इ. स. ५७० मध्ये स्वित्झर्लंडमधील बिशप ऑफ अॅव्हेन्चेस यांनी फ्रान्स व इटलीमधील देवीच्या साथींचा प्रथम उल्लेख केल्याचे आढळते. देवी या रोगास असलेले दुसरे पर्यायी नाव ‘व्हॅरिओला’ हे त्यांनीच प्रथम वापरले. त्यानंतर दहाव्या शतकात पर्शियातील हकीम अबूबाकर मोहमंद इब्न झकेरिया ऊर्फ राझेस यांनी देवी आणि गोवर यांमधील फरक दर्शविणारा निबंध लिहिला.
यूरोपमधील या रोगाच्या सविस्तर नोंदी पंधराव्या शतकापासूनच्या मिळतात. सोळाव्या, सतराव्या व अठराव्या शतकांत या रोगामुळे मानवाच्या एकूण जीवनावर झालेले भयंकर दुष्परिणाम वर्णिलेले सापडतात. गावेच्या गावे ओस पडल्याची, असंख्य लोक विद्रूप झाल्याची, अनेकांना अंधत्व आल्याची पुष्कळ उदाहरणे दिलेली आहेत. अठराव्या शतकात तर केवळ बोटावर मोजता येतील एवढेच लोक या रोगाच्या तडाख्यातून बचावले असावेत. चीनमध्ये तर या रोगाची एवढी जबरदस्त धास्ती वाटे की, कोणतीही माता आपल्या अपत्यास देवी येऊन गेल्याशिवाय ते वाचणारच नाही. अशीच खात्री मनात बाळगून असे.
अमेरिकेचा शोध लागल्यानंतर पंधरा वर्षांनी, १५२० च्या सुमारास, स्पॅनिश लोकांनी देवीचा रोग पश्चिम गोलार्धात प्रथम पोहोचविला. एकूण जवळजवळ ६०,००,००० तद्देशीयांपैकी ३५,००,००० अल्पकाळातच देवीला बळी पडले. यूरोपच्या गोऱ्या लोकांनी वापरलेल्या दारूगोळ्यापेक्षाही हा भूप्रदेश जिंकण्यास त्यांना देवी या रोगाने अधिक मदत केली असावी.
या व्हायरसांचे आकारमान मोठे (२०० ते २५० मायक्रोमायक्रॉन्स; १ मायक्रोमायक्रॉन = १०–९ मिमी.) असून साध्या सूक्ष्मदर्शकाखाली देवीच्या रोग्याच्या फोडाच्या पूयिका अवस्थेतील द्रवांत किंवा फोड फोडून त्याखालील त्वचेच्या खरवडलेल्या भागात विशिष्ट अभिरंजन (रंगविण्याच्या) पद्धतीने ते सहज दिसू शकतात. ते त्वचेच्या उपकला कोशिका द्रवात (अस्तराच्या पेशीतील द्रवात) वाढतात. व्हायरस पुंजांना ‘ग्वार्निएरी कण’ (जी. ग्वार्निएरी या इटालियन वैद्यांच्या नावावरून) म्हणतात. प्रत्यक्ष व्हायरसांना ‘पाशेन मूलकण’ (ई. पाशेन या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. शुष्कावस्थेत हे व्हायरस काही वर्षे टिकू शकतात. इंग्लंडमधील एका खेड्यात स्मशानात प्रेत पुरावयास जागा नसल्यामुळे तीस वर्षांपूर्वी देवीने मेलेल्या एका मृताची शवपेटी काढून टाकून ती जागा वापरावयाचे ठरले. शवपेटी भरभक्कम राहिली होती; पण ती फोडताच भयंकर दुर्गंधी जवळपास पसरली. एवढीच नव्हे तर त्या खेड्यातील फक्त दोन व्यक्तींशिवाय इतर सर्वांना ‘सौम्य देवीचा’ रोग उद्भवला. अॅबर्डीन येथील देवीचे रोगी अलग ठेवण्याकरिता बांधलेल्या व ते पाच वर्षे वापरात नसताना, एका रुग्णालयाचे बांधकाम पाडून टाकणाऱ्या मजुरास देवी आल्याचेही उदाहरण नमूद करण्यात आले आहे.
संसर्ग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न होऊ शकतो. दुसरा कोणताही प्राणी रोगवाहक नसून हा मानवापासूनच मानवात फैलावतो. तो पूर्वरूपापासूनच सांसर्गिक असून संसर्गोत्पादकता रोग्यामध्ये सतत वाढत जाते व तिचा उच्चबिंदू फोडांवरील खपल्यांमध्ये संपतो. तळहात, तळपाय व डोक्यावरील खपल्या सर्वांत जास्त संसर्गोत्पादक असतात. पूर्वरूपामध्ये रोगाचा फैलाव बिंदुजन्य स्वरुपाचा (बोलताना शिंकताना व खोकताना उडणारे अतिसूक्ष्म द्रवबिंदू व्हायरसजन्य असण्याचा) असल्यामुळे जवळच्या व्यक्तींमध्ये तो फैलावण्याची शक्यता असते. रोगाचा फैलाव संक्रामणी पदार्थही (रोग्याचे कपडे, भांडी वगैरे) करू शकतात. वायुजन्य फैलावाबद्दल अजून दुमत आहे. काहींच्या मते असा फैलाव १·५ किमी. पर्यंतही शक्य आहे. याउलट मुंबईच्या आर्थर रोड संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयातील १० वर्षांच्या पाहणीमध्ये वायुजन्य फैलावास पुरावा मिळालेला नाही. हा रोग एकदा होऊन गेलेल्या रोग्यास तो पुन्हा होत नाही म्हणजेच त्याच्यामध्ये आयुष्यभर पुरेशी प्रतिरक्षा तयार होते. या रोगाविरुद्ध नैसर्गिक प्रतिरक्षा असत नाही. सर्व जाती व वंश तसेच कोणत्याही वयात तो होऊ शकतो. गौरवर्णियांपेक्षा काळ्या रंगाच्या लोकांत तो होण्याचा संभव अधिक असतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी...
पुरंदर गडकिल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व यु...
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...
प्रत्येक गावाला आपली एक ओळख असते. त्या ओळखीच्या खा...