অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनस्पती आणि आरोग्य

प्रस्तावना

आपण राहतो तेथे आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. त्यांतल्या काही मोसमी-अल्पजीवी तर काही बहुवर्षीय असतात. हल्ली पर्यावरणाचा -हास होत असल्याने वनस्पतींची मुबलकता कमी होत आहे. अशा परिस्थितीत बहुउपयोगी वनस्पतींचे संवर्धन करून (औषधी बाग) आपण आरोग्य रक्षणाचे काम चालू ठेवू शकतो. सभोवताली फिरून अभ्यास केला तर अनेक औषधी वनस्पतींची ओळख पटेल. सुरुवातीला एखाद्या जाणकारास बरोबर घेतले तर मग अडचण येणार नाही. या वनस्पतींचा वापर केला तर हल्ली विकत आणाव्या लागणा-या औषधांपैकी कितीतरी औषधे आणावी लागणारच नाहीत. पूर्वी आजीच्या बटव्यातून, आणि स्त्रियांच्या पारंपरिक ज्ञानानुसार अनेक वनस्पतींचा औषधी वापर होत असे. अजूनही ब-याच प्रमाणात ही बहुमोल परंपरा टिकून आहे. गावपातळीवरची आरोग्यसेवा चांगली उभी राहण्यासाठी तर ती फारच आवश्यक आहे. आरोग्य आणि औषधोपचार फक्त पॅकबंद, इंग्रजी लेबलच्या बाटल्या-गोळयांतूनच येतात हा समज चुकीचा आहे. सभोवतालच्या निसर्गातून आरोग्यरक्षण करता येते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपण आपल्या औषधी वनस्पतींची यादी करायला बसलो तर किती तरी मोठी यादी तयार होईल.

औषधी वनस्पती

तुळस, गुळवेल, नागरमोथा, कंबरमोडी, कोरफड, पुनर्नवा, पाणकणीस, धोत्रा, कडुनिंब, कुडा, सातवीण, भुईरिंगणी, आघाडा, शंखपुष्पी, टाकळा, हिरडा, बेहडा, एरंड, भुईआवळा, पळस, साग, आवळा, अडुळसा, बहावा, त्रिधारीनिवडुंग , सागरगोटा, सुंठ, आले, हळद, पिंपळी, हरळी, मुरुडशेंग, धायटी, पपई, गोखरू, तालीमखाना, शिकेकाई, लिंबू,करंज, सीताफळ, काटेसावर, बाभूळ, दातवणाची झाडे, रुई, बिब्बा, अफू, रिठा, अर्जुन,आंबेहळद, जमालगोटा, इंद्रावण, इसबगोल, लसूण, ओवा अशी लांबलचक यादी तयार होईल. औषधी म्हणून उपयुक्त ठरलेल्या औषधी वनस्पती अक्षरशः शेकडो आहेत. (संदर्भासाठी श्री. वामन गणेश देसाई यांचे 'औषधी संग्रह' किंवा डॉ. गोगटे यांचे पुस्तक पाहावे.) आपण आपल्या सभोवतालच्या उपलब्ध वनस्पतींमधून पंधरा-वीस वनस्पतींची ओळख करून घेतली तरी पुरते. आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या आयुर्वेद कॉलेजच्या मदतीने अशी यादी तयार करता येईल. सर्व वनस्पती सर्व ठिकाणी उपलब्ध नसतात. तसेच स्थलकालाप्रमाणे त्यांच्यात गुण कमीजास्त असतो. हे सर्व आयुर्वेद कॉलेजच्या मदतीने एकदा माहीत करून घेता येईल.

वनस्पतींबरोबरच इतर काही साधने

मध, जळवा, मेण, राळ, इत्यादी आजूबाजूला सापडू शकतील. या सर्व माहितीबरोबर वनस्पतींच्या विषारी गुणधर्माचीही माहिती घ्यावी. आजूबाजूच्या सापांचे प्रकार, विषारी किटक, इत्यादी माहीत होणे आवश्यक आहे. असे निसर्ग निरीक्षण नसेल तर आपल्या वैद्यकीय ज्ञानात आणि कौशल्यात मोठी उणीव राहून जाईल. वनस्पतीपैकी अल्पजीवी मोसमी वनस्पती मुख्यतः ऑगस्ट-जानेवारी (श्रावण ते माघ,पौष-नारळी पौर्णिमा ते संक्रांत) या काळात असतात. या काळात त्यांना भरपूर पालवी,फुले, फळे असतात. वनस्पती गोळा करताना सकाळी गोळा कराव्यात. म्हणजे त्यात रस जास्त असतो, पण दव असेल तर मात्र दुपारी घ्यावे. दवाच्या दमटपणाने वनस्पती खराब होते. ऑक्टोबरनंतर पाऊस कमी होतो. या काळात वनस्पती सावलीत वाळवून ठेवाव्यात. वाळवण करताना मधूनमधून हात फिरवून सर्व भागांस सारखा मोकळेपणा मिळेल अशी काळजी घ्यावी. नाही तर खालच्या वनस्पती ओल्या राहणे, बुरशी लागणे वगैरे अडचणी येतात. वनस्पती चांगली सुकल्यावर सर्वसाधारणपणे मूळ वजनाच्या तिसरा हिस्सा वजन होते. वनस्पतींना उष्णता देऊन औषधीकरण करायचे असल्यास मार्चमध्ये करावे. तोपर्यंत वनस्पती पूर्ण कोरडया होतात आणि उष्णताही कमी लागते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate