অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्रुटिजन्य विकार

आहारातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना सामान्यपणे त्रुटिजन्य विकार म्हणतात. या विकारांमध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचा समावेश होतो. आहारात मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यास होणाऱ्या या विकारास कुपोषण म्हणतात.

प्रथिने व कर्बोदके यांचे त्रुटिजन्य विकार

प्रथिनांच्या कमतरतेमुळे क्वाशिओरकोर हा विकार होतो. क्वाशिओरकोर विकारात शरीरात पाणी साठण्याचे प्रमाण वाढते, शरीराला सूज येते, त्वचेचा रंग बदलतो तसेच पायाची त्वचा कोरडी पडते. हा विकार १-५ वर्षे वयाच्या बालकांमध्ये प्रामुख्याने आढळतो. प्रथिने व कर्बोदके यांच्या कमतरतेमुळे बालशोष (मराज्मस) विकार होतो. हा विकार एक वर्षापेक्षा लहान असलेल्या बालकांमध्ये आढळतो. स्तनपानाच्या अभावी कर्बोदके आणि प्रथिने या दोन्हींच्या कमतरतेमुळे हा विकार उद्भवतो. या विकारात बालकाचे स्नायू दुर्बल होतात व त्वचा हाडांना चिकटल्यासारखी भासते.

जीवनसत्त्वांचे त्रुटिजन्य विकार

वनस्पती जीवनसत्त्वे तयार करतात. मात्र, सर्व प्राण्यांना जीवनसत्त्वे आहारातून मिळवावी लागतात. प्राण्यांच्या शरीरात जीवरासायनिक प्रक्रियांमध्ये जीवनसत्त्वे सहविकरे म्हणून कार्य करतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे माणसांमध्ये विविध विकार होतात. उदा., अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे बालकांमध्ये मुडदूस होतो, तर प्रौढांची हाडे ठिसूळ होतात. ई जीवनसत्त्वाच्या अभावामुळे पांडुरोग होतो आणि वंध्यत्व येऊ शकते. क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे स्कव्र्ही हा आजार होतो आणि शरीराची प्रतिकार यंत्रणा क्षीण होते. ब१ (थायमीन) जीवनसत्त्वाच्या अभावामुळे बेरीबेरी, ब२ (रिबोफ्लाविन) जीवनसत्त्वाच्या अभावामुळे मुखशोथ, ब३ (नायसीन) जीवनसत्त्वाच्या अभावामुळे पेलाग्रा, ब९ (फॉलिक आम्ल) आणि ब१२ (सायनोकोल्बामिन) या जीवनसत्त्वांच्या अभावामुळे पांडुरोग होतो (पहा : जीवनसत्त्वे).

खनिज त्रुटिजन्य विकार

आहारातील कार्बन, हायड्रोजन, ऑॅक्सिजन आणि नायट्रोजन ही मूलद्रव्ये कर्बोदके, प्रथिने आणि मेदाम्ले या कार्बनी संयुगांच्या स्वरूपात असतात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरीन, जस्त (झिंक), मँगनीज,मॅग्नेशियम, लोह (आयर्न), तांबे आणि आयोडीन ही मूलद्रव्ये क्षारांच्या स्वरूपात असतात. यांच्याही कमतरतेमुळे विकार उद्भवू शकतात. रक्ताचा सामू (पीएच मूल्य) नियंत्रित करण्यामध्ये आहारातील खनिजांचा महत्त्वाचा वाटा आहे. पेशीबाह्य द्रव्य, पेशीद्राव आणि रक्त यांचे सामू ७.४ राखला जातो. त्यात बदल झाल्यास पेशीचे कार्य थांबते.

पोटॅशियम

दररोजची पोटॅशियमाची गरज सामान्यपणे ४७०० मिग्रॅ. आहे. घेवडा, उकडलेले बटाटे, केळी, शेवगा, शहाळ्याचे पाणी, बीट, लिंबूवर्गीय फळे व मासे हे पोटॅशियमाचे स्रोत आहेत. पोटॅशियम एटीपी (अ‍ॅडिनोसीन ट्राय फॉस्फेट) नियंत्रणाचे कार्य करते. शरीरात ९५% पोटॅशियम पेशींमध्ये आणि ५% रक्तामध्ये असते. ही पातळी कमी झाल्यास रक्तदाब वाढतो. पोटॅशियमाची पातळी फार कमी झाल्यास स्नायूंमध्ये आणि चेतांमध्ये वेदना होतात. अतिसार आणि वृक्काच्या आजारात शरीरातील पोटॅशियमाची पातळी कमी होते.

सोडियम

प्रौढ व्यक्तीची दररोजची गरज सामान्यपणे १५०० मिग्रॅ. असते. मिठापासून शरीराला सोडियम मिळते. पोटॅशियमासोबत सोडियम एटीपी नियंत्रणाच्या कार्यास मदत करते. सोडियमाचे शरीरातील प्रमाण सहसा बदलत नाही. पेशींतील सामू आणि पाण्याचे प्रमाण स्थिर राखण्यासाठी सोडियम आवश्यक असते. पेशींतील सोडियम कमी झाल्यास सोडियमन्यूनता समजली जाते. कॉलरा व अतिसार अशा आजारांत शरीरातील पाण्याबरोबर सोडियम बाहेर टाकले जाते. अशा वेळी समपरासरणी लवणद्राव (सलाइन) शिरेवाटे देऊन सोडियमाचे प्रमाण पूर्ववत करतात.

क्लोरीन

सोडियम क्लोराइडाबरोबर क्लोरीन शरीरात घेतले जाते. क्लोरिनची शरीरातील पातळी कमी झाल्यास विद्युत अपघटनी नियमन बिघडते आणि परिणामी श्वसन सावकाश चालते. मोठ्या प्रमाणात उलट्या आणि अतिसार झाल्यास रक्ताची आम्लता कमी होऊन शरीरातील क्लोरीन कमी होते.

कॅल्शियम

प्रौढ व्यक्तीची कॅल्शियमाची गरज दररोज सामान्यपणे १००० ते १२०० मिग्रॅ. असते. हिरव्या पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कवचयुक्त फळे आणि बिया, मासे हे कॅल्शियमाचे स्रोत आहेत. हृदयाचे आकुंचन, अन्ननलिकेचा क्रमसंकोच, तांबड्या रक्तपेशींची निर्मिती आणि त्यांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. शरीरातील कॅल्शियमाची मात्रा कमी झाल्यास हाडे ठिसूळ होतात आणि स्नायू व सांधे दुखतात. रक्त गोठण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात रक्तातील कॅल्शियम कमी झाल्यास रक्त साकळण्याचा कालावधी वाढतो.

फॉस्फरस

प्रौढ व्यक्तीची फॉस्फरसाची गरज दररोज सु. ८०० मिग्रॅ. आहे. अंडी, दूध, मांस, मासे, पिठे, आख्खी फळे, पालेभाज्या, केळी इत्यादी फॉस्फरसाचे उत्तम स्रोत आहेत. हाडांमधील हा एक महत्त्वाचा घटक असून पेशीतील ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी फॉस्फेटच्या स्वरूपात त्याचा वापर होतो. जीवरासायनिक क्रियांमध्ये फॉस्फरस हा फॉस्फेटच्या स्वरूपात वापरला जातो. फॉस्फरसाची कमतरता सहसा उद्भवत नाही. कॅल्शियमाच्या कमतरतेशी संलग्न असलेले विकार फॉस्फरसाच्या कमतरतेशीही संलग्न असतात.

मॅग्नेशियम

प्रौढ व्यक्तीची दररोजची मॅग्नेशियमाची गरज सु. ४२० मिग्रॅ. असते. पालेभाज्या, बदाम, काजू, गव्हाचा कोंडा, सोयाबीन, घेवडा, कोको इत्यादींमध्ये मॅग्नेशियम उपलब्ध असते. सामान्यपणे ३०% मद्यपींमध्ये मॅग्नेशियमाची कमतरता आढळून येते. शरीरातील सु.३०० विकरांच्या कार्यामध्ये मॅग्नेशियम सहघटक म्हणून कार्य करते.

लोह (आयर्न)

प्रौढ पुरुषांत लोह दररोज सामान्यपणे ८ मिग्रॅ. तर प्रौढ स्त्रीत १८ मिग्रॅ.पर्यंत आवश्यक असते. गरोदर स्त्रियांबाबतीत हे प्रमाण २७ मिग्रॅ.पर्यंत असते. हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, घेवडा, नाचणी, उडीद, चवळी, पेरू, बीट, अंडी आणि मांस हे लोहाचे मुख्य स्रोत आहेत. शरीरातील हीमोग्लोबिन निर्मितीसाठी लोह आवश्यक असते. लोहाचे प्रमाण कमी झाल्यास पांडुरोग होतो. भारतातील बहुतांश स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता आढळून येते.

आयोडीन

प्रौढ व्यक्तीकरिता दररोज आयोडिनाची सु. ०.१५० मिग्रॅ. इतकी आवश्यकता असते. सागरी मीठ आणि सागरी मासे यांपासून आयोडीन मिळते. सैंधव मिठात (खनिज मीठ) आयोडीन नसल्याने हे मीठ ज्या भागातील लोक खातात त्या लोकांमध्ये आयोडिनाची कमतरता दिसून येते. डोंगराळ प्रदेशात वर्षानुवर्षे खाणीतील मीठ वापरणाऱ्या लोकांमध्ये आयोडिनाच्या कमतरतेमुळे अवटू ग्रंथींना सूज येते. आयोडिनाच्या अभावामुळे मतिमंदता उद्भवू शकते,गॉयटर आणि इतर अवटू ग्रंथीचे विकार होऊ शकतात. भारतामध्ये खाण्याच्या मिठात सोडियम आयोडेट मुद्दाम मिसळलेले असते.

तांबे

सामान्यपणे प्रौढ व्यक्तीची दररोजची गरज सु. ०.९०० किग्रॅ. इतकी असते. त्वचेतील मेलॅनिनाच्या निर्मितीसाठी, चेतांवरील मायलीन आच्छादनाच्या मजबुतीसाठी, निरोगी केसांसाठी, काही विकरांचा सहघटक म्हणून तसेच हीमोग्लोबिन तयार होण्यासाठी शरीराला तांबे आवश्यक असते. याखेरीज सिलिनियम, मॉलिब्डेनम, मँगनीज व झिंक शरीराला सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. या खनिजांची कमतरता सहसा आढळत नाही. सिलिनियम प्रतिऑॅक्सिडीकारक म्हणून काम करते. मॉलिब्डेनम काही विकरांमध्ये सहघटक म्हणून उपयोगी पडते. झिंक यकृतातील अल्कोहॉलचे विघटन करणाऱ्या विकरासाठी आवश्यक असते. मँगनीज संयोजी ऊती व अस्थी यांचे घटक आणि विकरे इत्यादींचे सहघटक म्हणून आवश्यक असते.

 

मद्वाण्णा, मोहन

स्त्रोत: कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate