इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे. अँम्लो-सॅक्सन किंवा ‘ओल्ड इंग्लिश’ ह्या नावाने ते ओळखले जाते. पैकी ओल्ड इंग्लिश हे नाव अधिक मान्य आणि रूढ आहे. त्याचा कालखंड सातव्या शतकापासून ११०० पर्यंतचा आहे. व्याकरण आणि शब्दसंपत्ती ह्या दोन्ही दृष्टींनी ह्या ओल्ड इंग्लिश साहित्याची भाषा, नंतरच्या इंग्रजी भाषेपेक्षा इतकी वेगळी आहे, की ती भाषा प्रयत्नपूर्वक शिकल्याखेरीज तिच्यातील साहित्य आजच्या वाचकाला कळत नाही.
१०६६च्या नॉर्मन विजयानंतर इंग्लंडमध्ये राज्यकारभारात, न्यायसंस्थांत, शिक्षणसंस्थांत फ्रेंच भाषाच सर्रास वापरली जाऊ लागली. ती प्रतिष्ठितांची भाषा झाली व ओल्ड इंग्लिश भाषा मागे पडली. त्या भाषेत साहित्यनिर्मिती जवळजवळ होईनाशी झाली. ती फ्रेंच आणि लॅटिन भाषांत होऊ लागली. इंग्रजी भाषेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होण्याला जवळजवळ तीनशे वर्षे जावी लागली. १३६२ मध्ये ती न्यायालयाची भाषा झाली. १३९९ मध्ये चौथ्या हेन्रीने पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा इंग्रजीत भाषण केले. नॉर्मन विजयानंतर इंग्रजी मातृभाषा असणारा तोच इंग्लंडचा पहिला राजा.
अकराव्या शतकाच्या मध्यापासून चौदाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ओल्ड इंग्लिशमध्ये पुष्कळच फरक पडला. जेते फ्रेंच असल्यामुळे तिचा राजाश्रय नाहीसा झाला होता; पण खेड्यापाड्यातील आणि खालच्या थरांतील लोक इंग्रजीच बोलत. हळूहळू शब्दांच्या रूपांत व वाक्यरचनेत बदल झाला. बरेच जुने शब्द वापरातून गेले आणि काहींच्या जोडीला फ्रेंच भाषेतील आणि फ्रेंचमार्फत लॅटिन आणि ग्रीक भाषांतील शब्द आले. इंग्लंडच्या वेगवेगळ्या भागांतल्या भाषांत साहित्य निर्माण होतच होते. ह्या कालखंडातले साहित्य मध्यकालीन इंग्लिश साहित्य (मिड्ल इंग्लिश) म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांपैकी ईस्ट मिडलँडमध्ये म्हणजे लंडनच्या आसपासच्या भागांत बोलल्या जाणाऱ्या भाषेत निर्माण झालेल्या साहित्याला अधिक प्रतिष्ठा लाभली. आपण ज्याला इंग्रजी साहित्य म्हणून ओळखतो, ते ह्या कालखंडातील साहित्याचा पुढला विकास आहे.
इंग्रजी साहित्याचे मूळ क्षेत्र म्हणजे ब्रिटिश बेटांतील इंग्लंडचा प्रदेश. पण वेल्श, आयरिश आणि स्कॉटिश लेखकांनीही इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण केले आहे. ब्रिटिशांच्या व्यापाराचा व्याप जसजसा वाढत चालला, तसतसे त्यांच्या राजकीय सत्तेचे क्षेत्र विस्तृत होत गेले. ब्रिटिशांनी पृथ्वीवरच्या इतर खंडांत वसाहती केल्या आणि साम्राज्य स्थापन केले. त्या त्या वसाहतीत स्थायिक झालेल्या ब्रिटिशांनी आणि त्यांच्या वंशजांनी, त्याचप्रमाणे तेथील स्थानिक लोकांपैकी ज्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली, त्यांनीही इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण केले. ह्याची उदाहरणे म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतले काही देश. परंतु ह्या लेखात ह्या इतर देशांत निर्माण झालेल्या इंग्रजी साहित्याचा अंतर्भाव केलेला नाही. ह्या लेखातील साहित्यविचाराचा काळ ओल्ड इंग्लिश साहित्याच्या काळापासून (सु. सातवे शतक) साधारणपणे १९५० पर्यंतचा आहे.
(आरंभापासून १०६६ पर्यंत)इंग्लंडचे पहिले रहिवासी आयबेरियन व केल्टिक. त्यांचा रोमन लोकांनी पाडाव केला. ४१० मध्ये ब्रिटनमधील रोमन साम्राज्य संपुष्टात आले व मध्य यूरोपातील जर्मेनीयामधील अँगल, ज्यूट व सॅक्सन जमातींच्या टोळ्या इंग्लंडमध्ये येण्यास सुरुवात झाली. त्यांनी ब्रिटनमधील मूळ रहिवाशांना मागे रेटून आपले वर्चस्व प्रस्थापित केले व इंग्रजी संस्कृतीचा पाया घातला. ह्या लोकांचे वाङ्मय अँग्लो-सॅक्सन वाङ्मय म्हणून ओळखले जाई. त्यांच्या भाषेला ओल्ड इंग्लिश असे संबोधिले जाते. अर्थात ओल्ड इंग्लिश हे इंग्रजी भाषेचेच आद्यरूप होय. आजच्या इंग्रजी वाङ्मयाच्या अनेक प्रवृत्ती बीजरूपाने ह्या काळातील वाङ्मयात दिसतात.
पाचव्या शतकापासून राजदरबारातील भाटांनी रचलेली काव्ये अलिखित असल्याने आज उपलब्ध नाहीत. ओल्ड इंग्लिश साहित्याच्या सु. तीस हजार ओळी उपलब्ध आहेत. पेगन महाकाव्यसदृश रचना, शोकरसात्मक भावकाव्याच्या जवळपास येणारे काव्य व ख्रिस्ती धर्मप्रेरित काव्य असे त्याचे तीन भाग आहेत. पेगन वाङ्मय ख्रिस्ती धर्मप्रभावापासून अलिप्त असून वीरवृत्तीची जोपासना करणारे आहे [पेगन]. ते भटक्या शाहिरांनी रचलेले असून कधी श्रीमंतांच्या पुढे, तर कधी बाजारात जनसामान्यांसाठी गाइलेले आहे. त्या वाङ्मयातून यूरोपातील जर्मन, नॉर्वेजियन इ. जर्मानिक गटातील भाषा बोलणाऱ्या लोकांची संस्कृती कशी होती, ह्याची अल्पशी कल्पना येते. विडसिथ ह्या अशा प्रकारच्या एका काव्यात राजदरबारातील एका भाटाचे आत्मवृत्त आढळते. ह्या काळातील सर्वोत्कृष्ट काव्य वेवूल्फ (सु. ३,२०० ओळी) हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य. दक्षिण स्वीडनमधील गीट जमातीच्या हायगेलॅक राजाचा पुतण्या बेवूल्फ याने ग्रेंडेल हा राक्षस व त्याची आई यांचा वध कसा केला, याची हकीकत याच्या पहिल्या भागात आहे. दुसऱ्या भागात ५० वर्षांनंतर एका पंखधारी नरभक्षक सर्पाला मारताना बेवूल्फ स्वतः मरतो, असे दाखविले आहे. हा कथाभाग पेगन लोकगीतांतून आला असला, तरी त्यात ख्रिस्ती धर्मकल्पनांचे मिश्रण झालेले दिसते. या महाकाव्यातील आवेश, पराक्रम, स्वाभिमान, सौजन्य, शिष्टाचार ह्या गोष्टी पेगन वाङ्मयातील व लोककथांतील आहेत; तर सृष्टीची उत्पत्ती व पापपुण्य ह्यांसंबंधीच्या कल्पना ख्रिस्ती दिसतात.द बॅटल ऑफ फिन्सबर्ग व वाल्डेर ही अपुरी महाकाव्ये बेवूल्फच्या परंपरेतीलच आहेत. द बॅटल ऑफ ब्रनॅनबर्ग व द बॅटल ऑफ माल्डन या काव्यांत वीर व करुण या रसांचा आविष्कार दिसतो. द वाँडरर या काव्यात राजाश्रय सुटल्यावर रानोमाळ भटकणाऱ्या एका चाकराचा विलाप दिसतो; तर द सीफेअरर मध्ये एका वृद्ध खलाशाची कहाणी सांगितलेली आहे. डिओर ह्या काव्यात एका भटक्या कवीचे आत्मकथन आढळते व ह्या दृष्टीने ते काव्य महत्त्वाचे ठरते.
सातव्या शतकात अँग्लो-सॅक्सनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्यांच्या काव्यात धार्मिक विषय येऊ लागले. जुन्या वीर व करुण रसांतील काव्यांना आता धार्मिक डूब मिळाली. शिवाय ख्रिस्तपुराणातील कथा जुन्या वीरकाव्यशैलीत सांगितल्या गेल्या. कॅडमन (सु. ६७०) हा इंग्रजीचा आद्य कवी. निश्चितपणे कॅडमनचे म्हणता येईल असे नऊ ओळींचे एक ईशस्तोत्रच आज उपलब्ध आहे. त्याच्या नावावर मोडणारी जेनेसिस, एक्झोडस, डॅन्यल, ख्राइस्ट व सेटन ही दीर्घकाव्ये त्याची नसून त्याच्या परंपरेतील असावीत, असा तर्क आहे. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात किनेवुल्फ हा कवी होऊन गेला. आपल्या काव्यावर आपली सही अँग्लो-सॅक्सन रूनिक लिपीत करणारा हा पहिला इंग्रजी कवी. ख्राइस्ट, जूलिआना, एलेन व द फेट्स ऑफ अॅपॉसल्स ही त्याची काव्ये. उत्कट भक्ती व रचनासौष्ठव हे त्याच्या काव्याचे मुख्य विशेष. अँड्रिअस, द फीनिक्स वगैरे काव्ये त्याच्याच संप्रदायातील. नवी धार्मिक भावना व जुनी वीरकाव्यशैली यांचा सुंदर मेळ जूडिथमध्ये दिसतो. द ड्रीम ऑफ द रूडमध्ये उत्कट भक्तिभावना आहे. कल्पनाशक्तीचा फुलोरा द रिडल्स या काव्यात सापडतो. अनुप्रासयुक्त छंदोरचना व रूपकात्मक भाषा हे प्राचीन इंग्रजी काव्यशैलीचे विशेष.
प्राचीन इंग्रजी गद्याचा उदय अॅल्फ्रेड (८४९–९०१) राजाच्या काळात झाला. हा स्वतः उत्कृष्ट लेखक होता. त्याने विद्वानांच्या मदतीने लॅटीन ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे केली व यूरोपीय संस्कृतीचे लोण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविले. उदा., पोप ग्रेगरीचा क्यूरा पास्तोरालिस हा धार्मिक ग्रंथ, पॉलस ओरोझिअसचा हिस्टोरिया अॅडव्हरसुम पागोनास हा इतिहास व बोईथिअसचा दे कॉन्सोलासिओने फिलॉसफी हा तात्त्विक ग्रंथ. बीड (६७३-७३५) ह्या इतिहासकाराच्या हिस्टोरिया इक्लिझिअॅस्तिकाचे भाषांतर अॅल्फ्रेडच्या प्रेरणेनेच झाले. त्याची सर्वांत महत्त्वाची वाङ्मयीन कामगिरी म्हणजे द अँग्लो-सॅक्सन क्रॉनिकल हा इतिहास. सीझरच्या इंग्लड विजयापासूनचा इंग्लंडचा इतिहास सांगणारे हे इतिवृत्तलेखन पुढे ११५४ पर्यंत चालू राहिले. इतिहास व साहित्य या दोन्ही दृष्टींनी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. अॅल्फ्रेडची मातृभाषा वेसेक्स असल्यामुळे तिला साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली. अॅल्फ्रिक (मृ. सु. १०२०) या धर्मोपदेशकाने अॅल्फ्रेडचेच कार्य पुढे चालू ठेवले. सु. ऐंशी नीतिबोध, एक संतचरित्रमाला, कॉलक्वी हा लॅटिन शिकविण्याच्या हेतूने लिहिलेला संभाषणग्रंथ व बायबलच्या जुन्या कराराचे भाषांतर (पहिले ७ भाग) हे त्याचे मुख्य ग्रंथ. अॅल्फ्रिकची वक्तृत्वपूर्ण व नागर भाषाशैली अॅल्फ्रेडच्या खडबडीत शैलीच्या तुलनेने उठून दिसते. त्याचा समकालीन वुल्फ्स्टन (मृ. १०२३) या धर्मगुरूच्या प्रवचनांपैकी सर्मन टू द इंग्लिश हे डॅनिश आक्रमणाने हतबल झालेल्या इंग्रजांना केलेले आवाहन बरेच गाजले. तीव्र भावना, ओज व आलंकारिक भाषा ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये. गद्यापेक्षा पद्यातच ओल्ड इंग्लिश साहित्याची वैशिष्ट्ये अधिक ठसठशीतपणे दिसून येतात.
फ्रान्समधील नॉर्मंडीचा ड्यूक विल्यम ह्याने १०६६ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा हॅरल्ड ह्याच्यावर हेस्टिंग्जच्या लढाईत विजय मिळविला आणि तो इंग्लंडचा राजा झाला. हा नॉर्मन विजय ही इंग्लंडच्या आणि इंग्रजी साहित्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. हॅरल्ड हा इंग्लंडचा शेवटचा सॅक्सन राजा. तोपर्यंत इंग्लंड हे यूरोपच्या उत्तर भागातल्या स्कँडिनेव्हियन देशांशी निगडित होते. तो संबंध ह्या विजयानंतर तुटला आणि ते दक्षिणेकडील फ्रान्सशी जखडले गेले. ह्या घटनेमुळे इंग्लंडच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात फार मोठा फरक पडला.
नॉर्मन लोकांच्या विजयानंतर लॅटिन व फ्रेंच भाषांचा पगडा वरिष्ठ वर्गावर व दरबारी लोकांवर पडला; परंतु कथाकथन व काव्य इंग्रजीतील निरनिराळ्या बोलीभाषांतून होत होते. ह्या वेगवेगळ्या बोलीभाषांपैकी तेराव्या शतकाच्या अखेरीस ईस्ट मिडलँड परगण्यातील बोलीभाषा प्रमाण ठरली आणि तिची प्रतिष्ठा पुढे चौदाव्या शतकात चॉसरने कायम राखली. या बोलीभाषेला ‘किंग्ज इंग्लिश’ (प्रमाणभूत इंग्रजी भाषा) हे नाव मिळाले.
(१०६६–१४८५)१०६६च्या नॉर्मन विजयामुळे विजेत्यांची फ्रेंच भाषा राजदरबारी आली व अँग्लो-सॅक्सन भाषा बहुतांशी समाजातील खालच्या वर्गांपुरती मर्यादित राहिली. तिच्यातील ग्रंथरचना थांबली व शंभराहून अधिक वर्षे ती केवळ बोलभाषा होऊन बसली. कालांतराने नॉर्मन व सॅक्सन ह्यांच्यातील अंतर कमी होऊन प्राचीन इंग्रजी भाषेचे पुनरुज्जीवन होत गेले. तेराव्या शतकात तिला पुन्हा ग्रांथिक भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळाली; मात्र दरम्यानच्या काळात तिचा कायाकल्प झाला. तिचे व्याकरण अधिक सोपे झाले व फ्रेंच भाषेतील हजारो शब्द तिने स्वीकारले. फ्रान्सकडून तिने नव्या वाङ्मयीन प्रेरणा घेतल्या. उदा., ⇨रोमान्स. अनुप्रासयुक्त छंदोरचनेऐवजी नवा यमकबद्ध छंद तिने स्वीकारला. नव्या राजवटीत प्राचीन इंग्रजी बोलीभाषांतून आलेल्या उत्तर, दक्षिण, केंटिश व मिडलँड इंग्रजी या साऱ्याच ‘मिड्ल इंग्लिश’ बोलभाषांतून साहित्य निर्माण होऊ लागले.
मिड्ल इंग्लिश साहित्यात धार्मिक व उपदेशपर पद्य विपुल आहे. उदा., ऑरम्युलम, करसोर मुंडी आणि हॅडलिंग स्युन. मध्ययुगातील आणखी एक लोकप्रिय पद्यप्रकार म्हणजे रूपककाव्य. द औल अँड द नाइटिंगेल (सु. १२००) हे त्याचे उत्तम उदाहरण. हे काव्य तत्कालीन लॅटिन व फ्रेंच साहित्यात लोकप्रिय झालेल्या वादकाव्याचेही (डिबेट व्हर्स) प्रतिनिधी ठरते. फ्रेंच वीरकाव्यावर आधारलेल्या रोमान्सचाही बराच प्रसार झाला. शूर, दिलदार नायक आणि सद्गुणी, सौंदर्यसंपन्न नायिका त्यांत रंगविलेल्या असत. जादू व चमत्कार यांनी भरलेल्या या काव्यांची कथानके ग्रीक, रोमन, फ्रेंच व पौर्वात्य कथा, तसेच वेल्समधील आर्थर राजाच्या आख्यायिका यांतून घेतलेली दिसतात. रोलँड अँड व्हर्नग्यु, सर ऑर्फिओ, मॉर्ट आर्थर व बारलाम अँड जोसाफट (बुद्धकथेचे ख्रिस्ती रूपांतर) ही यांची उदाहरणे. तत्कालीन इतिहासलेखनही पद्यातच असून इतिहासलेखन व रोमान्स यांतील सीमारेषा धूसर असल्याचे जाणवते. उदा., लायामन या इंग्रज कवीने फ्रेंचमधून अनुवादिलेला ब्रूट हा इंग्लंडचा इतिहास. इंग्रजी काव्याने फ्रेंच काव्याकडून नवा यमकबद्ध छंद स्वीकारल्यानंतर सु. सव्वाशे वर्षांनी चौदाव्या शतकाच्या मध्यास ओल्ड इंग्लिशमधील अनुप्रासयुक्त छंदोरचनेचे पुनरुज्जीवन झाले. उदा., सर गावेन अँड द ग्रीन नाइट हे वीरकाव्य, पर्ल हे रूपकात्मक शोककाव्य आणि पेशन्स व प्युरिटी ही भक्तिपर काव्ये.
ह्या युगात निर्माण झालेल्या बॅलड ह्या दुसऱ्या नव्या काव्यप्रकारात शौर्यापासून शोकापर्यंत व भुतांपासून भक्तीपर्यंत अनेक विषय हाताळलेले दिसतात. काव्य, कथा व नाट्य यांचा मिलाफ बॅलडमध्ये दिसतो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात विल्यम लँग्लंड (१३३० ?–१४०० ?), जॉन गॉवर (१३३० ?–१४०८) आणि जेफ्री चॉसर (१३४०?–१४००) हे महत्त्वाचे कवी होऊन गेले. धार्मिक सत्ताधाऱ्यांविरुद्ध असलेल्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया लँग्लंडने पद्यामध्ये व जॉन विक्लिफने (सु. १३२०–१३८४) गद्यामध्ये अत्यंत परखडपणे व्यक्त केल्या. ज्या ख्रिस्ती संन्याशांनी (फ्रायर) यूरोपियन संस्कृतीशी इंग्लंडची ओळख करून दिली होती, ते आता कर्तव्यच्युत झाले होते. त्यांच्यावर सडेतोड टीका लँग्लंडने पिअर्स प्लाउमन ह्या काव्यात केली. विक्लिफने सामान्य लोकांना समजेल, असे बायबलचे भाषांतर करण्यास सुरुवात केली. चर्चमधील अधिकाऱ्यांच्या सर्व पापांचा पाढा विक्लिफने मोठ्या आवेशयुक्त, वक्रोक्तिपूर्ण व विनोदी शैलीत वाचला.
चॉसर हा मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी. त्याच्या कँटरबरी टेल्समधील कथांनी इंग्रजी वाङ्मयाला नवे वळण दिले. नर्मविनोद, सूक्ष्म, मार्मिक, मिस्कील निरीक्षण आणि शालीन, संयमित कलादृष्टी हे त्याचे प्रधान गुण. चॉसरने काव्यशैलीला सफाई आणली, शब्दसंगीताचे नवे सामर्थ्य दाखविले आणि ह्या सर्वांतून मानवी स्वभावाचे सखोल, मार्मिक दर्शन घडविले. चॉसरचे अनुकरण करणाऱ्यांत जॉन लिडगेट (१३७० ?–१४५१ ?) व टॉमस हॉक्लीव्ह (१३७० ?–१४५०?) हे इंग्रज कवी आणि स्कॉटलंडचा राजा पहिला जेम्स (१३९४–१४३७) व रॉबर्ट हेन्रिसन (१४३० ?–१५०६) हे स्कॉटिश कवी यांचा समावेश होतो. लिडगेटचे द फॉल ऑफ प्रिन्सेस व हॉक्लीव्हचे द रेजिमेंट ऑफ प्रिन्सेस ही उपदेशपर काव्ये आहेत. पहिल्या जेम्सने द किंगिज क्वेअर हे उपदेशपर काव्य लिहिले. हेन्रिसन हा चॉसरमुळे प्रभावित झालेला सर्वांत कर्तबगार कवी. त्याचे टेस्टमेंट ऑफ क्रिसेड हे काव्य विशेष उल्लेखनीय आहे.
इतर यूरोपीय भाषांतील गद्यापेक्षा प्राचीन इंग्रजी गद्याचा अधिक विकास झाला होता. नॉर्मन विजयानंतरचे इंग्रजी गद्य मात्र सुरुवातीस खुरटले; त्यामुळे मध्यकालीन इंग्रजीत नवी गद्यपरंपरा उभी होण्यास उशीर लागला. काव्याप्रमाणे या गद्याचाही भक्तिबोध हाच स्थायीभाव दिसतो. या प्रकारच्या गद्यलेखनात अँक्रेने रिव्ले (लेखक अज्ञात) हा तीन जोगिणींना केलेला उपदेश अग्रेसर ठरतो. बाह्य यमनियमांपेक्षा आंतरिक संयम श्रेष्ठ आहे, असे उपदेशक सांगतो. त्याची शैली म्हणी व घरगुती दृष्टांत यांनी युक्त आहे. उत्तम गद्याचे हे लक्षणीय उदाहरण. चौदाव्या शतकातील इंग्रजी संतांच्या ईशप्रेमाचा साक्षात्कार त्यांच्या गद्यलेखनात आढळतो. उदा., रिचर्ड रोल (सु. १३००–१३४९) याचाफॉर्म ऑफ लिव्हिंग, वॉल्टर हिल्टनचा (मृ. १३९६) द स्केल ऑफ पर्फेक्शन, मार्जरी केंपचा (सु. १३७३—?) द बुक ऑफ मार्जरी केंप हे ग्रंथ. द ट्रॅव्हल्स ऑफ सर जॉन मँडेव्हिल हे फ्रेंचवरून अनुवादिलेले लोकप्रिय प्रवासवर्णन याच काळातले. जॉन ट्रेव्हीसाने (१३२६–१४१२) पॉलिक्रॉनिकॉनसारखे लॅटिन ग्रंथ अनुवादिले (पॉलिक्रॉनिकॉनचा अनुवाद १३८७). तत्कालीन भाषेचा जिवंत परिचय पॅस्टन लेटर्स (१४२२–१५०९) या नॉर्फकमधील एक सुखवस्तू कुटुंबातील मंडळींनी परस्परांना लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहात दिसतो. पंधराव्या शतकातील सर्वांत बहुप्रसू गद्यकार रेजिनल्ड पीकॉक (१३९५ ?–१४६० ?) याने आपल्या रिप्रेसर ऑफ ओव्हरमच ब्लेंमिंग ऑफ द क्लर्जी (१४५५) यासारख्या ग्रंथांत विक्लिफचे विचार खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मॉर्ट द आर्थर (१४८५) या सुप्रसिद्ध ग्रंथाचा लेखक टॉमस मॅलरी (मृ. १४७१) हा या शतकातील गाजलेला गद्यलेखक. या ग्रंथाचा मुद्रक व प्रकाशक विल्यम कॅक्स्टन (१४२२ ?–१४९१) हा इंग्लंडमधील पहिला मुद्रक असून तो भाषांतरकारही होता.
