आफ्रिकेच्या गिनी आखातावरील एक प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ३,२२,४६३ चौ. किमी.;लोकसंख्या ४३,१०,००० (१९७० अंदाज). हा देश ५० उ. ते १०० उ. व ३०७' प. ते७० ३४' प. यांदरम्यान आहे. याच्या पश्चिमेस लायबीरिया व गिनी, उत्तरेस माली व अपर व्होल्टा, पूर्वेस घाना आणि दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. किनाऱ्याची लांबी ५०५ किमी. आहे.
किनारी प्रदेश सखल असून समुद्रकिनारा बराचसा सरळ आहे. किनारा बहुतेक आर्कियन खडकांचा बनलेला असून त्याचा पश्चिम भाग खडकाळ उभ्या कड्यांचा आहे. पूर्व भाग सपाट व वालुकामय असून गिनी प्रवाहामुळे त्यावर वाळूचे दांडे तयार झालेले आहेत. वाळूच्या दांड्यांमुळे बनलेल्या खारकच्छांमध्ये लाहू, एब्री व आसीनी ही प्रमुख आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतचा सखल प्रदेश सु. ६५ किमी. रुंद असून पुढील प्रदेशाची उंची हळूहळू वाढत जाऊन त्याला पठारी स्वरूप प्राप्त झालेले आहे. या पठारी प्रदेशाची उंची सु. ३०० मी. असून त्यात अनेक टेकड्या, डोंगर व पर्वत आहेत. पश्चिमेकडील निंबा पर्वत ग्रॅनाइटचा असून त्याची उंची १,८५० मी आहे. बहुतेक मुख्य नद्या दक्षिणेकडे वाहात येतात. पठारावरून मैदानात शिरताना त्यांवर द्रुतवाह व धबधबे निर्माण झालेले आहेत. कव्हॅली ही ४८० किमी. लांबीची नदी लायबीरियाच्या सरहद्दीवरून वाहते. ८०० किमी. लांबीची बांदामा व तेवढ्याच लांबीची कोम्वे, तसेच ससँद्रा या नद्या गिनीच्या आखाताला मिळतात. काही लहान नद्या वायव्येकडे नायजर नदीला आणि काही ईशान्येकडे व्होल्टा नदीला जाऊन मिळतात. आयव्हरी कोस्टच्या पूर्व व दक्षिण भागांत जांभा दगड आणि लाल व पिवळ्या रंगाची माती आढळते. देशाच्या उत्तर व पश्चिम भागात चर्नोझम प्रकारची माती आढळून येते. देशात बॉक्साइट, कोलंबाइट, तांबे, हिरे, सोने, लोखंड व मँगॅनीज ह्यांचे साठे आहेत.
किनारी प्रदेशातील हवामान विषुववृत्तीय आहे. येथील सरासरी तपमान २५०-२८० से. असून वार्षिक पाऊस १२५ सेंमी. पण काही ठिकाणी ४०० सेंमी. हून अधिक पडतो. मे-जुलै व ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन कालखंडात येथे पाऊस जास्त पडतो. उत्तरेकडील पठारावरील तपमानात उंचीनुसार फरक पडत जातो. या भागात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा कालावधी असून तो बिनपावसाचा असतो. सहारामधून हरमॅटन वारे वाहत येतात. त्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. किनारी प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे दलदलीचे प्रदेश निर्माण होऊन त्यात कच्छवनश्री आढळते. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना प्रथम विषुववृत्तीय घनदाट अरण्ये दिसून येतात. उत्तरेकडील पठारी प्रदेशात पानझडी वृक्षांची अरण्ये आहेत, तर ८ उत्तर अक्षांशाच्या उत्तरेस खुरटी काटेरी वनस्पती व सॅव्हॅनाचा गवताळ प्रदेश दिसून येतो. येथील प्रमुख वृक्ष म्हणजे रोजवुड, मॉहॉगनी, रबर, सागवान, ग्रीनहार्ट, तेल्याताड, बाभूळ, शीनट इ. होत. देशात हत्ती, वाघ, तरस, लांडगे, हरिण, पाणघोडा, सिंह, रानडुक्कर, झेब्रा, जिराफ, विविध प्रकारची माकडे, साप, सुसरी इ. प्राणी विपुल आहेत.
लेखक : अ. नी.पाठक
स्त्रोत :मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2023
आयव्हरी कोस्ट : आफ्रिकेच्या गिनी आखातावरील एक प्रज...
पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट देशाची राजधानी. ५०...