पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात श्री. श्रीकांत रासने यांचा जन्म दि. 06 ऑक्टोबर 1966 रोजी झाला. त्यांचे वडिल ठाकूर सावदेकर कंपनीत मुख्य लेखापाल म्हणून कार्यरत होते. श्री. रासने यांचे शालेय शिक्षण पुण्यातील प्रख्यात नु.म.वि. प्रशाळेत झाले. ते विशेष प्राविण्यासह दहावी उत्तीर्ण झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान विषयात ते बारावी झाले.
बारावीला 90 टक्के गुण मिळवूनही त्यांना हवी असलेली इंजिनियरिंगची शाखा मिळाली नाही, म्हणून त्यांनी कुस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनियरिंग हा प्रख्यात अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केला. 1986 साली डिप्लोमा केल्यावर एक वर्ष त्यांनी त्याच संस्थेत अध्यापनाचे काम केले. पहिल्या 5 क्रमांकामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्था ही संधी देत असते.
भारत सरकारच्या डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन काँप्युटर सेंटर व आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॉब्लिशमेंट, पुणे या संशोधन संस्थेत श्री. रासने यांना 1987 साली संशोधक सहायक म्हणून संधी मिळाली. अत्यंत कठिण अशा प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे त्यांची ही निवड झाली. 200 उमेदवारांमधून ते एकटेच निवडल्या गेले. या संस्थेत संशोधन करित असतानाच त्यांनी इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स या संस्थेचा ग्रॅज्युएट प्रोग्राम इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवी समकक्ष समजला जातो. तद्तवच त्यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रानिक्स अँड टेलीकम्युनिकेशमधील पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
श्री. रासने यांनी 1990 साली बी.ई. केल्यानंतर डीआरडीओच्या अखिल भारतातील विविध प्रयोगशाळांतील प्रतिभावान आणि बुद्धीमान संशोधकांच्या परिक्षेद्वारे त्यांची मुंबईतील पवई येथील आयआयटी मध्ये कॉम्प्युटर सायन्स या विषयात मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. संपूर्ण भारतातून झालेल्या निवड परीक्षा व मुलाखतीतुन अंतिम 20 जणांची निवड झाली. त्यात श्री. रासने यांचा समावेश होता. दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम विशेष प्राविण्याने पूर्ण केल्यावर श्री. रासने पुन्हा पुण्यात संशोधन संस्थेमध्ये मूळ पदावर रुजू झाले.
खरे म्हणजे, आयआयटीतून कॉम्प्युटर सायन्समधील एम.टेकची पदवी मिळाल्यावर श्री. रासने यांना परदेशात चांगल्या करिअरची संधी उपलब्ध होती, पण आपल्या देशासाठीच काम करण्याची प्रबळ इच्छा आणि देशातील युवकांना संगणक क्षेत्रात जागतिक पातळीचे शिक्षण देण्याचा ध्यास यामुळे श्री. रासने यांनी परदेशात न जाता आपल्या देशातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याचे कार्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण संशोधन क्षेत्रातील उत्तम अशी नोकरी सोडण्याचे धाडस केले आणि आपले सहकारी श्री नरेंद्र बऱ्हाटे यांचेबरोबर 1994 साली सीड इन्फोटेक या नावाने संगणक प्रशिक्षण संस्था सुरु केली.
प्रखर इच्छाशक्ती, 400 चौरस फूट जागा, 8 संगणक आणि 1 लाख रुपयांच्या भांडवलाच्या आधारे त्यांनी ही प्रशिक्षण संस्था सुरु केली. संस्था सुरु करताना आणखी तीन सहकारी होते. पण त्यापैकी दोघांना शिकविण्याची फारशी गोडी नसल्याने ते वर्षभरातच बाहेर पडले. श्री रासने व श्री. नरेंद्र बऱ्हाटे मात्र आजपर्यंत सोबत आहेत. सुरुवातीला 8 संगणक असल्यामुळे एका बॅचमध्ये 8 विद्यार्थी असायचे. विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, त्यांना शिकविणे, शिकविण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे, संस्थेचे इतर सर्व व्यवहार पाहणे, वेळप्रसंगी साफसफाईही करणे, संगणकांची दुरुस्ती, देखभाल करणे अशी सर्व कामे श्री. रासने यांनी केली. त्यावेळी इंटरनेट युगातील डॉटकॉमची लाट जोरात होती. त्यामुळे संस्थेतर्फे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे कोर्सेस सुरु करण्यात आले.
संगणकाचे महत्व जसजसे लोकांना कळू लागले तसतशी विद्यार्थी संस्था वाढू लागली. त्यामुळे संस्थेची जागा, संगणक व अन्य व्यवस्था अपुरी पडू लागली. दीड वर्षाने संस्था 1 हजार चौरस फुटाच्या जागेत गेली. त्यामुळे संगणकांची संख्या 8 वरुन 20 वर नेता आली. तसेच अभ्यासक्रमांचा कालावधी एक ते तीन महिने असा ठेवण्यात आला. या संस्थेबरोबरच श्री. रासने विविध कंपन्यांमध्ये जाऊन तेथील अधिकारी व कर्मचारी तसेच सी डॅक संस्थेतही प्रशिक्षण देऊ लागले. त्यामुळे उत्पन्नातही भर पडू लागली. परंतु, तांत्रिक ज्ञानाबरोबरच अकाऊंटस, बँकींग, ॲडमिनिस्ट्रेशन, कायदेशीर बाबींची पूर्तता अशा बाबींचे ज्ञान नव्हते आणि प्रारंभी या कामांसाठी वेगळे कर्मचारीही नेमणे शक्य नव्हते. त्यामुळे अशी सर्व कामेही श्री. रासने यांना अवगत करावी लागली. अर्थात प्रारंभीच्या या कामांच्या अनुभवाचा पुढे त्यांना फार उपयोग होत गेला. पहिल्या वर्षी त्यांची उलाढाल 4 लाख रुपये इतकी होती. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 7 लाख, तिसऱ्या वर्षी 12 लाख अशी वेगाने प्रगती करत 2001 पर्यंत ते दोन कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहचले. त्या बरोबरच 1998 साली संस्थेने गुणवत्ता मान्यता प्राप्तीसाठी आयएसओ नामांकन प्राप्त केले. पण 2001 साली संगणक क्षेत्रात मंदीची लाट येऊन बऱ्याच कंपन्या व प्रशिक्षण संस्था बंद पडल्या. या कठीण काळात 3/3 महिने पगारही न घेता श्री. रासने व त्यांचे सहकारी यांनी संस्था चालवली. त्यामुळे संस्था कायम राहिली आणि त्याचा फायदा 2004 साली संगणक क्षेत्रात भरभराट सुरु झाली तेव्हा झाला.
काळाची गरज ओळखून संगणक क्षेत्रातील सॉफ्ट वेअर डेव्हेलोपमेंट, टेस्टिंग, हार्ड वेअर असे विविध अभ्यासक्रम संस्थेने हाती घेतले आणि त्यांना विद्यार्थ्यांचाही भरभरुन प्रतिसाद मिळू लागला. संस्थेच्या वाढीसाठी अधिक भांडवलाची गरज भासु लागली. ही गरज सहकारी बँक पुरी करु शकत नव्हती. म्हणून श्री. रासने यांनी बँक ऑफ बरोडा या राष्ट्रीकृत बँकेकडून मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य घेतले आणि संस्थेच्या शाखांमध्ये भर पडली. आज संस्थेतील शिक्षणाचा दर्जा हा जागतिक स्तराचा असून मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट, ओरॅकल, सॅप, आयबीएम, एचपी अशा जागतिक नामवंत तंत्रज्ञान कंपनींबरोबर करार करुन संस्थेने त्यांचे अधिकृत प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले आहे .
पदवी शिक्षण घेता घेता संगणकाचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच, ज्यांनी पदवी प्राप्त केली आहे आणि ज्यांना संगणक क्षेत्रात काम करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तीन महिने ते एक वर्ष कालावधीचे पूर्ण वेळ रोजगाराभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांच्या सीड ह्या संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिले जातात. त्यांची संस्था भारतातील नॅशनल स्किल डेव्ह्लोपमेंट कॉर्पोरेशन मान्यता प्राप्त प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेने आजपर्यंत 6 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना रोजगाराभिमुख संगणक प्रशिक्षण दिले आहे. या संस्थेच्या प्रशिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांना देशात व परदेशातही उच्च पदांच्या नोकऱ्या मिळू शकल्या.
संस्थेच्या आता, पुण्याबरोबरच मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी अशा महाराष्ट्रातील विविध शहरांबरोबरच इंदोर, भोपाळ, बंगलुरु, जयपूर, नवी दिल्ली येथे एकुण 45 हून अधिक शाखा आहेत. त्यांची संस्था वर्षाला २५ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करते याशिवाय संगणक क्षेत्रातील 200 हून अधिक नामांकित कंपन्यातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिल्या जाते. श्री. रासने यांच्या संस्थेत आज 250 अध्यापक तर 350 अन्य अधिकारी, कर्मचारी असे जवळपास 600 जणं कार्यरत आहेत. त्यांची प्रशिक्षण संस्था आज देशात अग्रक्रमावर आहे. श्री. रासने यांचे कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, चीन या देशांमध्ये दौरे झाले आहेत.
संस्थेच्या कार्याची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाद्वारे उच्च दर्जाच्या मनुष्यबळाची निर्मिती केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबरोबरच संस्थेला मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट, सॅप या नामांकित तंत्रज्ञान कंपनींचे पुरस्कार मिळाले आहे. श्री. रासने यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण आखण्यासाठी नेमलेल्या समितीत त्यांना निमंत्रित केले होते. बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशनने नेमलेल्या समितीचेही ते उद्योग जगातील निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच कुस्त्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अभ्यासक्रम समितीचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ते उपाध्यक्षही आहेत.
श्री. रासने यांचा 1996 साली देवयानी यांच्याशी विवाह झाला. त्या स्वत: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत. त्यांनी विवाहानंतर 2/3 वर्षे नोकरीही केली. पण संस्थेचा व्याप वाढू लागल्याने त्या पूर्ण वेळ गृहिणी झाल्या. श्री. रासने यांची कन्या देवश्री ही बारावीत तर मुलगा रोहन नववीत शिकत आहे. स्थिर सरकारी नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायात उडी मारताना पत्नीने दिलेले नैतिक पाठबळ फार मोलाचे ठरले अशी कृतज्ञता श्री. रासने व्यक्त करतात.
आजच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी केवळ अधिकाधिक गुणांच्या मागे न लागता रोजगारक्षम होण्यासाठी आपल्या पाल्याचा कल आणि क्षमता ओळखून बहु आयामी कौशल्यांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे श्री. रासने यांना मनापासून वाटते व त्यासाठी ते स्वत: सतत प्रयत्नशिल असतात. श्री. रासने यांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
लेखक: देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) (प्रशासन)
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 8/12/2020
सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम...
कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावाने गायरान जमिनीचा ...
या २१व्या शतकात आपल्याला जर आपली शिक्षण पद्धती आधु...
कृषी व्यवसायात संगणकामध्ये असणाऱ्या संकेतस्थळांचा ...