इंग्लंडमध्ये नाटक हा साहित्यप्रकार प्रथम मध्यकालीन इंग्रजीत हाताळला गेला. चर्चमधील प्रार्थनांनी संभाषणरूप घेतल्यावर त्यांतून ख्रिस्तचरित्रावर व संतचरित्रांवर आधारित नाट्य निर्माण झाले. शिवाय प्राचीन इंग्रजीत नाटक नसले, तरी भाटांचे नाट्यमय वीरकाव्य व नाट्याची बीजे असलेले खड्गनृत्य, सोंगाड्यांचे खेळ, वसंतोत्सवातील खेळ इ. अनेक खेळ प्रचलित होते. नाट्यविकासाला त्यांचाही हातभार लागला. अद्भुत नाटकांची (मिरॅकल प्ले) सुरुवात तेराव्या शतकाच्या अखेरीस झाली. मे महिन्याच्या शेवटी येणारा ‘कॉर्पस क्रिस्टी’ हा सण साजरा होऊ लागल्यावर त्यात अनेक व्यवसायांचे लोक ख्रिस्तचरित्र व संतचरित्रे यांवर आधारलेले छोटे छोटे नाट्यप्रयोग करू लागले. हीच अद्भुत नाटके. ह्या नाटकांतील नाट्यविषय त्या त्या व्यवसायाशी निगडित असे. उदा., नोआ व त्याची नाव हा सुतारांच्या नाटकाचा विषय. शहरांतील चौकांत फिरत्या गाड्यांवर हे नाट्यप्रयोग केले जात. कालांतराने या नाटकांच्या माला गुंफिल्या गेल्या. त्यांत यॉर्क (४८ उपलब्ध नाटके), वेकफील्ड किंवा टौनली (३२ नाटके), चेस्टर (२५ नाटके) व ‘लुड्झ कॉव्हेंट्री’ म्हणून प्रसिद्ध असलेली ईस्ट अँग्लियात रचिली गेलेली नाट्यमाला (४२ नाटके) या प्रमुख होत. साहित्यगुणांच्या दृष्टीने वेकफील्डची नाट्यमाला सर्वश्रेष्ठ गणली जाते. या मालेत ग्रामीण जीवनाचे सार्थ चित्रण, उपरोध व विनोद, नाट्यमूल्यांची समज व काव्यमय शैली हे गुण दिसतात. उदा., सेकंड शेपर्ड्स प्ले या नाटकात ख्रिस्तजन्माच्या वेळी मॅक नावाचा गुराखी चोरलेली शेळी पाळण्यात घालून ती नवजात अर्भक आहे, हे दाखविण्याची युक्ती करतो. ह्या प्रसंगात इंग्रजीतील वास्तववादी सुखात्मिकेचे आद्यरूप जाणवते. पंधराव्या शतकाच्या मध्यावर सदाचार नाटकांचा (मोरॅलिटी प्ले) उदय झाला. यात मानवी स्वभावातील सुष्टदुष्ट प्रवृत्ती मनुष्यरूप घेऊन रंगमंचावर अवतरतात. सदाचार नाटकांचा उगम अद्भुत नाटकांतील बोधवादात असावा. मध्ययुगात विषय, वाङ्मयप्रकार व तंत्र या सर्व दृष्टींनी इंग्रजी साहित्य समृद्ध झाले. परंतु त्या मानाने चॉसर, लँग्लंड इत्यादींसारखे पहिल्या दर्जाचे साहित्यिक त्यांत थोडेच आढळतात.
(१४८५–१५५७)‘वॉर्स ऑफ द रोझेस’ (१४५५–१४८५) ह्या नावाने संबोधिलेल्या, यॉर्क व लँकेस्टर या दोन घराण्यांमध्ये झालेल्या यादवी युद्धानंतर ट्यूडर घराणे गादीवर आले. थोड्याच काळात यूरोपीय प्रबोधनाचे वारे वाहू लागले व त्यांनी अनेक नव्या प्रेरणा आणल्या. सातव्या हेन्रीच्या (१४५७–१५०९) दरबारात व इंग्रजी विद्यापीठांत ग्रोसिन, लिनाकर, कॉलिट, मोर, इरॅस्मस इ. मानवतावादी विद्वानांचे स्वागत झाले. मध्ययुगीन निवृत्तिवादी तत्त्वज्ञानाऐवजी नवे प्रवृत्तिवादी तत्त्वज्ञान प्रसृत होऊ लागले. १४५३ मध्ये तुर्कांनी कान्स्टँटिनोपल जिंकल्यावर तेथील विद्वान यूरोपात पांगले. त्यामुळे जुन्या ग्रीक व रोमन वाङ्मयाचा पुन्हा परिचय झाला. कोलंबसादी दर्यावर्दी वीरांनी लावलेले नव्या देशांचे शोध, पोपप्रणीत धर्मव्यवस्थेविरुद्ध ल्यूथर, कॅल्व्हिन इत्यादींनी उभारलेले बंड, कोपर्निकसचे नवे खगोलविषयक सिद्धांत, यूरोपीय देशांत राष्ट्रभावनेची झालेली वाढ, व्यक्तिवादाचा उदय अशा अनेक घटनांमुळे मध्ययुगीन यूरोपीय जीवनाची बैठक विस्कटली आणि नव्या मनूचा पाया घातला गेला.
नव्या व्यापारी व उदीमी लोकांचा शहरांतून होत असलेला उदय व त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्रणकलेचा शोध, या दोन्ही गोष्टी गद्याला पोषक ठरल्या. इंग्लंडमध्ये पहिले मुद्रणयंत्र विल्यम कॅक्स्टनने १४७६ मध्ये आणले व त्यावर आर्थर राजासंबंधीच्या गद्यकथा छापल्या. टॉमस मॅलरीचे मॉर्ट द आर्थर, स्वत कॅक्स्टनने केलेली भाषांतरे, रेजिनल्ड पीकॉक याने केलेली लॅटिन ग्रंथांची भाषांतरे यांनी इंग्रजी गद्याचा पाया घातला व लोकांत वाचनाची आवड उत्पन्न केली.
सोळाव्या शतकाच्या प्रथमार्धातील इंग्रजी काव्यात मात्र जुन्या परंपराच चालू होत्या. स्कॉच कवी विल्यम डनबारच्या (१४६५ ?–१५३० ?) द गोल्डन टार्ज (सु. १५०८) व गॅव्हिन डग्लसच्या (१४७४ ?–१५२२) द पॅलेस ऑफ ऑनर (१५५३ ?) या काव्यांत व इंग्रज कवी स्टीव्हेन हॉझच्या (मृ. १५२३ ?) द पास्टाइम ऑफ प्लेझर (१५०९) यांत चॉसरादी कवींचेच वळण गिरविलेले दिसते. फक्त डेव्हिड लिंझीच्या (१४९०–१५५५) काही उपहासात्मक काव्यांवर जॉन नॉक्स ह्या स्कॉटिश धर्मसुधारकाच्या नव्या बंडखोर विचारांची छाप दिसते.जॉन स्केल्टन (१४६० ?–१५२९) हा या काळातील सर्वांत प्रभावी उपरोधकार. अलेक्झांडर बार्क्लीचे (१४७५ ?–१५५२) द शिप ऑफ फूल्स (१५०९) हे भाषांतरित उपरोधकाव्य पारंपरिक थाटाचे आहे; पण आपल्या द एक्लॉग्ज(१५१५–१५२१) या ग्रामीण काव्यात त्याने पुढे स्पेन्सरादींनी विकसित केलेला जानपद गीताचा एक्लॉग हा प्रकार प्रथम हाताळला. जॉन हेवुडची (१४९७ ?–१५८० ?) उपरोधकाव्ये व गीते लक्षणीय आहेत. या युगात नवे विषय व छंद आणले ते टॉमस वायट (१५०३ ?–१५४२) व ⇨ हेन्री हॉवर्ड सरी (१५१७ ?–१५४७) यांनीच. १५५७ मध्ये टॉटल (मृ. १५९४) या प्रकाशकाने टॉटल्स मिसेलनी हा गीतसंग्रह प्रसिद्ध केल्यावर इंग्लंडमध्ये गीतरचनेती लाट उसळली. ती पुढील पन्नास वर्षे टिकली. या युगातील मुख्य गीतकार म्हणजे बार्नाबी गूज (१५०४–१५९४), जॉर्ज टर्बरव्हिल (१५४० ?–१६१० ?), जॉर्ज गॅस्कॉइन (१५२५?–१५७७ ?), व टॉमस टसर (१५२५ ?–१५८०). फेरर्झ व बॉल्डविन यांनी संपादिलेला द मिरर फॉर मॅजिस्ट्रेट्स हा लोकप्रिय कथाकाव्यसंग्रह १५५९ मध्ये प्रकाशित झाला व १६१० पर्यंत त्याच्या अनेक सुधारित आवृत्त्या निघाल्या. या काव्यातील महत्त्वाचा भाग उपोद्घात. तो सॅक्व्हिलने (१५३६–१६०८) लिहिला.
या ग्रंथरूपाने उपलब्ध असलेल्या काव्यापेक्षा या काळातील बॅलड हे लोककाव्य जोमदार व चैतन्यपूर्ण दिसते. बॅलडमध्ये मानवाच्या मूलभूत प्रेरणा व निसर्गप्रेम निर्व्याज, साध्या जोमदार पद्धतीने व्यक्त झाले. बॅलड ऑफ नट्ब्राउन मेड (सु. १५०२), क्लार्क साँडर्स, फेअर अॅन किंवा बिनोरी ह्या बॅलडरचना महत्त्वाच्या आहेत. बॅलडने पुढील भावकवितेचा पाया घातला.
या युगात ‘इंटरल्यूड’ किंवा लघुनाट्य हा नाट्यप्रकार उदयास आला. त्यात सदाचार नाटकातील रूपकात्मक पात्रचित्रणाची वास्तववादी पार्श्वभूमी आणि विनोद व उपरोध यांची सांगड घालण्यात आली. अद्भुत नाटकांचे लेखक अज्ञात होते; परंतु लघुनाट्यांचे बरेचसे लेखक ज्ञात आहेत. हेन्री मेडवॉल (सु. १४८६) हा पहिला इंग्रज ज्ञात नाटककार. त्याचे फल्गेन्स अँड ल्यूक्रीझ हे प्रीतिनाट्य लघुनाट्याचा उत्तम नमुना आहे. जॉन हेवुडने हा नाट्यप्रकार कळसाला पोहोचविला. जॉन बेल (१४९५–१५६३) हा त्याच्या खालोखाल महत्त्वाचा लघुनाट्यकार. त्याचे किंग जॉन व डेव्हिड लिंझीचे सटायर ऑफ थ्री एस्टेट्स हे नीतिबोधपर नाटक ही दोन्ही १५४० च्या आसपासची. सोळाव्या शतकाच्या मध्यावर लघुनाट्याचे लॅटिन धर्तीच्या पाच अंकी सुखात्मिकेत रूपांतर झाले. उदा., निकोलस यूडलचे (१५०५–१५५६) राल्फ रॉयस्टर डॉयस्टर (सु. १५६७) व विल्यम स्टीव्हन्सनचे गमर गर्टन्स नीड्ल (१५७५). दोहोंतले तंत्र लॅटिन वळणाचे असले, तरी पहिल्यात मध्यमवर्गीय शहरी जीवन व दुसऱ्यात ग्रामीण स्वभावाचे नमुने यांचे जिवंत चित्रण आहे. जॉर्ज गॅस्कॉइनच्या द सपोझेस (१५६६) या आरिऑस्तोच्या I suppositi नामक इटालियन सुखात्मिकेच्या भाषांतराने इंग्रजी नाट्यलेखनात आणखी एक प्रवाह आणून सोडला. याच सुमारास सेनीकाच्या लॅटिन शोकात्मिकांची भाषांतरे होऊन या नव्या नाट्यप्रकाराबद्दलच्या कुतूहलाची परिणती टॉमस नॉर्टन (१५३२–१५८४) व टॉमस सॅक्व्हिल यांनी रचिलेल्या पहिल्या इंग्रजी शोकात्मिकेत– द ट्रॅजेडी ऑफ गॉरबडक (१५६१)– झाली. इंग्रजी नाट्यक्षेत्रातील पहिले महत्त्वाचे सुखात्मिकाकार व शोकात्मिकाकार अनुक्रमे लिली (१५५४ ?–१६०६) व किड (१५५८–१५९४) यांचा उदय त्यानंतर काही वर्षांतच झाला. अशा तऱ्हेने या कालखंडातील वाङ्मयीन प्रबोधनास सुरुवात झाली.
लेखक : म. कृ.नाईक
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/17/2020
इंग्रजी वाङ्मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असू...
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत साहित्या...
सातव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या सु. तेरा...
ह्या शतकातील इंग्रजी वाङ्मयेतिहासाचे स्थूलमानाने...