पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट देशाची राजधानी. ५० १०' उ. ३० ५८' प.; लोकसंख्या सु. ५,००,००० (१९७०). हे एब्री खारकच्छच्या उत्तर तीरावर असल्यामुळे, दक्षिण तीरावरील बवेत या ११ किमी. अंतरावरील बंदरातून किंवा पूर्वेच्या ग्रँड बासाम बंदरातून व्यापार चालत असे. बवेत हे लोहमार्गाने आबीजानशी जोडलेले आहे. १९५१ मध्ये खारकच्छाचा वाळूचा दांडा फोडून आबीजान हेच चांगले बंदर करण्यात आले. हा वाळूचा दांडा फोडून झालेला कालवा सु. ३ किमी. लांब, १६ मी. खोल व ४०० मी. रुंद आहे. १९५८ मध्ये लिटल बासाम या दक्षिणेकडील उपनगराशी आबीजान पुलाने जोडले गेले. अपर व्होल्टामधील बोबो-ड्यूलॅसेशी हे लोहमार्गाने जोडलेले असून शहराजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आजूबाजूच्या प्रदेशात कॉफी, कोको, कापूस, ताडतेल, लाकूड, रबर, भुईमुग इत्यादींचे उत्पादन होते; त्यांची निर्यात येथून होते.
तसेच कापड, यंत्रे, पेट्रोलिअम, अन्नपदार्थ इत्यादींची आयात होते. साबण, पदार्थ डबाबंद करणे, लाकूड कापणे, दारू गाळणे हे येथील स्थानिक उद्योगधंदे आहेत. नित्योपयोगी वस्तू बनविणे, वाहनांची जोडणी करणे, तेलशुद्धीकरण हे व्यवसायही सुरू झाले आहेत. शहराची रचना आधुनिक असून त्यात रुंद रस्ते, दुतर्फा झाडे व बागा आहेत. गावात सरकारी कचेऱ्या, परदेशी वकिलाती, शिक्षणसंस्था, सभागृहे, न्यायालये, रुग्णालये इत्यादींच्या मोठ्या इमारती आहेत; नाट्यगृहे, ग्रंथालये, संग्रहालयेही आहेत. येथील पुळण, बँको अरण्य, वनस्पतींचे उद्यान, १९६४ पूर्वीची राजधानी बिंगरव्हिल ही प्रेक्षणीय आहेत.
लेखक : ज. ब. कुमठेकर
स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2023