सातव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या सु. तेराशे वर्षांच्या दीर्घ कालावधीत इंग्रजी साहित्याने खूपच मजल मारली आहे. मुळात जर्मानिक स्फूर्तिस्रोत घेऊन आलेल्या ह्या साहित्यात कालांतराने लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, इटालियन इ. यूरोपीय भाषांतील साहित्यांचाही प्रभाव पडला. काहींपासून त्याने स्फूर्ती घेतली, काहींपासून वाङ्मयप्रकार घेतले, काहींपासून विचारधन घेतले व ते यूरोपीय साहित्याचा एक महत्त्वाचा भाग झाले. जसजसा इंग्रज समाज राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक घडामोडींना, क्रांत्यांना तोंड देत बळकट होत गेला, समृद्ध होत गेला, त्याच्या व्यापाराचा, उद्योगधंद्यांचा, राजकीय सत्तेचा विस्तार होत गेला; तसतसा इंग्रजी साहित्याचा जोम आणि भरदारपणाही वाढत गेला. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्य ह्यांचा जगाच्या मोठ्या भागावर प्रभाव पडला. अनेक राष्ट्रांतील भाषांच्या आणि साहित्याच्या अभिवृद्धीला, त्यांच्यातील नवीन प्रवृत्तींना ते प्रेरक आणि सहायक झाले.
इंग्रजी साहित्याच्या काही साहित्यप्रकारांना कधी अधिक अनुकूल दिवस आले, तर कधी थोडे प्रतिकूल; पण त्यांचा प्रवाह पुढे जात राहिला आणि सर्वच स्थित्यंतरांतून त्यांची काही वैशिष्ट्ये कायम राहिली. त्यांपैकी चिंतनशीलता, निसर्गाविषयी तसेच घर आणि देश ह्यांविषयी प्रेम, रचनेच्या बाह्यरूपाविषयी काहीशी बेफिकिरी अशा काहीचा उल्लेख करता येईल.
लेखक : रा. भि. जोशी
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 9/2/2019
इंग्रजी वाङ्मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असू...
शेक्सपिअर काळातून मिल्टनच्या काळाकडे येताना इंग्ल...
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटा...
ह्या शतकातील इंग्रजी वाङ्मयेतिहासाचे स्थूलमानाने...