অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऋतुचक्रातील बदलात आरोग्य!

निसर्गात ऋतुचक्रामुळे घडून येणारे बदल मनाला आल्हाददायक वाटले तरी त्याचा अनेक वेळा शरीरावर परिणाम होतो आणि सर्दी खोकल्यासारखे आजार होतात. शेतकऱ्यांचा तर थेट निसर्गाशी आणि त्यातील बदलांशी थेट संबंध येत असतो. असे आजार झाल्यावर डॉक्‍टरांकडे जाईपर्यंत घरच्या घरीच त्वरित काही उपाययोजना केल्यास लवकर आराम पडू शकतो. अशा काही

उपाययोजनांची माहिती......

हिवाळा, पावसाळा, उन्हाळा! ऋतू कोणताही असो, आपले आरोग्य उत्तम असेल तर प्रत्येक गोष्टीला आपण सहज सामोरे जाऊ शकतो. खरं तर निसर्गातील बदल हे अतिशय प्रसन्न करणारे असतात. रखरखीत उन्हानंतर पावसाची सर झाडे, वेली फुलांपासून सर्वांना आनंदी क्षण देणारी ठरते. वातावरणातील हा बदल मनाला प्रसन्न करतो खरा; पण शारीरिक आरोग्य साथ देतेच असे नाही. सर्दी, खोकला, ताप, जुलाब होणे इ. कितीतरी आजार ऋतुबदल होताना किंवा झाल्यानंतरही पुष्कळवेळा आढळून येतात. अचानकपणे एखादा त्रास झाल्यास त्वरित घरी काही उपाययोजना केल्या तर रुग्णास आराम पडू शकतो. अर्थात त्यानंतर वैद्यांच्या साह्याने औषधयोजना करणेही आवश्‍यकच आहे.

सर्दी, खोकला, ताप

हवा बदलल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आढळणारे हे लक्षण आहे. धूळ, धूर, हवेतील गारवा, चुकीचा आहार इत्यादी कारणांनी सर्दी-खोकला होतो. अशावेळी गरम पाणी प्यावे. तवा गरम करून त्यावर कापड ठेवून कपाळ, कानशिले हे भाग शेकावेत. त्यामुळे डोके दुखणे लवकर कमी होते. वेखंडाची पावडर कपाळावर लावावी. ओवा पूड कापडात घेऊन पुरचुंडी करून हुंगावी. पाण्यामध्ये सुंठ, गवती चहा, मिरी, तुळस घालून उकळून काढा करावा व तो दिवसातून २-३ वेळा गरम स्वरूपात घ्यावा. रात्री झोपताना देठासहित विड्याचे पान मध लावून खावे. त्यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो, पण त्यात चुना-कात-सुपारी घालू नये. त्याचप्रमाणे आल्याचा रस आणि मध हे चाटण दोन-तीन वेळा खावे.

घरातील सुंठ, मिरी, पिंपळी यांचे समभाग चूर्ण करून पाव चमचा पावडर मधात कालवून चाटण घ्यावे. त्याने सर्दी-खोकल्यापासून आराम पडतो. छातीमध्ये कफ दाटला असेल तर छातीला तेल कोमट करून लावावे आणि शेकावे. घशामध्ये कफ अडकत असेल तर ज्येष्ठमध पावडर चघळावी, त्यामुळे कफ मोकळा होतो. कोरडा खोकला असेल तर खडीसाखर किंवा ज्येष्ठमधाची काडी तोंडात धरावी. सर्दी-खोकल्यासह ताप असेल, अंग दुखत असेल तर पारिजातकाच्या पानांचा काढा द्यावा. नागरमोथा पावडर पाण्यात उकळून ते पाणी दिवसभर पिण्यास द्यावे. कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. तळपायास कांद्याचा रस चोळावा. घसा दुखत असल्यास त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

प्रतिबंधात्मक उपाय (पथ्य)

दही, थंड पदार्थ, आंबट ताक, केळी, शिकरण खाऊ नये. गरम भात, मुगाचे कढण असा आहार ठेवावा. उपचार वैद्यांच्या सल्ल्याने चालू करावेत.

उलट्या

दूषित पाण्यामुळे, चुकीचा आहार घेतल्यामुळे उलट्या होण्याचा धोका असतो. यामध्ये खाल्लेले अन्न किंवा पित्त उलटीवाटे बाहेर पडते. अशावेळी वेलदोड्याची साल तव्यावर भाजून केलेली राख मधातून द्यावी किंवा आवळा पावडर घरात असल्यास ती तव्यावर काळी होईपर्यंत भाजावी आणि पाव चमचा पावडर मधासह द्यावी. उलटीवाटे पित्त पडत असेल तर मोरावळ्यासह सूतशेखर मात्रा द्यावी. आंबा, जांभूळ यांची कोवळी पाने धुऊन तोंडात धरावीत. साळीच्या लाह्या पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. पूर्णपणे लंघन करावे. गरम सूप, मऊ भातच खावा. या उपायांनी काही काळ आराम मिळाला तरी तज्ज्ञ वैद्यांकडे तपासून औषधयोजना सुरू करावी.

पथ्य

तिखट, चमचमीत पदार्थ, पाव, मिरची ठेचा, लोणचे, बाहेरचे खाणे, मांसाहार, मद्यसेवन टाळावे. मुगाची खिचडी, गरम वरण-भात, सूप असा हलका आहार घ्यावा.

अतिसार व आव पडणे

अतिसारामध्ये पाच-सहा वेळा पाण्यासारखे जुलाब होतात. थकवा येतो. आव पडणे म्हणजे पोटात मुरडा येऊन कळ येऊन चिकट स्वरूपात शौचास होते. पाय, पोटऱ्या खूप दुखतात. अंधारी येते. हे दोन्ही प्रकार दूषित पाणी आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्याने होतात.

अतिसारामध्ये साखर-पाणी वारंवार द्यावे. सुंठ पावडर, जिरे, डाळिंबाची साल पाण्यात घालून काढा करून द्यावा. जायफळ उगाळून मधासह घ्यावे. तहान लागल्यास जिरे आणि बडीशेप घालून उकळलेले पाणी गरम स्वरूपात द्यावे. पोटात खूप दुखत असल्यास पोटाला एरंडेल किंवा साधे तेल चोळून हिंगाचा कोमट लेप लावावा. ओवा आणि सैंधव मीठ (शेंदेलोण) चघळून खावे आणि त्यावर गरम लिंबूपाणी प्यावे, त्यामुळे पचन सुधारून पोटदुखी कमी होण्यास मदत होते. अर्थातच हे त्वरित करण्याचे उपाय आहेत. वैद्यांकडे जाऊन व्यवस्थित औषधे घेणे गरजेचेच आहे.

पथ्य

द्रवाहार घ्यावा. पाणी उकळून प्यावे. बाहेरचे खाणे टाळावे. थंड, शिळे पदार्थ, पोहे, जड पदार्थ टाळावेत.

सांधेदुखी

यामध्ये मनगट, कोपर, खांदे, गुडघे यात वेदना जाणवतात, विशेषत- सकाळी जास्त असतात. जर सूज नसेल तर लगेच साधे खोबरेल तेल कोमट करून तेथे लावावे आणि तव्यावर कापड गरम करून शेक द्यावा. निर्गुडी, एरंड या वनस्पती आसपास असतील तर निर्गुडीच्या पानांनी शेकावे. सांध्यावर तेल लावून वर सुंठेचा गरम लेप घालावा आणि वाळला, की त्वरित काढून टाकावा. सुंठ, एरंडमूळ, गुळवेल यांचा काढा करून घ्यावा. पिण्याचे पाणी गरम असावे. सुंठ पावडर एरंडतेलामध्ये परतून पाव चमचा पावडर तुपासह गरम पाण्याबरोबर घ्यावी. त्यामुळे पचन होऊन वाताचे दुखणे कमी होते. पचण्यास हलका आहार खावा.

पथ्य

थंड पाण्यात, थंड हवेत जाऊ नये. मटकी, पावटा, चवळी, हरभरा इत्यादी वातूळ पदार्थ टाळावेत. वैद्यांच्या देखरेखीखाली चिकित्सेस प्रारंभ करावा.

अशाप्रकारे ऋतुबदल होताना सुरवातीला उद्‌भवणारे आजार अचानकपणे त्रास देऊ लागल्यास आपल्या घरात असणाऱ्या गोष्टींच्या साह्याने किंवा परिसरातील काही वनस्पतींच्या साह्याने आपण त्वरित उपाययोजना करू शकतो. त्यासाठी तुळस, पारिजात (प्राजक्त), अडुळसा, निर्गुडी, एरंड, आंबा, डाळिंब, गुळवेल इत्यादी वनस्पती आवर्जून लावून त्यांची जोपासना केली पाहिजे. अर्थातच त्याचे उपयोग, त्याची मात्रा किती, किती वेळा घ्यायचे या सर्वांसाठी चांगल्या आयुर्वेदिक डॉक्‍टरांचा सल्ला मोलाचाच ठरतो. लक्षणांची तीव्रता अधिक असल्यास वैद्यांच्या देखरेखीखाली चिकित्सा सुरू करणेच हिताचे ठरते आणि पावसाळा सुखकर ठरण्यास मदत होते.

त्वचाविकार

हवाबदल, दमटपणा, पाण्यात खूप काम करणे, चुकीचा आहार इ. कारणांनी त्वचाविकार उद्‌भवतात. चिखल्या, खाज येणे, शीतपित्त, नारू इत्यादी प्रकारचे त्वचाविकार पावसाळ्यात उद्‌भवतात.

चिखल्या - चिखल, घाण पाणी यांचा संपर्क आल्यास पायाच्या बोटांमधला भाग ओलसर होऊन कुजतो व खाज येते. अशावेळी त्रिफळा पावडर पाण्यात घालून उकळून त्या पाण्याने चिखल्यांची जागा स्वच्छ धुवावी आणि कोरडी करावी. करंज तेल लावावे.

शीतपित्त/ खाज

अंगावर खाज येऊन लहान-मोठ्या गांधी उठतात, त्यासाठी आमसुले पाण्यात भिजवून ते पाणी लावावे. थंड वाऱ्याचा संपर्क त्वचेला न होऊ देण्यासाठी स्वेटर, शाल अंगावर ठेवावी. पोट साफ ठेवावे. काळ्या मनुका भिजत घालून रात्री झोपताना त्याचा कोळ कोमट पाण्यासह घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. करंज तेल चोळावे. ज्यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाज कमी होते. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचा पाला घालून उकळलेले पाणी मिसळावे. अंगाला साबण लावू नये. तुळशीचा रस चोळून लावावा. पथ्य - केळी, शिकरण, दही, आंबट ताक, पापड, ब्रेड, लोणचे, मिरची ठेचा आदी पदार्थ खाऊ नयेत.

नारू

यामध्ये सर्वांगास खाज येते व तापही येतो. पायावर गळू येऊन फुटतो. सूज, वेदना असतात. त्यासाठी सुजेवर कडुनिंबाचा पाला वाटून गरम करून लावावा. रुईचा चीक लावावा. दूषित पाण्यामुळे हा त्वचाविकार होत असल्याने पाणी उकळून किंवा त्यात तुरटीचा खडा फिरवून प्यावे.
(लेखिका पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञ आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate