(ऊर्जा-उद्गम). उष्णता, प्रकाश आणि विद्युत् यांचा पुरवठा करण्याकरिता ज्यांपासून ऊर्जा मिळविता येते, अशी नैसर्गिक ऊर्जा साधने म्हणजे म्हणजे शक्ति-उदगम वा ऊर्जा-उदगम होत. गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा असे ऊर्जेचे दोन मुख्य प्रकार आहेत. गतिज ऊर्जा म्हणजे द्रव्याच्या स्थितीमुळे साठविलेले व स्थिर स्थितीत असलेले कार्य असते. गतिज किंवा स्थितीज अवस्थेमध्ये असलेली ऊर्जा पुढील पाचपैकी एका ऊर्जेमध्ये रूपांतरित होते:
(१) पदार्थांच्या रासायनिक संरचनेमध्ये बदल झाल्यामुळे रासायनिक ऊर्जा निर्माण होते. (उदा.; इंधनाचे ज्वलन होऊन).
(२) विद्युत् प्रवाहामधील किंवा विद्युत् घट किंवा ⇨ इंधन-विद्युत् घटअशा प्रकारच्या तात्पुरत्या साठ्यांमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या गतीमुळे विद्युत ऊर्जा निर्माण होते.
(३) द्रव, घन किंवा वायुरूप द्रव्यावर लावण्यात आलेल्या प्रेरणेमुळे यांत्रिक ऊर्जा निर्माण होते.
(४) द्रव्याला उष्णता दिली असता उष्मीय ऊर्जा निर्माण होते.
(५) न्यूट्रॉनांच्या आघाताने अणुकेंद्राचे दोन किंवा अधिक भागांमध्ये तुकडे होऊन अणुकेंद्रीय भंजन होते आणि अणुकेंद्रीय प्रोट्रॉन व न्यूट्रॉन यांना बांधून ठेवणारी प्रेरणा मुक्त होऊन ऊर्जा निर्माण होते.
दैनंदिन व्यवहारात एका ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होऊन त्यायोगेच कार्य घडून येते. ऊर्जा शून्यातून निर्माण होऊ शकत नाही किंवा ती नाश पावत नाही; पण तिचे रूपांतर होऊ शकते या तत्त्वाला ऊर्जा अक्षय्यतेचे (किंवा अविनाशितेचे) तत्त्व असे म्हणतात. [⟶ द्रव्य आणि ऊर्जा यांची अक्षय्यता]. खनिज तेल, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू व अणुइंधने हे प्रमुख ऊर्जा-उदगम आहेत. यांना व्यापारी इंधने असेही म्हणतात. गोवऱ्या-शेण, लाकूड व लोणारी कोळसा [⟶ कोळसा, लोणारी] आणि वनस्पतिज अवशेष ही व्यापारेतर इंधने आहेत. व्यापारी इंधने मुख्यतः आधुनिक औद्योगिक क्षेत्रांत व नागरी भागांत वापरली जातात. ग्रामीण जनतेची ऊर्जेची गरज मुख्यत्त्वे व्यापारेतर इंधनांनी भागविली जाते. दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू आणि अणुइंधने वापरली की संपतात. त्यामुळे टंचाई निर्माण होणार नाही अशा ऊर्जा-उदगमांचा कसा वापर करून घेता येईल यांविषयी प्रयत्न चालू आहेत.
सूर्यापासून येणारे प्रारण (तरंगरूपी ऊर्जा), वारा, भरती-ओहोटी , सागरातील व पृथ्वीतील उष्णता इत्यादींचा यात समावेश होतो. या ऊर्जा-उदगमांची सहा वर्गामध्ये विभागणी करतात: प्राथमिक ऊर्जा, द्वितीयक ऊर्जा, पुनर्निर्मितिक्षम ऊर्जा, पुनर्निर्मितीक्षम नसलेली ऊर्जा, ज्वलन असलेली प्रक्रिया व ज्वलन नसलेली प्रक्रिया. (कोष्टक क्र. १ व २). वर दर्शविलेल्या ऊर्जा-उदगमांचे पारंपरिक किंवा संपुष्टात येऊ शकणारे आणि अपारंपरिक किंवा संपुष्टात येण्याची शक्यता नसलेले अशा प्रकारेही वर्गीकरण करता. ऊर्जेचे विविध प्रकार उपलब्ध असले, तरीसुद्धा या सर्व प्रकारांत विद्युत ऊर्जा वापरण्यास अत्यंत सुलभ आणि सोयीस्कर ठरली आहे. विद्युत् ऊर्जा निर्मितीसाठी विकसित झालेले पारंपरिक तंत्रज्ञान तीन प्रमुख प्रकारांचे आहे : (१) औष्णिक उदगमांवर आधारित, (२) जलविद्युत आणि (३) आण्विक प्रकारचे. यांतही औष्णिक विद्युत् ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञान ऐतिहासिकदृष्ट्या प्रथम विकसित झाले. आण्विक विद्युत् ऊर्जा निर्मितीचा विकास विसाव्या शतकाच्या मध्यापासून होऊ लागला.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
ऊर्जे विषयीच्या बातम्या
कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा.
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्य...