অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपला महाराष्ट्र

भौगोलिक

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले राज्य आहे. हे उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य असून क्षेत्रफळानुसार देशातले तिसरे मोठे राज्य आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा २५ % वाटा आहे तसेच २०१०-११ या वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा २३.२ % वाटा आहे.
308,000 किमी2 (119,000mi2) क्षेत्रावर महाराष्ट्राचा विस्तार असून क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र हे भारतातले तिस-या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगढ, आग्नेय दिशेला आंध्र प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य असून दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश या दोघांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-याला अरबी सुमद्राचे सान्निध्य लाभले आहे.
समुद्रकिना-याला समांतर असणारा पश्चिमी घाट, सह्याद्री म्हणून प्रसिध्द आहे. या सह्यकड्यांमध्ये नाशिक शहराजवळ असणारे कळसुबाई हे 1200 मी. (4000 फूट) उंचीचे महाराष्ट्रातले अत्युच्च शिखर आहे. या सह्यकड्यांच्या पश्चिमेला 50 ते 80 किलोमीटर रूंदीचा कोकण किनारा आहे. या पश्चिम घाटामधून अनेक नद्या उगम पावतात. त्यापैकी गोदावरी आणि कृष्णा या दक्षिण भारतातील प्रमुख नद्या बंगालच्या खाडीपर्यंत प्रवास करतात. या नद्यांनी देशातले एक मोठे खोरे तयार केले आहे.

महाराष्ट्रात 35 जिल्हे असून प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर) आणि आठ शैक्षणिक विभागांत (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आणि लातूर) करण्यात आली आहे. या 35 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. ग्रामीण भागात स्वयं-प्रशासनासाठी 33 जिल्हा परिषदा, 355 पंचायत समित्या आणि 27,993 ग्राम पंचायती कार्यरत आहेत. शहरी भागात 23 महानगर पालिका, 222 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायती कार्यरत आहेत.

भू शास्त्रीय रूपरेखा

हवामान

महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण मान्सूनसह उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू अनुभवता येतात. उन्हाळा - (मार्च ते मे), पावसाळा - (मान्सून), (जून ते सप्टेंबर), मान्सूनोत्तर (ऑक्टोबर ते नोव्हेंबर), हिवाळा (जानेवारी ते मार्च)

नैसर्गिक साधनसंपत्ती

मॅगेनीज, कोळसा, लोह, चुनखडी, तांबे, बॉक्साईट, सिलिका, वाळू आणि मीठ अशी अनेक खनिजे महाराष्ट्रात सापडतात. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे कोळशाच्या खाणींनी समृध्द आहेत. 1970 साली बॉम्बे हाय या तेल क्षेत्राजवळ समुद्राखाली तेलाच्या साठ्याचा शोध लागला.

भौगोलिक वैशिष्टये

दख्खनचे पठार, कोकणचा समुद्रकिनारा आणि घाट अशा विभिन्न भौगोलिक स्थिती महाराष्ट्रात आढळतात. घाट म्हणजे उंचावरील टेकड्यांचा विस्तार असून ते चिंचोळ्या रस्त्यांनी विभागले गेले आहेत. सह्याद्रीच्या रांगा समुद्रसपाटीपासून 1000 मी. उंचीवर असून, तिथल्या पठारांसाठी प्रसिध्द आहे. कोकण हा समुद्रकिनारी भागात वसलेला अरूंद भूभाग आहे. त्याची रूंदी 50 किमी असून, हा भाग समुद्रसपाटीखाली 200 मी वर वसलेला आहे. उत्तरेकडे सीमेवरील सातपुडा पर्वतरांगा हा आणखी एक महत्वाचा भूभाग. या भागात पूर्व सीमेवरील भामरागड-चिरोली-गायखुरी रांगांनी एक अभेद्य तटबंदीच उभी केली आहे. या रांगाही राज्यासाठी नैसर्गिक संरक्षक ठरल्या आहेत.

मुख्य नद्या

गोदावरी, कृष्णा आणि तापी या राज्यातल्या महत्वाच्या अशा तीन नद्या आहेत.

वनस्पती सृष्टी

राज्यातील वने ही प्रामुख्याने सदाहरित, पानझडी प्रकारातील आहेत. यापैकी बहुतेक वने पूर्व आणि सह्याद्रीच्या परिसरात आहेत.

महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्याने, तीन अभयवने आणि वन्यजीव/ पक्ष्यांसाठी 24 अभयारण्ये आहेत. वाघ, चित्ते, गवे, हरीणे, काळवीटे, रानडुक्करे, अस्वले तसेच नीलगायी आढळून येतात..

स्रोत – भारत सरकार, महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण 2010-11

देशातील रस्त्यांचे सर्वात विस्तृत जाळे महाराष्ट्रात (एकूण भारतीय रस्ते जाळ्यापैकी 7%) असून या भागातील 97.5% गावे परस्परांशी चांगल्या रस्त्यांनी तर 2% उत्तम रस्त्यांनी जोडली गेली आहेत. राज्यात मध्य आणि देशातील रेल्वे विभागाची 2 मुख्यालये आहेत. देशातील एकूण रेल्वे जाळ्यापैकी महाराष्ट्रात 9.2% रेल्वे जाळे पसरलेले आहे. अमेरीका, युरोप, आशिया तसेच भारतातील प्रमुख शहरांशी, राज्य हवाई मार्गानेही जोडलेले आहे. देशात सर्वाधिक विमानतळांची संख्याही (6%) महाराष्ट्रात आहे.

लोकसंख्या

देशात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेश खालोखाल दुस-या क्रमांकावर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.2 कोटी आहे, हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या 9.4% इतके आहे. राज्यात अनुसूचित जातीचे 10.2% तर अनुसूचित जमातीचे 8.8% लोक राहतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शहरी भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील इतर महत्वाच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे येथील लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण प्रति चौ.किमी 365 इतके जास्त आहे. 1961 ते 2001 या कालावधीत महाराष्ट्रात शहरीकरणाच्या स्तरात जलदगत्या वाढ झाली आणि 1961 नंतरची स्थिती लक्षात घेता, भविष्यात हा कल असाच राहील, अशी अपेक्षा आहे.
राज्याने प्राथमिक शिक्षणाला महत्व दिल्यामुळे साक्षरतेच्या प्रमाणात सातत्याने सुधारणा होत आहे. 2001 सालच्या जनगणनेनुसार देशातील साक्षरतेच्या 64.8% या प्रमाणाच्या तुलनेत राज्यातील साक्षरतेचे प्रमाण 76.9% इतके जास्त आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षण देणा-या उत्तमोत्तम संस्थाही राज्यात आहेत.

लोकसंख्या

11.2 Cr (भारत: 121.2 Cr)

क्षेत्रफळ (लोक/प्रति कि.मी.)

308,000 (भारत: 3,287,240)

लोकसंख्येची घनता (लोक/प्रति कि.मी.)

315 (भारत: 325)

मुख्य भाषा

मराठी, हिंदी, इंग्रजी

शहरीकरण

42% (भारत: 27.8%)

साक्षरतचे प्रमाण

76.9% (भारत: 64.8%, केरळ नंतर दुसरे)

लिंग अनुपात (स्त्री/ प्रती 1000 पुरूष - 922 स्त्रिया (भारत 933)

922 (भारत: 933)

वयोगट रचना

लोकसंख्येचे वयोगटनिहाय वितरण लक्षात घेता राज्यातील 63% लोकसंख्या ही 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहे, जो सक्षम कार्यस्त्रोत म्हणता येईल. 32% लोकसंख्या 0 ते 15 वर्षे वयोगटातील असून तो भविष्यातील कार्यस्त्रोत म्हणता येईल.


स्त्रोत : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभाग

माहिती संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate