অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्तनपान

स्तनपान

  1. स्तनपानाविषयीच्या माहितीचा प्रसार करणे व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे
  2. प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास स्तनपानासंबंधीची कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे.
  3. सहाय्यक माहिती: स्तनपान
    1. महत्वाचा संदेश :कोणत्या ही बालकास पहिले सहा महिने फक्त आईचेच दूध खाद्य किंवा पेय म्‍हणून आवश्‍यक असते.
    2. महत्वाचा संदेश: आई एचआयव्हीग्रस्त असल्यास तिच्या दुधामधून बालकापर्यंत ह्या रोगाचा संसर्ग पोहोचू शकतो
    3. महत्वाचा संदेश: नवजात बालकांना त्यांच्या आईच्या कुशीत ठेवण्‍यात यावे आणि जन्मानंतरच्या एका तासातच स्तनपान चालू करा
    4. महत्वाचा संदेश: वारंवार स्तनपान करविल्यानेच आईला अधिक दूध येते. जवळजवळ प्रत्येक आई बालकास यशस्वीपणे आपले दूध पाजू शकते.
    5. महत्वाचा संदेश: स्तनपानाद्वारे बालके व मुलांचे जीवघेण्या रोगांपासून संरक्षण होते
    6. महत्वाचा संदेश: बाटली ने दूध पाजल्याने आजारपण तसेच मृत्यू देखील ओढवू शकतो.
    7. महत्वाचा संदेश: सहाव्या महिन्यापासून बाळांना विविध इतर अन्नपदार्थांची गरज असते. तरी ही मूल दोन वर्षांचे झाले तरी आणि त्‍या पुढे ही त्याला स्तनपान देणे चालू ठेवा
  4. बाळाला पूरक आहार देण्याबद्दल सर्वसाधारण दिशानिर्देश
    1. महत्वाचा संदेश : एखादी माता घरापासून दूर नोकरी करीत असल्यास तिने तिच्या मुलाबरोबर असण्याच्या काळात जास्तीत जास्त वेळा त्यास स्तनपान द्यावे.
    2. महत्वाचा संदेश: बाळाच्या जन्मानंतर आईने त्यास सतत अंगावरचेच दूध पाजल्यास तिला पुढील संभाव्य गर्भारपणापासून 98 टक्‍के संरक्षण मिळते

स्तनपानाविषयीच्या माहितीचा प्रसार करणे व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे

आईचे दूध पिणारी मुले कमी प्रमाणात आजारी पडतात तसेच इतर प्रकारचे अन्न खाणार्‍या मुलांच्या तुलनेमध्ये त्यांना अधिक चांगले पोषण मिळते. सर्वच बाळांना पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देण्‍यात आले तर तरी दरवर्षी होणारे सुमारे 1.5 दशलक्ष बालमृत्यू टळतीलच शिवाय इतर लक्षावधी बालकांचे आरोग्य सुधारून त्यांचा चांगल्या रीतीने विकास होईल.

आईच्या दुधाला पर्याय म्हणून बालकांसाठी ‘खास तयार केलेले’ अन्न किंवा इतर प्राण्यांचे दूध बालकांना देण्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. पालकांना असे ‘खास तयार केलेले’ अन्न परवडत नसल्यास, कारण हे पदार्थ खूपच महागडे असतात, किंवा मिसळण्यासाठी नेहमीच स्वच्छ पाणी मिळत नाही.

जवळजवळ सर्वच माता आपल्या मुलास यशस्वीपणे स्वतःचे दूध पाजू शकतात. ज्या मातांना असा आत्मविश्वास नसेल त्यांना बालकाच्या पित्याने, कुटुंबियांनी तसेच मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मदत केली पाहिजे व प्रोत्साहन दिले पाहिजे. हे काम आरोग्यसेवक, स्‍त्री-संघटना, रेडिओ व टीव्ही वाहिन्यांमार्फत देखील करता येईल.

स्तनपान व त्यापासून होणारे फायदे ह्यांबद्दलची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. ह्या माहितीचा प्रसार करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे.

प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास स्तनपानासंबंधीची कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे.

  1. कोणत्याही बालकास पहिले सहा महिने फक्त आईचेच दूध खाद्य किंवा पेय म्‍हणून आवश्‍यक असते.ह्या काळात त्यास कोणतेही इतर अन्न, पाणी सुध्‍दा लागत नाही.
  2. आई एच आयव्हीग्रस्त असल्यास तिच्या दुधामधून बालकापर्यंत ह्या रोगाचा संसर्ग पोहोचू शकतो. मुलास संसर्ग होण्‍याबाबतचा धोका कमी करण्यासाठी रोगग्रस्त किंवा रोगग्रस्त असल्याची शंका असणार्‍या स्त्रियांनी कुशल आरोग्यसेवकास भेटून चाचणी करावी व आरोग्यसल्ला घ्यावा
  3. नवजात बालकांना त्यांच्या आईच्या कुशीत ठेवा आणि जन्मानंतरच्या एका तासातच स्तनपान चालू करा. वारंवार स्तनपान करविल्‍यानेच आईला अधिक दूध येते.
  4. जवळजवळ प्रत्येक आई बालकास यशस्वीपणे आपले दूध पाजू शकते.
  5. स्तनपानाद्वारे बालके व मुलांचे जीवघेण्या रोगांपासून संरक्षण होते. याशिवाय स्तनपानामधून आई व मुलामध्ये विशेष नाते घडविले जाते.
  6. बाटलीद्वारे दूध पाजल्याने आजारपण तसेच मृत्यू देखील ओढवू शकतो. एखाद्या मातेस स्तनपान करवणे शक्य नसल्यास तिने आपले दूध किंवा दुधासाठीचा पर्यायी अन्नपदार्थ एखाद्या स्वच्छ कपामध्ये घेऊन बालकास द्यावा.
  7. सहाव्या महिन्यापासून बाळांना विविध इतर अन्नपदार्थांची गरज असते. तरी ही मूल दोन वर्षांचे झाले तरी आणि पुढे ही त्याला स्तनपान देणे चालू ठेवा.
  8. एखादी माता घरापासून दूर नोकरी करीत असल्यास तिने तिच्या मुला बरोबर असण्याच्या काळात जास्तीत जास्त वेळा त्यास स्तनपान द्यावे.
  9. बाळाच्या जन्मानंतर आईने त्यास सतत अंगावरचेच दूध पाजल्यास तिला पुढील संभाव्य गर्भारपणापासून 98 टक्‍के संरक्षण मिळते. अर्थात् ह्यासाठी तिची मासिक पाळी चालू झाली नसली पाहिजे, बाळाने रात्रंदिवस आईचेच दूध प्यायले पाहिजे व बाळास कोणते ही इतर अन्नपाणी किंवा त्यास गप्प करण्यासाठी बोंडले देता कामा नये.

सहाय्यक माहिती: स्तनपान

महत्वाचा संदेश :कोणत्या ही बालकास पहिले सहा महिने फक्त आईचेच दूध खाद्य किंवा पेय म्‍हणून आवश्‍यक असते.

ह्या काळात त्यास कोणते ही इतर अन्न, पाणीसुध्‍दा लागत नाही

बालकांसाठी सर्वोत्तम अन्न म्हणजे आईचे दूध. प्राण्याचे दूध, बालकांसाठी बनवलेले खास अन्न, पावडरचे दूध, चहा, साखरयुक्त पेये, पाणी ह्या सर्व गोष्‍टी आईच्‍या दुधापेक्षा गौण दर्जाच्‍या आहेत.

आईचे दूध बाळाला सहज पचते. ते प्यायल्याने सर्वोत्तम वाढ व विकास होऊन आजारांपासून संरक्षण मिळते.

उन्‍हाळ्याच्‍या व कोरड्या दिवसांमध्ये देखील बाळाच्या शरीराची द्रवपदार्थांची वाढती गरज आईच्या दुधाने भागवली जाते. पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला पाणी किंवा इतर पेयांची गरज नसते. आईच्या दुधाखेरीज बाळाला इतर अन्न किंवा पेये देण्याने अतिसार व इतर आजार होण्याची शक्यता वाढते.

आईच्या दुधाइतकीच पोषणमूल्ये देऊ शकणारे पर्यायी अन्नपदार्थ अत्यंत महाग असतात. एका बालकास एका वर्षास अशा 40 किलो (म्हणजेच सुमारे 80 डबे) पर्यायी अन्नाची गरज असते. असे पर्यायी पदार्थ वापरण्याचा विचार करणार्‍या प्रत्येक मातेस आरोग्यसेवकांनी खर्चाची कल्पना दिली पाहिजे.

नियमितपणे वजन करण्‍यात येऊन देखील सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या व स्तनपान करणार्‍या एखाद्या बाळाची वाढ व्यवस्थित वाटत नसेल तर:

  • बाळास वारंवार अधिक स्तनपान घेण्याची गरज असू शकेल. दरवेळी किमान 15 मिनिटे ह्याप्रमाणे 24 तासांमध्ये कमीत कमी 12 वेळा व त्यास स्तनपान मिळाले पाहिजे.
  • स्तनाचा अधिक भाग तोंडामध्ये घेण्यासाठी बाळाला मदतीची गरज असू शकेल.
  • बाळ आजारी असू शकेल. त्याला प्रशिक्षित आरोग्यसेवकाकडे घेऊन जा.
  • पाणी किंवा इतर पदार्थ अधिक प्रमाणात दिले जात असल्यामुळे आईचे दूध पिण्याचे त्याचे प्रमाण कमी झाले असेल.

आईने बाळास फक्त आपले दूध द्यावे, इतर द्रवपदार्थ देऊ नये.

सहाव्या महिन्यापासून बाळांना विविध इतर अन्नपदार्थांची गरज असते. तरी ही मूल दोन वर्षांचे होईपर्यंत किंवा त्यानंतरदेखील त्‍याला स्तनपान देणे चालू ठेवा.

महत्वाचा संदेश: आई एचआयव्हीग्रस्त असल्यास तिच्या दुधामधून बालकापर्यंत ह्या रोगाचा संसर्ग पोहोचू शकतो

मुलास संसर्ग होण्‍याबाबतचा धोका कमी करण्यासाठी रोगग्रस्त किंवा रोगग्रस्त असल्याची शंका असणार्‍या स्त्रियांनी कुशल आरोग्यसेवकास भेटून चाचणी करावी व आरोग्यसल्ला घ्यावा

एचआयव्हीचा संसर्ग टाळण्यासंबंधीची माहिती प्रत्येकाला असणे महत्वाचे आहे. गर्भवती तसेच नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना हे माहिती असणे गरजेचे आहे की त्यांना स्वतःला एचआयव्हीची लागण झालेली असल्यास गर्भारपणात, जन्म देताना किंवा स्तनपान करवताना, ह्या रोगाचा संसर्ग त्यांना होणार्‍या अपत्यापर्यंत पोहोचू शकतो.

होणार्‍या अपत्यास लागण न होऊ देण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजेच स्वतः रोगग्रस्त न होणे. लैंगिक संबंधांमधून होणारा एचआयव्हीचा प्रसार टाळण्याचे मार्ग म्हणजे लैंगिक संबंधच टाळणे, निरोगी जोडीदारांनी फक्त परस्परांशीच लैंगिक संबंध ठेवणे आणि फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, लिंगाचा प्रत्यक्ष योनिप्रवेश टाळणे किंवा कंडोम वापरणे.

रोगग्रस्त किंवा रोगग्रस्त असल्याची शंका असणार्‍या गर्भवतींनी किंवा नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांनी कुशल आरोग्यसेवकास भेटून चाचणी करावी व समुपदेशन घ्यावे.

महत्वाचा संदेश: नवजात बालकांना त्यांच्या आईच्या कुशीत ठेवण्‍यात यावे आणि जन्मानंतरच्या एका तासातच स्तनपान चालू करा

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला त्याच्या आईचा थेट स्पर्श जास्तीत जास्त काळ मिळाला पाहिजे. मूल व आईला एकाच खोलीत किंवा एकाच पलंगावर झोपवणे उत्तम होय. बाळाला हवे तेवढे आईचे दूध पिऊ द्यावे.

जन्मानंतर थोड्याच वेळात स्तनपान करविल्याने आईला जास्त दूध येण्याची क्रिया चालू होते. त्यामुळे आईचे गर्भाशय आकुंचन पावते व जोराचा रक्तस्त्राव किंवा रोगसंसर्ग होण्याचा धोका कमी होते.

बाळाच्या जन्मानंतरच्या काही दिवसांमध्ये आईच्या स्तनांमधून पिवळसर रंगाचे घट्ट दूध येते. त्यास कोलोस्ट्रम म्हणतात. ते अतिशय पोषक असते व बाळाचे जंतुसंसर्गांपासून रक्षण करते. काही वेळा मातांना हे दूध बाळास न पाजण्याचा सल्ला दिला जातो - हा सल्ला चुकीचा आहे

आईचे दूध वाढण्यासाठी काही काळ जावा लागला तरी त्या दिवसांमध्ये बाळाला इतर अन्नपदार्थांची गरज नसते.

बाळाचा जन्म दवाखान्यात झाला असल्यास बाळाला आपल्याजवळ सतत 24 तास ठेवण्याची मागणी करण्याचा हक्क आईला आहे. तसेच बाळाचे स्तनपान चालू असल्यास त्याला इतर कोणते ही अन्न किंवा पाणी न देण्याच्या सूचनादेखील ती देऊ शकते.

महत्वाचा संदेश: वारंवार स्तनपान करविल्यानेच आईला अधिक दूध येते. जवळजवळ प्रत्येक आई बालकास यशस्वीपणे आपले दूध पाजू शकते.

नव्याने आई झालेल्या अनेक स्त्रियांना स्तनपान करविण्यासंबंधी प्रोत्साहन द्यावे लागते तसेच त्यांना योग्य सल्ल्याची गरज असते. स्तनपान यशस्वीपणे करणारी एखादी इतर स्‍त्री, कुटुंबातील स्त्रिया किंवा स्‍त्री स्‍तनपान समर्थक संघटनेच्या सदस्यादेखील तिच्या अडचणी आणि अनिश्चितता सोडवण्याबाबत मार्गदर्शन करू शकतात.

स्तनपान करविताना आईने बाळाला कोणत्या स्थितीत धरले आहे व स्तनाचा किती भाग बाळाच्या तोंडामध्ये गेला आहे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बाळाला योग्य तर्‍हेने धरल्यास त्याला दूध पिणे सोपे जाते.

बाळ स्‍तनपान घेण्‍यासाठी योग्‍य स्थितीत आहे त्‍याची लक्षणे:

  • बाळाचे पूर्ण शरीर आईकडे वळलेले असणे
  • बाळ आईच्या अगदी जवळ असणे
  • बाळ आनंदी दिसणे

स्तनपानाच्या दृष्टीने बाळाला चुकीच्या स्थितीत धरल्‍यास अशा समस्‍या उद्भवतात:

  • स्तनाग्र दुखते व त्यास चिरा पडतात
  • पुरेसे दूध येत नाही
  • बाळ दूध पिण्यास नकार देते

बाळ नीटपणे दूध पीत असल्याची लक्षणे:

  • बाळाचे तोंड व्यवस्थित उघडे असते
  • बाळाची हनुवटी आईच्या स्तनावर टेकलेली असते
  • स्तनाग्राभोवतीचा गडद रंगाचा भाग बाळाच्या तोंडाच्या वरील बाजूस, खालच्या बाजूपेक्षा, अधिक प्रमाणात दिसतो.
  • बाळ दीर्घ, सखोलपणे दूध ओढते.
  • आईचे स्तनाग्र दुखत नाही.

प्रत्येक मातेच्या शरीरात पुरेसे दूध निर्माण होऊ शकते जर:

  • ती बाळाला फक्त स्तनपानच करवत असेल
  • बाळाला योग्य स्थितीत धरत असेल व स्तनाचा बराच भाग बाळाच्या तोंडामध्ये गेला असेल
  • बाळाच्या इच्छेनुसार दिवसा किंवा रात्रीदेखील त्याला हवे तितके दूध हव्या तितक्या वेळेपर्यत पाजत असेल

जन्मापासूनच बाळाला त्याच्या इच्छेनुसार दूध मिळाले पाहिजे. स्तनपानानंतर बाळ 3 तासांपेक्षा जास्त काळ झोपले असेल तर त्यास हळुवारपणे उठवून स्तन तोंडात देण्याचा प्रयत्न करा.

रडणे हे बाळाला इतर पेये किंवा खाण्‍याची गरज आहे ह्याचे लक्षण नाही. सामान्यपणे याचा अर्थ असा की बाळाला जवळ घेऊन कुरवाळण्‍याची गरज आहे. काही बाळांना दूध पिण्यानेच बरे वाटते. बाळ जितके जास्त दूध पिईल तितके अधिक दूध निर्माण होते.

काही मातांना स्वतःला पुरेसे दूध येणार नाही अशी भीती असते व त्यामुळे त्या बरेचदा बाळाला, सुरुवातीच्या काही महिन्यांमधेच, वरचे अन्नपाणी चालू करतात. परंतु ह्यामुळे बाळ स्तनपान कमी करते, परिणामी आईला कमी दूध येते. बाळाला इतर पेये किंवा आहार न देता अधिक स्तनपान करविल्यानेच आईला जास्त दूध येईल.

अंगावर पिणार्‍या मुलांना एरवीच्या वेळी चोखण्यासाठी बोंडले, बाटली किंवा निपल देऊ नका कारण अशा वस्‍तू चोखण्याची बाळाची क्रिया दूध प्‍यायच्‍या वेळी चोखण्यापेक्षा वेगळी असते. ह्यामुळे बाळाचे अंगावर पिणे कमी होते आणि आईला येणार्‍या दुधाचे प्रमाण कमी होते व बाळाचे स्‍तनपानाचे प्रमाण कमी होऊन थांबू ही शकते.

अनेक मातांना असा खात्री देणे आवश्यक असते की त्यांच्या दुधामधून बाळाला पुरेसे पोषण मिळते. ज्या मातांना असा आत्मविश्वास नसेल त्यांना बालकाच्या पित्याने, कुटुंबियांनी शेजारी, आरोग्‍यसेवक, आणि स्‍त्री संगठनांनी मदत केली पाहिजे व प्रोत्साहन दिले पाहिजे.

स्तनपान करवितांना आईला आपोआपच विश्रांतीची संधी मिळते. अशी विश्रांती तसेच पुरेसे अन्नपाणी त्या स्‍त्रीला मिळावे ह्यासाठी तिच्या पतीने व कुटुंबियांनी प्रयत्न करणे व तिला घरकामामध्ये मदत करणे गरजेचे आहे.

महत्वाचा संदेश: स्तनपानाद्वारे बालके व मुलांचे जीवघेण्या रोगांपासून संरक्षण होते

याशिवाय स्तनपानामधून आई व मुलामध्ये विशेष नाते घडविले जाते.

आईचे दूध म्हणजे बाळाचे ‘पहिले लसीकरण’ समजावे. कारण आईच्या दुधामुळे बाळाचे अतिसार (डायरिया), छाती व कानाची दुखणी व अशाच इतर गंभीर आजारांपासून आपोआपच संरक्षण होते. पहिले सहा महिने बाळ फक्त आईच्या दुधावरच असल्यास आणि मूल दोन वर्षांचे होईपर्यंत व पुढे ही स्‍तनपान चालू ठेवल्‍यास हे संरक्षण अधिकच भक्कम बनते. कोणते ही इतर पेय किंवा आहार ह्या दर्जाचे संरक्षण देऊ शकत नाही.

बाटलीने दूध पिणार्‍या मुलाच्या तुलनेमध्ये अंगावर पिणार्‍या बाळाला आईचे लक्ष आणि वात्सल्य साहजिकच अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे बाळास अधिक सुरक्षित वाटते आणि त्याची वाढ व विकास चांगल्या रीतीने होण्यास मदत होते.

महत्वाचा संदेश: बाटली ने दूध पाजल्याने आजारपण तसेच मृत्यू देखील ओढवू शकतो.

एखाद्या मातेस स्तनपान करवणे शक्य नसल्यास तिने आपले दूध किंवा दुधासाठीचा पर्यायी अन्नपदार्थ एखाद्या स्वच्छ कपामध्ये घेऊन बालकास द्यावा

अस्वच्छ बाटल्या व बोंडल्यांमुळे बाळाला अतिसार व कानाची दुखणी होऊ शकतात. अतिसार जीवघेणा ही ठरू शकतो. अर्थात प्रत्येक वेळी बोंडले व बाटली उकळत्या पाण्याने निर्जंतुक केल्याने हा धोका टाळता येत असला तरी देखील बाटलीने दूध पिणारी मुले तुलनेने जास्त वेळा आजारी पडू शकतात व त्यांना अतिसारदेखील अधिक वेळा होतो.

मातेला अंगावर पाजणे शक्य नसल्यास अशा वेळी तिने आपले किंवा कोण्या अन्य निरोगी मातेचे दूध स्वच्छ कपामध्ये काढून बाळास द्यावे. नवजात अर्भकांनादेखील कपाने दूध पाजता येते.

बाळासाठी उत्तम आहार म्‍हणजे स्‍वत:च्‍या आईचे दूध उपलब्‍ध नसल्‍यास इतर निरोगी मातेचे दूध होय.

आईचे दूध उपलब्ध नसल्यास, पुरेसा पोषणयुक्त पर्यायी पदार्थ बाळाला कपाने भरवता येतो. मात्र अशा पर्यायी अन्नावर वाढणार्‍या मुलांना आजारपणाचा व मृत्यूचा ही धोका अधिक असतो.

बाळाला पर्यायी पदार्थ दिल्याने त्याची पुरेशी वाढ तर होत नाहीच शिवाय त्या अन्नामध्ये फारच कमी किंवा फारच जास्त प्रमाणात पाणी मिसळल्याने किंवा पाणी स्वच्छ नसल्यास बाळ आजारी पडू शकते. असे अन्न तयार करण्याआधी त्यामध्ये मिसळण्याचे पाणी उकळून थंड करणे व ते तयार करण्यासंबंधीच्या सूचना पाळणे गरजेचे आहे.

प्राण्‍यांची दुधे व बालकांसाठीचे खास अन्न काही तासांतच खराब होते. मात्र आईचे दूध स्वच्छ भांड्यात झाकून ठेवल्यास नेहमीच्या हवेमध्ये देखील आठ तासांपर्यंत चांगले राहते.

महत्वाचा संदेश: सहाव्या महिन्यापासून बाळांना विविध इतर अन्नपदार्थांची गरज असते. तरी ही मूल दोन वर्षांचे झाले तरी आणि त्‍या पुढे ही त्याला स्तनपान देणे चालू ठेवा

मुलांना सहाव्या महिन्यानंतर जास्तीचे अन्न लागत असले तरी आईचे दूध हा त्यांच्यासाठी शक्तीचा मोठा स्रोत असतो. त्यामध्ये अ जीवनसत्व, लोह आणि प्रथिनेदेखील भरपूर असतात. बाळाचे स्तनपान चालू असेपर्यंत त्याला आईच्या दुधाद्वारे रोगांपासून संरक्षण मिळते. सहा महिने ते 1 वर्ष ह्या काळात इतर अन्नपाणी देण्याच्या आधी बाळास आईचे दूध द्यावे म्हणजे दर रोज आईचे भरपूर दूध बाळाच्या पोटात खात्रीने जाईल. बाळाच्या आहारामध्ये शिजवून कुस्‍करलेला भाजीपाला, धान्‍ये, डाळी व फळे, थोडेफार तेल, तसेच अंडी, मासे, मांस व दुधाच्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे ज्यायोगे त्यास सर्व प्रकारची जीवनसत्वे व खनिजे मिळतील. दुसर्‍या वर्षी मुलास जेवणानंतर व इतर वेळी आईचे दूध द्यावे. आई मुलाला, परस्परसंमतीने, किती ही काळापर्यंत स्तनपान करवू शकते.

बाळाला पूरक आहार देण्याबद्दल सर्वसाधारण दिशानिर्देश

बाळाचे वय 5 महिने ते 12 महिने -  वारंवार स्तनपान करवा आणि दिवसातून 3 - 5 वेळा इतर आहार द्या.

मुलाचे वय 12 महिने ते 24 महिने -  वारंवार स्तनपान द्या आणि दिवसातून 5 वेळा आपण खातो तेच अन्नपदार्थ द्या.

मुलाचे वय 24 महिन्यांपेक्षा जास्त -  मूल व आईच्या परस्परसंमतीने स्तनपान द्या आणि दिवसातून 5 वेळा आपण खातो तेच अन्नपदार्थ द्या.

मूल रांगू व चालू लागले आणि आईच्या दुधाखेरीज इतर अन्न खाऊ लागले की त्याचे आजारी पडण्याचे प्रमाण ही वाढते. आजारी मुलास आईचे दूध भरपूर द्या. विशेषतः आजारी मुलाची इतर अन्न खाण्याची इच्छा कमी झाल्यास आईच्या दुधाच्या रूपाने त्याला सकस व पचायला सोपे अन्न मिळेल.

शिवाय मूल चिडचिड करत असल्यास स्तनपान करविल्याने त्याला शांत वाटते.

महत्वाचा संदेश : एखादी माता घरापासून दूर नोकरी करीत असल्यास तिने तिच्या मुलाबरोबर असण्याच्या काळात जास्तीत जास्त वेळा त्यास स्तनपान द्यावे.

  • काम करणार्‍या आईला आपल्या बाळाबरोबर असणे शक्य नसल्यास वेळ मिळेल त्यानुसार तिने बाळाला स्तनपान करविले पाहिजे. वारंवार स्‍तनपान देण्‍याने देखील आईला जास्त दूध येईल.
  • कामाच्या ठिकाणी बाळाला पाजणे आईला शक्य नसल्यास तिने दिवसातून दोन-तीन वेळा आपले दूध काढून स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे. हे दूध खोलीच्‍या तपमानात देखील आठ तासांपर्यंत चांगले राहते. नंतर बाळाला स्चच्छ कपामधून ते भरवावे.
  • आईने आपल्‍या दुधाचे पर्यायी पदार्थ देऊ नये
  • स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा, पाळणाघरे तसेच स्तनपान करवण्यासाठी योग्य जागा आणि वेळ उपलब्ध करून देण्यासारख्या सोयी पुरवण्यासाठी कुटुंबीय व समुदायांनी काम देणार्‍यांना प्रोत्‍साहन द्यावे.

महत्वाचा संदेश: बाळाच्या जन्मानंतर आईने त्यास सतत अंगावरचेच दूध पाजल्यास तिला पुढील संभाव्य गर्भारपणापासून 98 टक्‍के संरक्षण मिळते

अर्थात् ह्यासाठी तिची मासिक पाळी चालू झाली नसली पाहिजे, बाळाने रात्रंदिवस आईचेच दूध प्यायले पाहिजे व बाळास कोणते ही इतर अन्नपाणी किंवा त्यास गप्प करण्यासाठी बोंडले देता कामा नये.

जितक्या जास्त वेळ स्तनपान करविले जाईल तितकी त्या आईची मासिक पाळी उशीरा चालू होते. जर आई 24 तासांमध्ये 8 पेक्षा ही कमी वेळा स्तनपान करवत असेल, बाळास इतर अन्नपाणी किंवा त्यास गप्प करण्यासाठी बोंडले दिले जात असेल तर बाळाचे अंगावर दूध पिणे कमी होऊन स्‍त्रीची मासिक पाळी लवकर चालू होण्याची अधिक शक्यता असते.

बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये, मासिक पाळी चालू न होता देखील, स्त्रीला गर्भ राहू शकतो.

खालील मुद्द्यांपैकी एक देखील लागू असल्यास पुढचे गर्भारपण टाळू इच्छिणार्‍या महिलेने गर्भनिरोधनाच्या इतर पद्धती वापराव्या -

  • तिची मासिक पाळी पुन्हा चालू झाली असल्यास
  • बाळास इतर अन्नपाणी किंवा त्यास गप्प करण्यासाठी बोंडले दिले जात असल्यास
  • बाळ सहा महिन्यांचे झाले असल्यास

पहिले मूल किमान दोन वर्षांचे होईपर्यंत, त्याच्या तसेच त्याच्या आईच्या तब्येतीच्या दृष्टीने, पुढील गर्भधारणा टाळणे हिताचे असते. सर्व नवीन पालकांना प्रशिक्षित सुइणीने किंवा आरोग्यसेवकाने कुटुंबनियोजनासंबंधीचा सल्ला देणे आवश्यक आहे.

गर्भनिरोधनाच्या पद्धतींचा आईच्या दुधाच्या गुणवत्तेवर सामान्यपणे परिणाम होत नाही. परंतु काही गोळ्यांमधील ऍस्ट्रोजेन ह्या द्रव्यामुळे आईच्या दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. प्रशिक्षित आरोग्यसेवक स्तनपान करविणार्‍या आईला गर्भनिरोधनाच्या योग्य पद्धतीबाबतचा सल्ला देऊ शकतो/शकते.

स्त्रोत : UNICEF

अंतिम सुधारित : 5/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate