अपृष्ठवंशी प्राण्यांच्या चपटकृमी (प्लॅटिहेल्मिंथिस) आणि गोलकृमी (नेमॅथेल्मिंथिस) संघांतील प्राण्यांना कृमी म्हणतात. काही वेळा ही संज्ञा कीटक वर्गातील तसेच वलयांकित संघातील प्राण्यांनाही स्थूल अर्थाने वापरतात. कृमींची एकूण संख्या सु. दहा लाखांहून अधिक असावी, असा अंदाज आहे. कृमींपैकी काही जाती मुक्तजीवी, तर बहुतांशी जाती परोपजीवी आहेत. यांच्या काही जाती गोड्या पाण्यात, काही खार्या पाण्यात, तर काही ओल्या मातीत राहतात. परोपजीवी कृमींचे जीवनचक्र एका अथवा अधिक प्राण्यांच्या शरीरात पूर्ण होते. फलित अंड्यापासून डिंभ तयार होतो. डिंभावस्था मुक्त किंवा परोपजीवी असते. काही कृमींमध्ये एकामागून एक अशा अनेक डिंभावस्थाही आढळतात. डिंभावस्थेतील तसेच पूर्ण विकसित कृमींपासून माणसाला रोग होऊ शकतात.
शरीर सडपातळ आणि पृष्ठ अधरीय चपटे असते. काही मुक्तजीवी असून ते गोड्या आणि खार्या पाण्यात आढळतात. बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात. हे प्राणी उभयलिंगी असतात. उदा., पर्णकृमी अथवा पर्णचिपट संघ (प्लॅनेरिया), यकृतकृमी किंवा यकृत पर्णकृमी (लिव्हरफ्ल्युक), पट्टकृमी (टेपवर्म) इत्यादी. यकृतकृमी हे यकृत आणि पित्तनलिकेत आढळतात. त्यांचे जीवनचक्र गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, ससे, डुकरे, कुत्रे, हत्ती, मनुष्य यांपैकी एक आणि शंखाच्या गोगलगाई इत्यादींमध्ये पूर्ण होते.
शरीर बारीक, दंडाकृती आणि लांबट असते. हे प्राणी मुक्तजीवी किंवा अंत:परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे गोलकृमी हे जलवासी किंवा भूचर असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. उदा., जंत (अस्कॅरिस), हत्तीरोग कृमी (फायलेरिया), अंकुशकृमी (हुकवर्म), नारूकृमी (गिनीवर्म) इत्यादी.
जंत हे मनुष्याच्या लहान आतड्यात आढळतात. हत्तीरोग कृमी मनुष्याच्या शरीरातील लसीका ग्रंथीत आढळतात. त्यांची डिंभावस्था क्युलेक्स डासांमध्ये असते. नारूकृमी मनुष्याच्या त्वचेखाली असतो. त्याची डिंभावस्था सायक्लॉप्स या पाण्यात आढळणार्या कवचधारी संधिपाद प्राण्यात असते.
वनस्पतींमध्येही अनेक प्रकारचे परजीवी गोलकृमी आढळतात. उदा., मेलॉइडोगाइन जातीचे गोलकृमी संत्री, मोसंबी अशा झाडांच्या मुळांवर गाठी तयार करतात. झिफीनेमा इंडेक्स हा गोलकृमी द्राक्षवेलींवरील रोगांच्या विषाणूंचा वाहक असतो. अनेक गोलकृमी झाडांच्या खोडावर हल्ला करतात. वनस्पतींतील गोलकृमींमुळे पिकांचे व फळांचे खूप नुकसान होते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020