वेशीवरच्या पाऊलखुणा : अनोखे जलालपूर!
प्रत्येक गावाला आपली एक ओळख असते. त्या ओळखीच्या खाणाखुणा गावभर दिसत असतात. ही ओळखच त्या गावाच्या इतिहासात डोकवायला अनेकांना प्रेरणा देत असते. पण या खाणाखुणा जपण्याचे अन् गावच्या इतिहासाचे महत्त्व टिकविण्याचे काम कोणीतरी पेलायला हवे. अन्यथा इतिहास असूनही त्याची ओळख पुसट होत जाते. गोवर्धनजवळील जलालपूर हे गाव असेच आहे. पेशवाईकाळातील वाडे व घरांच्या खाणाखुणा अजूनही येथे स्पष्ट दिसतात. पेशव्यांनी बांधलेले अनोखे कारंजे व मंदिरांमुळे हा परिसर नयनरम्य आहे. जलालबाबांच्या समाधीनिमित्त हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्याची बैठकही गावाला लाभली आहे. हा इतिहास सांगणारी माणसे मात्र आज हरवली आहेत.
नाशिक शहरापासून सुमारे दहा-बारा किलोमीटरवर गोवर्धन-गंगापूर गावाजवळ गोदावरीच्या काठालगत जलालपूर गाव वसले आहे. गोवर्धन गावातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्यास नदीवरील बैठ्या पुलाकडे जाता येते. पुलावर गेल्यावर डाव्या हाताला गोवर्धन गावाची तटबंदी लक्ष वेधून घेते, तर समोर स्वागताला सज्ज असलेले वऱ्हारेश्वराचे सुंदर मंदिर आपल्याला जलालपूरमध्ये येण्यासाठी साद घालते. वऱ्हारेश्वर मंदिर नाशिकच्या सर्वच मंदिरांपेक्षा वेगळे आहे. या मंदिरावर वाईच्या मंदिरांची छाप आहे. मंदिराला रंगकाम करण्यात आल्याने नदीकाठावरील हे मंदिर ठसठशीत दिसते. काळ्या दगडाने सुसज्ज असा पाट बांधल्याने मंदिर अधिक प्रशस्त वाटते. भक्कम पाटामुळे नदीला पूर आला तरी मंदिराला इजा पोहचत नाही. मंदिराच्या कळसात एक छोटीशी खोलीवजा जागा आहे.
पूर्वी युद्धाच्या काळात मंदिरे लुटली जायची तेव्हा मंदिरातील मूर्ती व दागदागिने कळसात लपविता यावी तसेच तेथे लपता यावे म्हणूनही या खोलीचा वापर होत असे. आता ती जागा बंद करण्यात आली आहे. मंदिरासमोर नंदीचा सभामंडप आहे. या नंदीच्या दोनशिंगांमधून मंदिराकडे पाहिले की, मंदिरातील शंकराची पिंड दिसते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी समोरच भलामोठा दगडी हौद दिसतो. हा हौद म्हणजे पेशव्यांनी मंदिरासमोर बांधलेला कारंजा आहे. कारंज्यात मध्यभागापर्यंत एक पाट बांधण्यात आला आहे. तेथे उभे राहिल्यावरही पिंड दिसते. दर्शनासाठी अशा पद्धतीची रचना खूप कमी मंदिरांमध्ये सापडते. नंदीच्या सभामंडपातच साडेतीन फूट उंचीची एक घंटा आहे. तिचे वजनही एक टन असावे. नारोशंकराच्या मंदिरातील घंटेशी ती साम्य दाखविते. मंदिराच्या उभारणीनंतर पेशव्यांनी एका युद्धात ही घंटा जिंकली असावी अन् मंदिराला दिली असावी असे म्हटले जाते. या घंटेवर एका मुद्रेचा छाप अथवा मोहर आहे. यावर संशोधन झाले तर हा छाप कोणत्या राजवटीतील होता यावरून येथील जलालपूरच्या पडद्याआडच्या इतिहासावर प्रकाश टाकता येईल.
वऱ्हारेश्वर मंदिरासमोरील कारंजा दुर्दैवाने अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र, त्यावेळचे विजेशिवायचे कारंजाचे तंत्रज्ञान कसे होते याचा अनुभव येथे घेता येतो. कारंजापर्यंत पाणी आणण्यासाठी दोन अर्धवट आकाराच्या खापरांना जोडून पाइपलाइनची व्यवस्था करण्यात आली होती. गावात वरच्या बाजूला कारंजाला पाणी देण्यासाठी तलावही बांधण्यात आला होता, असेही स्थानिक ग्रामस्थ सांगतात. मंदिरापासून वरच्या बाजूला आणखी एक कारंजा आहे. आकाराने लहान असला तरी त्यांची दगडातील बांधणी अजूनही चांगली असल्याने कारंजाचा वेगळा नमुना पहायला मिळतो. या कारंजालगतच लहान पिंड असलेले छोटेशे बाणेश्वराचे मंदिर आहे. यातील पिंडीच्या उत्तरेकडेच द्वारमुख आहे. हे मंदिरही पेशवाईतील आहे. या मंदिरापासून थोडे पश्चिमेकडे गेलात की, एक मोठे चिंचेचे झाड आहे. या झाडाखाली जलालबाबांची समाधी आहे. आश्र्चर्य म्हणजे या समाधीसमोर तुलसी वृंदावन आहे आणि त्यात एक तुळसही आहे. जलालबाबांची समाधी आणि तुळस ही येथील हिंदू-मुस्लिम समाजातील एकोप्याचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. जलालपूर गावाला हे नाव कसे पडले याची ठोस माहिती मिळत नाही पण सय्यद मीर मुखतीयार अश्रीफी यांच्याकडील नोंदीनुसार १७८७ ला या गावाचे नाव जलालपूर असेच होते. याबाबत अधिक संशोधन होण्याची गरजही मीर मुखतीयार व्यक्त करतात. या समाधीच्या उत्तरेला सिद्धीविनायक मंदिर, दत्तप्रभू मंदिर व सदगुरू श्री त्रिंबकशास्त्री छत्रे स्वामी महाराजांची समाधी आहे.
जलालपूरची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचे हे माहेर. त्यांचे मुळ नाव मनकर्णिका. गंगाधर गोखले हे त्यांचे वडील. मनकर्णिका ऊर्फ लक्ष्मीबाईचा जन्म १८५७ च्या उठावानंतर दहा-बारा वर्षांनी झाला. लक्ष्मीबाईच्या आजोबांना उठावात फाशी झाली होती. त्यामुळे जलालपूरमध्ये इंग्रजांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती, अशी आईने सांगितलेली आठवण लक्ष्मीबाई टिळकांनी ‘स्मृतीचित्रे’ या पुस्तकात मांडली आहे. त्यावेळी जलालपूरमध्ये गोखल्यांचा प्रशस्त वाडा कसा होता याचे वर्णनही यात आहे. मनकर्णिका गोखले यांचे लग्न नारायण वामन टिळक यांच्याशी जलालपूरमध्येच झाल्याचा उल्लेखही पुस्तकात आहे. मात्र आता गोखले व लक्ष्मीबाई टिळकांच्या आठवणीशिवाय कोणत्याही खाणाखुणाही दिसत नाहीत.
पेशवाईनंतर जलालपूर अस्ताव्यस्त झाले असले तरी येथील शौर्याच्या कथा येथील सोनूबाई दत्तात्रेय मोरे या आजींनी पोवाड्यांच्या माध्यमातून जपल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. कधीही शाळेत न गेलेल्या पण पोवाड्यांवर प्रचंड पकड असलेल्या या आजी गावची शान होत्या, असे नरेंद्र मोरे सांगतात. गावच्या जुन्या आठवणी व नाशिक परिसर किती निसर्ग संपन्न व शांत होता हे सांगताना ‘तीस-चाळीस वर्षांपूर्वी गोदाघाटावरील नारोशंकराच्या घंटेचा आवाज व सोमेश्वर धबधब्याची खळखळही गावात स्पष्ट ऐकू यायची पण वाढते शहरीकरणामुळे हा नाद आता ऐकू येत नाही.’ अशी खंतही ग्रामस्थ व्यक्त करतात. जलालपूरमध्ये अनेक लढाया झाल्याचेही म्हटले जाते. मात्र, हा इतिहास अजूनही पडद्याआड आहे.
अंतिम सुधारित : 9/1/2020
प्रत्येक गावाला एक इतिहास असतो. त्यातील अनेक पैलू ...
आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळ...
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी...
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...