অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंदोरे

इंदोरे

वेशीवरच्या पाऊलखुणा : इंदोरे

भुत्तोंच्या आठवणीत हरविलेले इंदोरे

एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी तेथील आठवणींनी गाव मोहरलेले असते. हे मोहरलेलेपण गावाला वेगळेपण मिळवून देते अन् आपण दूरावलो असलो तरी अजूनही एकमेकांच्या मिठीतच आहोत, ही भावनाही प्रबळ करते. एका रेषेने देशाच्या स‌ीमा आखून दिल्याने दुरावलेली माणसे गावातून दूरावली असली तरी मनाच्या गावात अजूनही वावरतायेत असा अनुभव झुल्फीकार अली भुत्तोंचे इंदोरे गाव देत राहते. इंदोरे गावच्या नसानसात भुत्तोंच्या हरविलेल्या आठवणी पहायला मिळतात.

नाशिक-दिंडोरी रस्त्यावर नाशिकपासून २० किलोमीटरवर तळेगाव दिंडोरी हे गाव आहे. या गावातून इंदोरेकडे रस्ता जातो. साधारण तीन किलोमीटर गेल्यावर इंदोरे गावची (ता. दिंडोरी) प्राथमिक शाळा आपले स्वागत करते. शेती हा मुख्य व्यवसाय असलेले इंदोरे गाव अवघे तीनशे उंबरांचे आहे. गावातील घरे प्रामुख्याने मातीची असल्याचे पहायला मिळते. त्यावर कौलांचा साज गावाची भटकंती करायला आकर्षित करते. इंदोरे हे गाव मुस्लिम सरदारांना इनाम मिळालेले गाव! हे गाव मुस्लिम सरदाराला इनाम का मिळाले असावे हे गावाची भौगोलिक रचना पाहिली की, लगेच लक्षात येते. इंदोरे रामशेज किल्ल्याच्या मागे असल्याचे दिसते. महाराणा प्रतापांच्या मृत्यूनंतर (१५९७) मुस्लिम आक्रमणे व अत्याचार वाढल्याने इंदोरमधील लोक सुरक्षित ठिकाणाच्या शोधात रामशेजजवळ व‌िसावली. हे लोक इंदोरकडून आल्याने त्यांना इंदोरे म्हटले गेले. यातून गावाला इंदोरे असे नाव पडले असावे, असेही म्हंटले जाते.

रामशेज किल्ला ताब्यात मिळविण्यासाठी १६६४ पासून १६८७ पर्यंत मुगलांनी अनेक आक्रमणे केली. रामशेजने २४ वर्षे मुगलांच्या आक्रमणांना सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे रामशेजच्या मोहिमेवर असलेले सरदार हमखास रामशेजच्या परिसरातील गावांमध्ये लुटालुट करून ताबा मिळवित व तेथे सैन‌िकांची वसाहत तयार होई. याच दरम्यान इंदोरे गाव मुस्लिम सरदाराला इनाम म्हणून मिळाले असेल. या आक्रमणांनी त्रासलेले इंदोरे गावचे लोक तेथून इतरत्र निघून गेले असावेत, असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गाव मुस्लिमबहुल असले तरी गावातील हिंदू-मुस्लिम एकोपा हेच गावचे वेगळेपण असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हनुमान जयंतीला गावचा उत्सव मिरवणूक व चांदशावली बाबांचा संदल एकत्रच निघते. यात दोन्ही समाज एकमेकांच्या उत्सवात हिरीरीने सहभागी होतात. गावातील मस्जिद-ए-सादिक शाह हुसेनी व गावचे हनुमान मंदिर शेजारीशेजारी आहेत. मात्र इंदोरेची आठवणीत हरविलेली खरी ओळख म्हणजे पाकिस्तानचे ९ वे पंतप्रधान व चौथे राष्ट्राध्यक्ष झुल्फीकार अली भुत्तोंचे इंदोरे गाव. भुत्तोंचे पूर्वज याच गावात विसावले होते.

झुल्फीकार अली भुत्तो यांचा जन्म ५ जानेवारी १९२८ मध्ये पाकिस्तानमधील सर शहानवाज भु्त्तो या श्रीमंत मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. ते ब्रिटिश लष्करात देवळाली कॅम्प येथे मोठ्या हुद्द्यावर होते. त्यामुळे त्यांचा नाशिक शहर व जिल्ह्याशी जवळचा संबंध होता. ब्रिटीश लष्करात असताना त्यांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याच्या दृष्टीने पाकिस्तानातील संपत्ती विकून नाशिकच्या छोट्याशा गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इंदोरेत सध्याच्या मारूती मंदिराजवळ भुत्तोंचा मोठा वाडा होता. तो आता नाही; मात्र आजही ज्येष्ठ ग्रामस्थ त्या वाड्याबद्दल भरभरून बोलतात. ८ सप्टेंबर १९५१ मध्ये भुत्तोंचा विवाह झाला. तत्पूर्वीच देशाची फाळणी झाली होती. झुल्फीकार अली भुत्तोची मुलगी बेनझीर आईच्या गर्भात असताना भुत्तो कुटुंबियांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंदोरेतील भुत्तोंच्या जमिनीचा सर्व कारभार नाशिकमधील रानडे वकील पहात असत. फाळणीमुळे पाकिस्तानीतील सिंधी व्यापाऱ्यांची मालमत्ता घेऊन आपली मालमत्ता भुत्तोंनी त्यांना सोपविली व ते पाकिस्तानात गेले. त्याच वर्षी म्हणजे २१ जून १९५३ ला बेनझीर भुत्तोंचा जन्म पाकिस्तानात झाला. बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. हा आनंद इंदोरेंच्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो.

पाकिस्तानला गेल्यावर झुल्फीकार अली भुत्तोंनी पाकिस्तान पीपल्स पक्षाची स्थापना केली. त्यानंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षही झाले. मात्र लोकशाहीच्या जोरावर निवडून आलेल्या भुत्तोंना कसुरी खून खटल्यात झिया-उल-हक यांच्या लष्करी राजवटीने ४ एप्रिल १९७९ ला मध्यरात्री फाशी दिली. हा क्षण इंदोरे गावातील ग्रामस्थांना अस्वस्थ करणारा होता. फाशीची बातमी इंदोरेत धडकल्यानंतर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करून दुखवटा पाळला. त्यानंतर बेनझीर भुत्तोंच्या हत्येनंतरही या गावात हीच स्थिती पहायला मिळाली. गावातील मातीतून गेलेला एखादा माणूस इतका मोठा होतो, हा अभिमान इंदोरेतील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर झळकताना पहाता येतो.

पाकिस्तानबाबत असलेली अढी या ऋणानुबंधाला आड येत नाही. त्यामुळेच गावात भुत्तो कुटुंबियांबद्दल मोठ्या आदराने बोलले जाते. भुत्तोंबद्दल नव्या पिढीला फारसे माहिती नसल्याने ही आठवण पुसट होईल, अशीही भीती त्यांच्याकडून व्यक्त होते. मात्र इंदोरे म्हटले की भुत्तोंचे गाव हा ठसा कायम असल्याचे मोहमद्द अली सय्यद अली आवर्जून सांगतात. ९१ वर्षाचे खंडेराव दरगोडे आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना भुत्तोंच्या वाड्याच्या पुसट झालेल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतात. भुत्तोंच्या श्रीमंतीचेही चर्चा गावात सर्वाधिक असल्याचे सांगताना आता आठवणींशिवाय काहीच नसल्याचीही जाणीव करून देतात. भुत्तोंच्या जमिनीवरील एक विहिर अजूनही ग्रामस्थांच्या सेवेत असल्याचे सांगितले जाते.

गावावर मुस्लिमप्रभाव दिसत असला तरी गाव अगदी मराठमोळं आहे. याच्या खाणाखुणा गावातील आदिवासी समाजाच्या अस्तित्वावरून लक्षात येतात. गावातील अनेक भागात लाकडी चिरे पहायला मिळतात. आदिवासी समाजामध्ये एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीचे निधन झाल्यास पूर्वी तोंडदाखवणीचा विधी केला जाई. हा विधी इंदोरेतही यापूर्वी होत असल्याचे दिसते. प्रामुख्याने कोकणा समाजात हा विधी केला जातो. मृत व्यक्तीचा विशिष्ट पद्धतीने दफन विधी केल्यानंतर एक वर्षांनंतर तो देह पुन्हा बाहेर काढला जातो. त्यानंतर तोंड दाखविण्याचा कार्यक्रम पार पडतो.

पुन्हा हा मृतदेह कायमचा पुरला जातो. आदिवासी बांधव त्यांची आठवण म्हणून तेथे लाकडी चिरा उभारतात. त्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणांनी झाला याचा चित्र स्वरूपात चिऱ्यावर कोरलेले असते. अनेक चिऱ्यांवर काहीच नसल्याचेही दिसते. आदिवासी समाजात नंतरच्या काळात हा विधी बंद झाला असला तरी मृतदेह पुरलेल्या जागी फक्त लाकडी चिरा उभारण्याची पद्धत मात्र अजूनही कायम दिसते. गावातील हनुमान मंदिरामागेही एक हनुमान मंदिर आहे. त्याच्या समोर काही चिरा पहायला मिळतात. झुल्फीकार अली भुत्तोंचे इंदोरे पहायचे असेल तर त्यांच्या आठवणींची सफरी शिवाय तेथे ना त्यांचा चिरा दिसतो ना पंती! फक्त अनुभवायला मिळते येथील ग्रामस्थांमध्ये भुत्तोंच्या आठवणीतील आपलेपण.

 

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 2/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate