवून दिले. १९२१ मध्ये ⇨सर फ्रेडरिक ग्रांट बँटिंग व ⇨चार्ल्‌स हर्बर्ट बेस्ट या शास्त्रज्ञांनी अग्‍निपिंडापासून इन्शुलीन मिळविले आणि १९२२ मध्ये ए. ए. फ्लेचर यांनी मधुमेहावरील उपचारात त्याचा प्रथम उपयोग केला. सल्फोनामाइड औषधांचा रक्तातील ग्‍लुकोजाची पातळी कमी करण्याचा गुणधर्म जांबोन या शास्त्रज्ञांच्या लक्षात १९४२ मध्ये आकस्मिक रीत्या आला. १९५५ मध्ये फ्रँक व फुक्स या शास्त्रज्ञांनी कारब्युटामाइड या सल्फोनामाइडाचा हा गुणधर्म एका संसर्गजन्य रुग्णाच्या उपचारामध्ये पाहिला व त्यानंतर अनेक सल्फॉनिल यूरिया गटातील तोंडाने गोळीच्या रूपात घ्यावयाच्या मधुमेहरोधी औषधांचा उपयोग सुरू झाला. १९५७ मध्ये उंगर यांनी बायग्वानिडे मधुमेहात वापरली व ती परिणामकारक असून धोकारहित असल्याचे दाखवून दिले.

प्रादुर्भाव

मधुमेहाचे निश्चित निदान ठरवणारी पुष्कळशी प्रमाणे आजच्या काळात त्याज्य ठरल्यामुळे प्रादुर्भावाचा अंदाज करणे कठीण बनले आहे. सर्वसाधारणपणे नेहमी आढळणाऱ्या रोगांपैकी तो एक असून जगातील त्याचे प्रमाण वाढत आहे. (१) जगातील मधुमेहींची संख्या ६ कोटी असावी, असा अंदाज आहे. विकसनशील व विकसित देशांतून वाढत्या आयुर्मर्यादेबरोबर मधुमेहाचे प्रमाणही वाढत आहे. याला वाढत्या वयाबरोबर शरीराची कमी होणारी ग्‍लुकोजसह्यता हे कारण आहे. पाश्चात्त्य देशांतून व्यक्त मधुमेहाचे प्रमाण लोकसंख्येच्या १.२% आढळले आहे. भारतातील नागरी रहिवाशांत ते १.५% आणि ग्रामीण भागात ०.५% आढळते. १९६६ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील रुग्णालयीन लोकसंख्येपैकी १.१% मधुमेही असल्याचे आढळले होते. दक्षिण भारतात बहुतांश लोकांचा आहार प्रामुख्याने तांदूळ असल्यामुळे तिथे मधुमेह अधिक आढळतात. अलीकडील एका पहाणीनुसार भारतातील १५ ते ३० वर्षे वयोगटातील मधुमेहींचा बालवयातील प्रथिन अपपोषणाशी संबंध असल्याचे आढळले आहे. केरळ राज्यात या प्रकारच्या मधुमेहाचा अग्‍निपिंडशोथाशी (अग्‍निपिंडाच्या दाहयुक्त सुजेशी) व अग्‍निपिंडरसवाहिनीतील अश्मरीशी (सामान्यत: कॅल्शियम फॉस्फेटासारखे खनिज द्रव्य एकत्र गोळा होऊन तयार होणाऱ्या खड्याशी) संबंध असल्याचे आढळले आहे. रुग्णालयीन पाहणीनुसार भारतातील काही शहरांमधील रुग्णालयांतील एकूण रुग्णापैकी मधुमेहींचे प्रमाण पुढीलप्रमाणे आढळले आहे : पाँडिचेरी ०.७%,हुबळी २.२%,लखनौ २.३%, दिल्ली २.२६%,मुंबई २.६%, हैदराबाद ४.१२%, त्रिवेंद्रम ८.७% आणि मद्रास ११.३%. पारशी, सिंधी व ख्रिश्चन या अधिक वसायुक्त (स्‍निग्ध पदार्थयुक्त) अन्न सेवन करणाऱ्या अल्पसंख्यांक जमातींतून मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे. ज्यूलोकांतही मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.

संप्राप्ती

मधुमेह हा एक लक्षण समूह असल्यामुळे विविध कारणे मिळून तो उत्पन्न होत असावा. त्याच्या संप्राप्तीविषयी अजून पुष्कळशी माहिती अज्ञात असून बहुधा कोणतेही निश्चित कारण सांगता येत नाही. तथापि दोन निश्चित कारणांचा संबंध ज्ञात झाला आहे: (१) आनुवंशिकता व (२) अतिपोषण (स्थूलता).

आनुवंशिकता : आनुवंशिकतेचा व मधुमेहाचा संबंध असल्याचे प्राचीन काळापासून ज्ञात असावे. या विषयाचा सखोल अभ्यास झाला असून एकूण माहितीबद्दल अजूनही मोठे मतभेद शिल्लक आहेत. मधुमेही रोग्यांच्या जवळच्या नातलगांत हा रोग उद्‌भवण्याचे प्रमाण अधिक आढळते. कोणत्याही एका जन्मदात्याकडून (माता किंवा पिता) रोग अपत्यात प्रेषित होतो. माता व पिता दोघेही मधुमेही असल्यास अपत्यात तो उद्‌भवण्याची शक्यता जवळजवळ ५०% असते. मधुमेही मातेच्या एकयुग्मजीय (एकाच अंडापासून तयार झालेल्या ) जुळ्यामध्ये मधुमेह उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते. अशा जुळ्यापैकी दोन्ही अपत्यांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर मधुमेह उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते व या प्रकाराला ‘मिलाफी’रोगोत्पत्ती म्हणतात. जुळ्यापैकी एकासच मधुमेह झाल्यास त्या प्रकाराला ‘विसंगत’ रोगोत्पत्ती म्हणतात. जनुक निर्मित [आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या एककांमुळे निर्माण झालेल्या आनुवंशिकी; जीन] इतर काही विकृतींमध्ये पुष्कळ वेळा मधुमेहही आढळतो. जननिक वाहक स्वत: मधुमेही न होता, अपत्यामध्ये रोगकर प्रवृत्ती प्रेषित करू शकतो. बालमधुमेहातील तीव्र प्रारंभाला जननिक कारणे असल्याचे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या –पेशींच्या –समूहाच्या ) तपासणीवरून समजू शकते. मधुमेही व मधुमेह-प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या रक्तरसात अल्ब्युमीन या प्रथिनाला बद्ध असलेले इन्शुलीन-प्रतिरोधक द्रव्य असल्याचे व्हॉलेन्स, ओवेन व लिली या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे.

विकृत कार्बोहायड्रेट चयापचय आनुवंशिक व जन्मजात असला, तरी मधुमेहाची सुरुवात स्थूलता, सूक्ष्मजंतुसंसर्ग, यकृत विकृती, तीव्र कावीळ, स्टेरॉइडांचा चिकित्सात्मक उपयोग या कारणांतून होऊ शकते. या गोष्टी शारीरिक ताण निर्माण करणाऱ्या आहेत.

स्थूलता

मधुमेही रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण स्थूल असतात. खादाडपणामुळे अग्‍निपिंडातील लांगरहान्स द्वीपकांतील कोशिकांवर ताण पडतो. हा ताण मधुमेहाची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीत मधुमेहाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरतो. दोन जागतिक युद्धांच्या वेळी अन्न नियंत्रणामुळे पोषणावर परिणाम होऊन मधुमेहाचा प्रादुर्भाव व मृत्युप्रमाण कमी झाल्याचे आढळले होते. अन्न प्रकारातील बदल, अन्नाचे अतिशुद्धीकरण, नागरीकरण, वाहन सुविधा व शारीरिक श्रमांचा अभाव हे मधुमेहाच्या प्रादुर्भाव वाढीस कारणीभूत आहेत.

[⟶ स्थूलता ].

मधुमेह कोणत्याही वयात उद्‌भवू शकतो; परंतु ८० % रुग्ण पन्नाशीच्या वरचे असतात. पाश्चात्त्य देशांत ५५ ते ६५ वर्षे वयोगटातील रोगी सर्वाधिक आढळतात. भारतात ही वयोमर्यादा ४५ ते ५५ दरम्यान आहे. बालवयीन (वयाच्या पंधराव्या वर्षापूर्वी होणारा मधुमेह) क्वचित आढळतो आणि त्याचे प्रमाण १ ते ४ % च आहे. मध्यमवयीन रूग्णांत स्त्रियांचे प्रमाण अधिक दिसते. गर्भारपण व बहुप्रसवता रोगोत्पादनास हातभार लावतात.

काही ⇨ अंत:स्रावी ग्रंथी (ज्यांचा उत्तेजक स्राव व-हॉर्मोन-वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तात मिसळतो अशा ग्रंथी)व मधुमेह यांचा संबंध असावा. विशालांगता (हाडांची व मऊ ऊतकांची अपसामान्य वाढ होणे) ही ⇨पोष ग्रंथीची विकृती बहुधा मधुमेहासह आढळते. पोष ग्रंथीचे मधुमेहोत्पादक हॉर्मोन (वृद्धी हॉर्मोन) लांगरहान्स द्विपकांतील कोशिकांवर दुष्परिणाम करते. कधी-कधी पोष ग्रंथीच्या स्रावाची न्यूनता मधुमेहात सुधारणा करीत असल्याचेही आढळते.⇨ अवटू ग्रंथीच्या स्रावाचे आधिक्य आणि न्यूनता हे दोन्ही ग्‍लुकोज चयापचयावर परिणाम करतात.⇨ अधिवृक्‍क ग्रंथीची हॉर्मोने प्रायोगिक व मानवी मधुमेहावर परिणाम करतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate