गोलकृमींपैकी अस्कॅरिस लंब्रिकॉइडिस या विशिष्ट जातीच्या कृमींना जंत म्हणतात आणि त्यांच्या संसर्गामुळे फुप्फुसे व आतडी यांमध्ये होणाऱ्या विकाराला जंतविकार म्हणतात.
जंत हे पांढऱ्या पिंगट रंगाचे गोलकृमी असून नराची लांबी १७–२५ सेंमी. आणि मादीची लांबी २०–४० सेंमी. असते. त्यांची जाडी ०·७५–१·० सेंमी. असून त्यांच्या जाड टोकाशी त्यांचे तोंड असते. शेपटीचा भाग निमुळता होत गेलेला असतो. जंत हे मनुष्याच्या लघ्वांत्रात (लहान आतड्यात) असून तेथे नर आणि मादी यांच्या समागमामुळे अंडी निषेचित (फलित) होतात. एका दिवसात एक मादी सु. दोन लक्ष अंडी घालते. ती सर्व अंडी निषेचित असतीलच असे नाही.
जीवनचक्र
निषेचित अंडी मलावाटे बाहेर पडतात. ज्या ठिकाणी बंदिस्त अशी स्वच्छतागृहे नसतात तेथे लोक–विशेषतः लहान मुले- मोकळ्यावर, जमिनीवर मलोत्सर्ग करतात; त्यामुळे ही अंडी मलाबरोबर जमिनीवर पडतात. सुमारे आठ दिवसांत अंड्यातच डिंभ (अळीसारखी अवस्था) उत्पन्न होतो. आणखी सु. एक आठवड्यानंतर या डिंभाची आणखी वाढ होऊन ते कात टाकून संसर्गक्षम होतात. अशी डिंभयुक्त अंडी दूषित अन्नपाणी, दूषित हात इत्यादींच्या मार्फत गिळली जाऊन ग्रहणीमध्ये (लघ्वांत्राच्या सुरुवातीच्या भागात) जातात. तेथे त्यांची अधिक वाढ होऊन ग्रहणीच्या भित्तीचा भेद करून तेथील सूक्ष्म रक्तवाहिन्या व लसीकावाहिन्यांमध्ये (रक्तद्रवाशी साम्य असणारा पदार्थ वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये) प्रवेश करून यकृतमार्गे हृदयाच्या उजव्या भागातील रक्ताबरोबर फुप्फुसांत जातात. फुप्फुसांत त्यांची आणखी वाढ होऊन ते वायुकोशांतून (श्वासनलिकांच्या टोकाला असणाऱ्या वायुयुक्त कोशांतून) बाहेर पडून खोकल्याबरोबर श्वासनलिकांच्यावाटे वर जाऊन कफाबरोबर गिळले जातात. अशा तऱ्हेने गिळलेले कृमी नंतर लघ्वांत्रात जाऊन त्यांची वाढ पूर्ण होते. या सर्व घटनांना सु. दोन ते अडीच महिने लागतात. एकदा लघ्वांत्रात कृमी पोहोचले म्हणजे त्यांची वाढ पूर्ण होऊन मादी अंडी घालू लागते. जर नरही तेथे असतील, तर ही अंडी निषेचित होऊन मलावाटे बाहेर पडतात; अशा प्रकारे त्यांचे जीवनचक्र चालू राहते.
संप्राप्ती
(कारणमीमांसा) जंतविकार जगातील सर्व देशांत आढळतो. त्यातल्या त्यात उष्ण कटिबंधात व जेथे स्वच्छतेचा अभाव वा कमतरता असते तेथे त्याचा प्रसार पुष्कळ होतो. काही देशांत तर त्यांचा संसर्ग सु. ६० ते १०० टक्के लोकांत, विशेषतः लहान मुलांत, आढळतो. परिस्थिती अनुकूल असल्यास एकाच व्यक्तीला पुनःपुन्हा संसर्ग होऊ शकतो.
लक्षणे
रक्तमार्गे फुफ्फुसात जेव्हा डिंभ जातात त्या वेळी फुफ्फुसशोथाची (फुप्फुसाला सूज आल्याची, न्यूमोनियाची) लक्षणे दिसतात. तसेच त्या डिंभापासून उत्पन्न होणाऱ्या हानिकारक पदार्थांमुळे अंगास खाज सुटणे, पित्त उठणे, दम्यासारखी लक्षणे दिसणे वगैरे प्रकार दिसतात. डिंभ लघ्वांत्रात गेल्यावर कित्येक वेळा काहीही लक्षणे दिसत नाहीत. केव्हा केव्हा मलोत्सर्गाबरोबर जंत बाहेर पडलेले दिसतात; तर कित्येक वेळा ते वर सरकून उलटीवाटे बाहेर पडतात. क्वचित नाकावाटेही बाहेर पडतात. काही प्रसंगी अनेक जंतांचा एक गठ्ठा होऊन त्यामुळे आंत्ररोध (आतड्यामध्ये अडथळा) होऊ शकतो. थोडासा अनियमित ज्वर, मळमळ, ओकारी, भूक कमी होणे आणि अस्वस्थता ही लक्षणेही दिसतात. जंत आतड्यातून वर सरकून पित्तवाहिनी अथवा यकृतात जाऊन तेथे रोध उत्पन्न करू शकतात.
निदान
मलाची सूक्ष्मदर्शकाने तपासणी केली असता अंडी दिसल्यास निदान पक्के होते.
चिकित्सा
पूर्वी सँटोनीन हे औषध फार प्रमाणात वापरले जाई, परंतु त्या औषधामुळे काही विपरीत परिणाम होतात असे दिसून आले आहे. अलीकडे पायपरेझीन सायट्रेट, पा. ॲडिपेट व पा. फॉस्फेट इ. औषधे विशेष गुणकारी ठरली असून त्यांपासून काही विपरीत परिणाम होत नाहीत. जेथे जंतांची प्रवृत्ती अधिक दिसते तेथे ही औषधे पुनःपुन्हा द्यावी लागतात [⟶ परोपजीवीविज्ञान]. बायफिनियमहायड्रॉक्सि-नॅप्थोएट (पेटंट नाव अल्कोपार) हे औषध जंतांवर तसेच अंकुशकृमींवरही [⟶ अंकुशकृमि रोग]. परिणामकारक आहे.
ढमढेरे, वा. रा.
आयुर्वेदीय चिकित्सा
पोटात जंत असले तर भूक अजिबात नाहीशी होते किंवा नेमके त्याच्या उलट अतिशय खा खा सुटते. जंताने पोटाचे विकार प्राधान्याने होतात. शौचामध्ये पडलेले ते दिसतातही पण कित्येक वेळा न दिसताही निरनिराळे रोग व्यक्त होतात. जंताने वाटेल तो रोग दिसतो म्हणून चिकित्सकाने प्रत्येक रोगाची कारणे पाहताना जंत तर नाही ना, ह्या दृष्टीने प्रत्येक रोगाचे निदान करणे अत्यावश्यक आहे. रोगी क्षयाने बेजार झालेला दिसतो, पण त्याचे कारण जंत असतात. जंतांच्या दृष्टीने चिन्हे तपासून ती नसली, तरी जंताचे औषधे दिले पाहिजे. जंत नाहीसे केले की, क्षयाची कोणतीही चिकित्सा न करता तो विकार बरा होतो [⟶ आतुर चिकित्सा].
जोशी, वेणीमाधवशास्त्री
पशूंतील जंतविकार
जंतांमुळे प्रामुख्याने वासरे, शिंगरे, डुकरांची व कुत्र्यांची पिले तसेच कोंबड्यांमध्ये विकार उद्भवतात. विशेषतः जंतांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले, तर पचनक्रियेमध्ये दोष उत्पन्न होऊन जनावरांची वाढ खुंटते. उपचार वेळेवर झाले नाहीत, तर मृत्यूही होतो. दाटीदाटीने वाढविल्या जाणाऱ्या वासरांच्या, शिंगरांच्या किंवा डुकरांच्या पिल्लांच्या कळपात जंत जास्त प्रमाणात होतात.
पशूंमध्ये संसर्ग होणाऱ्या निरनिराळ्या जंतांची शास्त्रीय नावे पुढीलप्रमाणे आहेत. गाई-म्हशींत होणाऱ्या जंताचे नाव ॲस्कॅरिस व्हिट्युलोरम, घोड्यांमध्ये ॲस्कॅरिस इक्वोरम, तर डुकरांमध्ये ॲस्कॅरिस लंब्रिकॉइडिस या मनुष्यांत होणाऱ्या जातीचीच उपजात आहे. कुत्र्यांमध्ये टॉक्सोकॅरा कॅनिस व टॉक्सॲस्कॅरिस लिओनिना आणि कोंबड्यांमध्ये ॲस्कॅरिस गॅली व हेटेरिकिस गॅलिनी अशी आहेत.
निरनिराळ्या प्राण्यांतील जंतांच्या उपजाती जरी निरनिराळ्या असल्या, तरी सर्वांचे जीवनचक्र माणसातील जंताच्या जीवनचक्राप्रमाणेच आहे. फक्त कुत्र्यातील जंताची डिंभावस्था सहसा स्थानांतर न करता आतड्याच्या भित्तीतच आपले जीवनचक्र पूर्ण करते. सर्वसाधारणपणे दुसरी डिंभावस्था आत तयार झालेली संसर्गक्षम अशी जंताची अंडी पोटात गेल्यापासून ८ ते ९ आठवड्यांनी आतड्यात पूर्ण वाढ झालेले व पुन्हा अंडी घालण्याची क्षमता असलेले जंत तयार होतात. रोगी जनावरांच्या विष्ठेतून असंख्य अंडी बाहेर टाकली जातात. ह्या अंड्यांचे कवच बरेच जाड असल्यामुळे आतील डिंभ बरेच दिवस जिवंत राहू शकतात. पाच वर्षापर्यंत हे जिवंत राहिल्याचे दिसून आले आहे.
भूक न लागणे, हगवण, पोटदुखी, अशक्तपणा वाढत जाणे, अंगावरील केस विखुरल्यासारखे दिसणे, निस्तेज कातडे इ. लक्षणे सर्व जातींच्या जनावरांमध्ये दिसतात. कधीकधी तंत्रिका तंत्रामध्ये (मज्जा संस्थेत) दोष उत्पन्न होतात व गोल गोल फिरणे, भिंतीवर धडकणे अशी लक्षणे दिसतात. कुत्र्यामध्ये ही प्रामुख्याने दिसून येतात व क्वचित कुत्रे पिसाळले की काय असा संशय येतो. वयस्क जनावरांमध्ये बहुधा फारशी लक्षणे आढळत नाहीत; परंतु त्याच्या विष्ठेतून अंडी बाहेर येत असल्यामुळे चराऊ राने दूषित होतात. जंत झालेल्या वाढत्या वयाच्या जनावरांची वाढ खुंटण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान पोहोचते.
पायपरेझिनाची निरनिराळी संयुगे जंतावर गुणकारी आढळली आहेत. वासरांमध्ये चिनोपोडियम तेल व हेक्झॅक्लोरेथीन, शिंगरांमध्ये कार्बन डाय-सल्फाइड व पायपरेझीन ॲडिपेट, तर डुकरांमध्ये पायपरेझीन सल्फाइड ही औषधे जंतनाशक म्हणून वापरात आहेत. कुत्र्यांमध्ये टोल्युइन तर कोंबड्यांमध्ये कार्बन टेट्राक्लोराइड उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. वरील सर्व औषधे आतड्यात असलेल्या जंतांचा नाश करतात, पण यांतील कुठलेही औषध शरीराच्या भागात स्थानांतर करीत फिरत असलेल्या डिंभावस्थेतील जंतावर उपयुक्त ठरत नाही. जंताची मादी रोजी असंख्य अंडी घालीत असल्यामुळे जंतांचा संपूर्ण नायनाट करणे कठीण होऊन बसते. तथापि जनावरांच्या कळपामध्ये वारंवार औषधी उपाययोजना करणे व वयस्क जनावरांकडून दूषित झालेल्या चराऊ रानापासून लहान वयाची जनावरे दूर ठेवणे, हेच नियंत्रणाचे उपाय ठरतात.
दीक्षित, श्री. गं.
संदर्भ : 1. Blood, D. C.; Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1971.
2. Indian Council of Agricultural Research, Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.
3. Nelson, W. E., Ed. Textbook of Pediatrics, Philadelphia, 1964.
स्त्रोत: मराठी विश्वकोश