অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अध्यापनात संगणकाचा वापर

सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?

संगणकाची वैशिष्ट्ये

  • १. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
  • २. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
  • ३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
  • ४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.
  • ५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.
  • ६. संगणकाच्या सर्व क्रियांमध्ये सातत्य, विश्वासार्हता दिसून येते.
  • ७. संगणकाची विविधांगी उपयोगिता पाहता त्यावर होणारा खर्च नगण्य आहे.
  • ८. भावनिक दृष्टीने कोणत्याही प्रसंगाचा संगणकाच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता

संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे. गरज आहे ती आज संगणकाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत वापरण्याची काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे संगणकाचा शिक्षणक्षेत्रात ट्यूटर, साधन म्हणून वापर करता येतो.

  • १. शाळेमध्ये संगणक शिक्षकांना गुणपत्रिका तयार करण्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रियेत मदत करतो.
  • २. निरनिराळ्या कार्यालयांमध्ये हा त्यांची कामे सोपी व लवकर करण्यास मदत करतो.
  • ३. शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान मदत करू शकतो.
  • ४. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऍनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्स, रेखाचित्रे, थ्रीडी चित्रे, पूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.
  • ५. शिक्षणात संगणकाचा वापर गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात होत आहे. संगणकामुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले आहेत. आज संगणकाचा वापर होत नाही असे जवळपास एकही क्षेत्र नाही.
  • ६. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते.
  • ७. क्रमान्वित पाठ अध्ययन पद्धतीचा वापर संगणकाच्या साहाय्याने करणे सुलभ जाते.
  • ८. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते.
  • ९. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.
  • १०. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययनअनुभव देता येतो.
  • ११. संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.
  • १२. संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव आहे.
  • १३. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात.

पॉवर पॉईंट

विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील बरीचशी माहिती ओघ तक्त्यांच्या स्वरूपात व सचित्र मांडता येते. संगणकातील पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा यासाठी प्रभावीपणे वापर करता येतो. यालाठी स्लाईड्स तयार कराव्या लागतात.
अ) स्लाईड्स तयार करणे –
स्टार्ट --- मेनू --- प्रोग्रॅम्स या पायरीने पॉवर पॉईंट चालू करून ऍप्लिकेशन विंडो मिळतात. फाईल मेनूमधील न्यू बटण क्लिक करा. त्यानंतर ब्लॅंक प्रेझेंटेशन हा पर्याय निवडा. डायलॉग बॉक्समधील टेक्स्ट एंड चार्ट (Text and Chart) ही स्लाईड निवडून त्यामधील टेक्स्ट बॉक्समध्ये शीर्षक टाईप करून त्या खालच्या भागात माहिती भरण्यासाठी तक्ता दिसेल.
या तक्त्यात माहिती ओघतक्त्याच्या स्वरूपात लिहिता येते. वनस्पती, प्राण्यांचे वर्गीकरण, बलाचे पआकार, गतीचे प्रकार व त्यांच्या व्याख्या, अशी खूप सारी माहिती दर्शविणारी उदाहरणे इत्यादी माहिती संक्षिप्त / सारांश स्वरूपात मांडता येते.
वनस्पती पेशी, प्राणी पेशी, शरीरातील विविध संस्था यांची चित्रे व त्यांच्यासंबंधी सारांशरूपात माहिती सादर करता येते. इतकेच नव्हे तर चलचित्राचा, संगीताचा समावेश त्यात करता येते. उदा. हृदयाची स्पंदने प्रत्यक्ष हालचाली दाखविता येतात.
ब) स्लाईड शो-
तयार केलेल्या विवध स्लाईड्स क्रमवार दाखविता येतात. स्लाईड्सच्या पार्श्वभूमीचा रंग, चित्रांचा रंग, मजकुराची हालचालयुक्त मांडणी इत्यादींमुळे पॉवर पॉईंट वापरून केलेले सादरीकरण खूप आकर्षक व प्रभावी ठरते. हालचाली व रंग यामुळे अवधान टिकविले जाते व मनोरंजकताही येते.

संगणकाच्या साहाय्याने अनुदेशन


संगणक केवळ शिक्षकालाच मदत करून थांबत नाही तर शिक्षकाचे काम स्वतः करण्याची संगणकाची तयारी असते. प्रत्यक्ष अनुदेशन प्रस्तुतीकरणाचे काम देखील संगणक करू शकतो. संगणकाच्या या कार्यतंत्रालाच Computer Assisted Instruction (CAI) असे म्हणतात. या तंत्राची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  • १. अनुदेशन तंत्र हे संगणक व अध्ययन कर्ता यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते आणि मानवी अध्ययन हे त्याचे उद्दिष्ट असते.
  • २. संगणक प्रत्यक्ष विद्यार्थ्याला माहिती देत असतो व विद्यार्थ्याला विवक्षित पातळीपर्यंत नेण्यासाठी संगणकामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवलेली असते.
  • ३. विद्यार्थ्याला स्वतः व्यक्तिगतरीत्या, स्वतःच्या वेगाने अध्ययन करता यावे अशी व्यवस्था संगणकामध्ये केलेली असते.

संगणकाच्या साहाय्याने अनुदेशनाचे प्रकार

१. संवाद (Dialogue)
संवाद प्रकारामध्ये संगणकामध्ये विशिष्ट अशी माहिती भरलेली असते. विद्यार्थ्यांना अध्ययन करताना जी माहिती हवी असेल ती त्याने संगणकाला विचारल्यास मिळू शकते. विद्यार्थ्याने संगणकाला प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळवायचे असा प्रकार येथे अभिप्रेत असतो.
२. उजळणी व सराव (Revision and Practice) –
यामध्ये शिक्षकाने नवनवीन संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना पारंपारिक पद्धतीने करून द्यावयाची व त्यावर आधारित उजळणी घेण्याची जबाबदारी संगणकावर सोपवायची अशी अपेक्षा असते. संगणकाची भूमिका विशिष्ट ज्ञानापुरती चाचणी घेणे. सराव घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते.
३. पृच्छा (Enquiry) –
यामध्ये अध्ययनकर्ता संगणकाला माहिती विचारतो व ती माहिती त्याला संगणकाकडून दिली जाते किंवा ती माहिती कोठे मिळेल हे सांगितले जाते.
४. समस्या निराकरण (Problem Solving) –
अध्ययनकर्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी येथे संगणकाचा उपयोग एखाद्या आकडेमोड करणा-या कॅलक्युलेटर प्रमाणे केला जातो.
५. ट्यूटोरिअल (Tutorial) –
या प्रकारामध्ये अधिक गुंतागुंत असते. क्रमपाठावर आधारित असे पाठ असतात. प्रथम संगणक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो. विद्यार्थ्याने उत्तर दिल्यास पुढील भाग सादर करतो, अन्यथा पूर्वज्ञानावर आधारित भागावर आशय अभायसण्यासाठी देतो व परत प्रश्न विचारतो. येथे प्रत्याभरण प्रबलन याचा वापर केला जातो. स्वयंअध्ययनासाठी उपयुक्त साधन.
६. प्रतिभास (Simulation) –
या तंत्रामध्ये एखाद्या क्रियेचा किंवा वस्तूचा अभ्यास करण्यासाठी हुबेहुब परंतु भासमय अशी क्रिया किंवा वस्तूची प्रतिकृती वापरून अध्यापन केले जाते. उदा. युरेनियमपासून किरणांचे उत्सर्जन कसे होते किंवा अणुस्फोट कसा होतो हे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही. यासाठी संगणकामध्ये प्रतिभास प्रतिमान वापरून विद्यार्थ्यांसमोर त्या अनुदेशाने प्रस्तुतीकरण करता येते.

स्त्रोत: शिक्षक मंच

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate