অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्नायूंना ऊर्जा कशी मिळते?

पहिला टप्पा - तात्पुरती ऊर्जा

जेव्हा आपण व्यायाम सुरु करतो तेव्हा स्नायूपेशी आपला इंधनाचा 'सदैव तयार' असलेला ऊर्जाभाग वापरतात. त्यासाठी प्राणवायूची गरज नसते. ही ऊर्जा जास्तीत जास्त 40 ते 60 सेकंदांपर्यंत पुरते. जणुकाही बॅटरीसेलप्रमाणेच ही ऊर्जा मिळते. समजा तुम्हाला बस पकडण्यासाठी अचानक पळावे लागले, किंवा कुत्रा पाठीमागे लागला वगैरे प्रसंगी काही सेकंद पळण्यासाठी एवढी ऊर्जा पुरते. मात्र या ऊर्जा वापरातून बरेच लॅक्टिक आम्ल तयार होऊन रक्तात मिसळते. या आम्लाने काही जणांना डोके दुखणे, थकवा, इत्यादी त्रास जाणवतो. काही वेळानंतर हे परिणाम निघून जातात. खर्च झालेली ऊर्जा परत भरून येण्यासाठी (म्हणजे सेल परत चार्ज होण्यासाठी) थोडासा अवधी जातो.

दुसरा टप्पा - रक्तातील साखर

पहिल्या 40 ते 60 सेकंदांनंतर स्नायूंना काम करण्यासाठी रक्तातले ग्लुकोज वापरावे लागते. यासाठी प्राणवायूची गरज असते.

तिसरा टप्पा - चरबी व ग्लायकोजेन वापर

जेव्हा रक्तातली साखर संपते तेव्हा म्हणजे 20-25 मिनिटांनंतर रक्तातील स्निग्ध पदार्थ वापरायला सुरुवात होते. यालाही प्राणवायू लागतो. जर व्यायामाची सवय असेल तर यकृत ग्लायकोजेन साठा भरपूर वाढवून ठेवते. कसलेल्या खेळाडूंना 4-5 तासांपर्यंत साठा पुरतो. हा साठा परत भरून यायला आठवडाभर काळ जावा लागतो. म्हणून त्याच खेळाडूला मोठी कुस्ती, शर्यत वगैरे एका आठवडयात परत घेता येत नाही. ग्लायकोजेन हे स्नायू व यकृतातले ऊर्जा भांडार आहे. ते मुख्यतः वनस्पती आहारातून तयार होते. म्हणून स्टॅमिना (दमसांस) वाढविण्यासाठी शाकाहार पुरतो. यासाठी मांसाहाराची गरज नसते. अर्थात प्रथिनांची गरज स्नायू भरदार होण्यासाठी लागतेच. तंदुरुस्ती (फिटनेस) म्हणजे काय? तुमचा नाडीचा वेग चांगल्या व्यायामानंतर 5 मिनिटांच्या आत परत सामान्य होत असला तर तुम्ही तंदुरुस्त आहा दीर्घ व्यायामाने आपला स्थायी नाडीचा वेग 50-60 इतका कमी पातळीवर असतो. हे तंदुरुस्तीचे लक्षण आहे अधिक वेळ व्यायाम करू शकणे म्हणजे तंदुरुस्ती.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate