पोषकाच्या लघ्वांत्रात (लहान आतड्यात) नर व मादी कृमींचा संयोग झाल्यानंतर मादी लीबरक्यून ग्रंथीवाटे (आतड्यात उघडणार्या नलिकाकार ग्रंथीवाटे; नाव लीबरक्यून या शास्त्रज्ञांच्या नावावरून) श्लेष्मकलेत (आतड्याच्या आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत अस्तरात) प्रवेश करते व पुढे लसीकेच्या (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेल्या द्रव पदार्थाच्या) पोकळीत पोहोचल्यावर फार मोठ्या अळ्या प्रसवते. ह्या अळ्या रक्तवाहिन्या व लसीकावाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पसरतात. काही इष्ट स्नायूंच्या परिकला (वेष्टनासारखी असणारी पातळ पटले) भेदून, तेथेच द्रवार्बुद (द्रवयुक्त गाठींच्या) अवस्थेत राहतात. संसर्ग झाल्यानंतर ८ ते २५ दिवसांत स्नायूमध्ये त्या आढळतात व अशा अवस्थेत कित्येक वर्षे राहू शकतात, पण हळूहळू त्यांचे कॅल्सिकरण होऊन (कॅल्शियम लवणे साचून) त्या नष्ट होतात. द्रवांर्बुदे सामान्यपणे कंकालस्नायूमध्ये (सांगाड्याशी संबंधित असलेल्या स्नायूमध्ये) आढळली, तरी हृदयाचे स्नायू, फुप्फुसे, क्वचित मेंदू व तंत्रिका (मज्जातंतू) यांतही दिसून येतात.
उकिरड्यावर फेकलेल्या कच्च्या मांसावर पोसलेल्या डुकरांत रोगप्रमाण अधिक असते. त्यांच्या खाण्यामध्ये दूषित तसेच कच्चे मांस येऊ न देणे किंवा शिजवून खावयास देणे, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाण्याने होणारे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगणे इ. उपाय महत्त्वाचे आहेत.
देवधर, ना. शं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/2/2020