आयव्हरी कोस्ट
आफ्रिकेच्या गिनी आखातावरील एक प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ३,२२,४६३ चौ. किमी.; लोकसंख्या ४३,१०,००० (१९७० अंदाज). हा देश ५० उ. ते १०० उ. व ३०७' प. ते ७० ३४' प. यांदरम्यान आहे. याच्या पश्चिमेस लायबीरिया व गिनी, उत्तरेस माली व अपर व्होल्टा, पूर्वेस घाना आणि दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. किनाऱ्याची लांबी ५०५ किमी. आहे.
भूवर्णन
किनारी प्रदेश सखल असून समुद्रकिनारा बराचसा सरळ आहे. किनारा बहुतेक आर्कियन खडकांचा बनलेला असून त्याचा पश्चिम भाग खडकाळ उभ्या कड्यांचा आहे. पूर्व भाग सपाट व वालुकामय असून गिनी प्रवाहामुळे त्यावर वाळूचे दांडे तयार झालेले आहेत. वाळूच्या दांड्यांमुळे बनलेल्या खारकच्छांमध्ये लाहू, एब्री व आसीनी ही प्रमुख आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतचा सखल प्रदेश सु. ६५ किमी. रुंद असून पुढील प्रदेशाची उंची हळूहळू वाढत जाऊन त्याला पठारी स्वरूप प्राप्त झालेले आहे. या पठारी प्रदेशाची उंची सु. ३०० मी. असून त्यात अनेक टेकड्या, डोंगर व पर्वत आहेत. पश्चिमेकडील निंबा पर्वत ग्रॅनाइटचा असून त्याची उंची १,८५० मी आहे. बहुतेक मुख्य नद्या दक्षिणेकडे वाहात येतात. पठारावरून मैदानात शिरताना त्यांवर द्रुतवाह व धबधबे निर्माण झालेले आहेत. कव्हॅली ही ४८० किमी. लांबीची नदी लायबीरियाच्या सरहद्दीवरून वाहते. ८०० किमी. लांबीची बांदामा व तेवढ्याच लांबीची कोम्वे, तसेच ससँद्रा या नद्या गिनीच्या आखाताला मिळतात. काही लहान नद्या वायव्येकडे नायजर नदीला आणि काही ईशान्येकडे व्होल्टा नदीला जाऊन मिळतात. आयव्हरी कोस्टच्या पूर्व व दक्षिण भागांत जांभा दगड आणि लाल व पिवळ्या रंगाची माती आढळते. देशाच्या उत्तर व पश्चिम भागात चर्नोझम प्रकारची माती आढळून येते. देशात बॉक्साइट, कोलंबाइट, तांबे, हिरे, सोने, लोखंड व मँगॅनीज ह्यांचे साठे आहेत.
किनारी प्रदेशातील हवामान विषुववृत्तीय आहे. येथील सरासरी तपमान २५०-२८० से. असून वार्षिक पाऊस १२५ सेंमी. पण काही ठिकाणी ४०० सेंमी. हून अधिक पडतो. मे-जुलै व ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन कालखंडात येथे पाऊस जास्त पडतो. उत्तरेकडील पठारावरील तपमानात उंचीनुसार फरक पडत जातो. या भागात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा कालावधी असून तो बिनपावसाचा असतो. सहारामधून हरमॅटन वारे वाहत येतात. त्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. किनारी प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे दलदलीचे प्रदेश निर्माण होऊन त्यात कच्छवनश्री आढळते. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना प्रथम विषुववृत्तीय घनदाट अरण्ये दिसून येतात. उत्तरेकडील पठारी प्रदेशात पानझडी वृक्षांची अरण्ये आहेत, तर ८ उत्तर अक्षांशाच्या उत्तरेस खुरटी काटेरी वनस्पती व सॅव्हॅनाचा गवताळ प्रदेश दिसून येतो. येथील प्रमुख वृक्ष म्हणजे रोजवुड, मॉहॉगनी, रबर, सागवान, ग्रीनहार्ट, तेल्याताड, बाभूळ, शीनट इ. होत. देशात हत्ती, वाघ, तरस, लांडगे, हरिण, पाणघोडा, सिंह, रानडुक्कर, झेब्रा, जिराफ, विविध प्रकारची माकडे, साप, सुसरी इ. प्राणी विपुल आहेत.
इतिहास
चौदाव्या शतकापर्यंतचा येथील इतिहास फारसा ज्ञात नाही. पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीजांमुळे हा प्रेदश माहीत झाला. हस्तिदंत, गुलाम, रबर इत्यादींच्या व्यापाराच्या निमित्ताने प्रामुख्याने फ्रेंच व्यापारी या प्रदेशात येऊ लागले. १७०० ते १७९४ मध्ये आसीनी या ठिकाणी प्रथम फ्रेंचांनी वसाहत केली. १७०७ मध्ये फ्रेंचानी ग्रँड बासाम येथे एक कारखाना काढला. एकोणिसाव्या शतकात अनेक फ्रेंच व्यापाऱ्यांनी किनारी प्रदेशात वसाहती केल्या. १८०८ ते १८७१ पर्यंत अॅडमिरस ल्वी एद्वार ब्वेव्हीयोमेअझ याने या प्रदेशात प्रवास करून अनेक भाग शोधून काढले व येथील मूळच्या रहिवाशांकडून आसीनी व ग्रँड बासाम हे प्रदेश फ्रान्सला मिळवून दिले; १८४३ मध्ये या दोन्ही ठिकाणी फ्रान्सने ठाणी उभारली. किनारी प्रदेशात हळूहळू फ्रेंचांचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले. १८८७ ते १८८९ मध्ये कॅप्टन ल्वी बँझे याने या संपूर्ण प्रदेशातून प्रवास केला आणि बोंडूकू व काँग हे प्रदेश तेथील राजांशी तह करून मिळविळे. त्याच्याच नावावरून बँझेव्हिल हे नाव आयव्हरी कोस्टच्या त्यावेळच्या राजधानीस देण्यात आले. १८९२ मध्ये त्याने आयव्हरी कोस्टच्या मध्यभागात प्रवास केला व १८९३ मध्ये त्याची या प्रदेशाचा पहिला गव्हर्नर म्हणून फ्रेंच सरकारने नेमणूक केली. यावेळी या प्रदेशाचा दर्जा फ्रान्सच्या संरक्षणाखालील एका वसाहतीचा होता. १८९५ मध्ये फ्रेंच पश्चिम आफ्रिकेत आयव्हरी कोस्टचा समावेश फ्रेंच वसाहत म्हणून करण्यात आला. १८९२ मध्ये आयव्हरी कोस्टची पश्चिम सरहद्द फ्रँको-लायबीरियन कराराने निश्चित केली गेली. १८९८ साली इंग्लंडबरोबरच्या कराराने पूर्व सरहद्द ठरविण्यात आली. परंतु उत्तर सरहद्दीत मात्र अनेक वेळा बदल घडून आले. या ठिकाणच्या मूळच्या लोकांनी एकोणिसाव्या शतकात अनेक वेळा बंडे केली. त्यामुळे १९१० व १९१६ मध्ये अपर व्होल्टा पुन्हा आयव्हरी कोस्टशी जोडण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सला येथून सैनिकांचा पुरवठा करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंचांनी येथे खूप सुधारणा केल्या व त्यामुळे फ्रेंच पश्चिम आफ्रिकेतील हा सर्वात समृद्ध प्रदेश झाला. १९४६ मध्ये आयव्हरी कोस्ट हे फ्रेंच राष्ट्रकुलातील एक स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण करण्यात आले. परंतु येथे राहणाऱ्या लोकांच्या विनंतीमुळे व राज्यकारभारविषयक सोयीसाठी अपर व्होल्टा १९४७ मध्ये आयव्हरी कोस्टपासून विभक्त करण्यात आला. याच वर्षी आयव्हरी कोस्टला विधिमंडळ देण्यात आले. आयव्हरी कोस्ट हे फ्रेंच राष्ट्रकुलातील स्वायत्त राज्य असावे, असा तेथील लोकांनी १९५८ मध्ये कौल दिला. रॅसेंब्लमेंट डेमोक्रॅटिक आफ्रिकन (आर. डी. ए.) या प्रबळ पक्षाच्या हाती देशातील सत्ता होती. ह्या पक्षाचा अध्यक्ष फेलीक्स ऊफ्वा-ब्वान्यी हा १९५६ पासून फ्रेंच मंत्रिमंडळात होता. १९५९ मध्ये तो आयव्हरी कोस्ट, दाहोमी, नायजर व अपर व्होल्टा यांनी राजकीय व आर्थिक सहकार्यासाठी ‘एंटेंटे’ ही संघटना बनविली. एकसारख्याच संविधानपद्धती, शासनपद्धती, निवडणूकपद्धती, संरक्षणपद्धती व करपद्धती असाव्यात; तसेच सर्वांचे एकच राजनैतिक मंडळ असावे व कर्जाच्या देवघेवीसाठी एकच बँक असावी, असे ह्या संघटनेचे उद्दिष्ट आहे. टोगो ह्या संघटनेचा १९६६ मध्ये सभासद झाला. ७ ऑगस्ट १९६० रोजी आयव्हरी कोस्ट स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र बनले व त्याचा पहिला अध्यक्ष फेलीक्स ऊफ्वा-ब्वान्यी हा झाला. १९६५ व १९७० च्या निवडणुकींत पुन्हा हाच अध्यक्ष म्हणून निवडून आला.
राजकीय स्थिती
आयव्हरी कोस्ट हे सार्वभौम लोकसत्ताक राष्ट्र आहे. १९६० साली बनविलेल्या संविधानानुसार गुप्त, सार्वत्रिक व प्रौढ मतदानाने अध्यक्ष व विधिमंडळाचे १०० सदस्य दर पाच वर्षांनी निवडले जातात. अध्यक्ष सर्वाधिकारी असून तोच आपल्या मंत्रिमंडळाची निवड करतो; तोच सेनादलांचा प्रमुख असतो. पश्चिम आफ्रिकेतील सात राष्ट्रांत प्रबळ असलेल्या आर. डी. ए. ह्या पक्षाचीच एक शाखा येथे असून हाच येथील एकमेव व सत्ताधारी पक्ष आहे. आयव्हरी कोस्ट संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे.
शासनाच्या दृष्टीने या देशाचे सहा विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र व लोकांनी निवडलेले कौन्सिल आहे. न्यायदानासाठी आबीजान येथे एक सर्वोच्च न्यायालय व अपील न्यायालय आहे. विधिमंडळाच्या सभासदांनी निवडून दिलेले एक उच्च न्यायालय येथे असून त्याला राष्ट्राध्यक्षावर महाभियोग चालविण्याचा अधिकार आहे. याशिवाय राष्ट्राच्या सुरक्षिततेस बाध आणणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी येथे एक वेगळे न्यायालय आहे. देशात छोटेसे वैमानिक दल असून, सेनादलात चार हजारांवर सशस्त्र सैनिक आहेत. देशाची संरक्षणव्यवस्था एंटेटेद्वारा नियंत्रित आहे. फ्रान्सकडून आवश्यक ती सामग्री व तंत्रज्ञ पुरविले जातात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश