प्रतिभेच्या योगानेच प्रातिनिधिक सत्यांचा जिवंत साक्षात्कार होतो. जे आहे त्यालाच नव्याने गवसलेल्या गोष्टींची नवलाई आणणे किंवा आहे त्याचे वास्तविक स्वरूप विशद करणे म्हणजेच प्रतिभेची नवनिर्मिती. यामुळेच शेक्सपिअरच्या काळातला प्रतिभेचा बेबंद व मुक्त संचार या शतकात नीट आकलन झाला नाही. प्रातिनिधिक सत्याच्याच अभिनव मांडणीवर पुन्हापुन्हा भर देण्यात आला. तथापि शेक्सपिअरप्रभृती जुन्या कवींचे वास्तविक वाङ्मयीन महत्त्व याच शतकातल्या समीक्षेने प्रथम पटवून दिले. टॉमस हॅन्मर, थीओबॉल्ड (१६८८–१७४४), पोप व जॉन्सन यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचे अधिकृत पाठ निश्चित करण्यात खूपच मेहनत घेतली. अशा प्रयत्नांतूनच एखाद्या साहित्यकृतीतील मूळ पाठ चिकित्सकपणे ठरविण्याची तत्त्वे उदयास आली. ह्या संदर्भात डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरकृत नाटकांच्या खंडांसाठी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना फारच मोलाची आहे.
डॉ. जॉन्सन हा ह्या शतकातील समीक्षकांचा मुकुटमणी. त्याचे समीक्षाविषयक सिद्धांत फारच मोलाचे आहेत. समीक्षा केवळ सिद्धांत व पूर्वीची उदाहरणे यांवर अवलंबून ठेवू नये. साहित्यकृतीचे डोळस परीक्षण हाच तिचा खरा आधार असला पाहिजे. समीक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाशी निगडित झाली पाहिजे. लेखकाचे मनोगत लक्षात घेऊन समीक्षा केली पाहिजे, या मतांचे समर्थनच जणू त्याने द लाइव्ह्ज ऑफ द पोएट्स (१७७९–१७८१) ह्या ग्रंथाच केले. लेखकाच्या जीवनाचे त्याच्या साहित्यकृतींच्या समीक्षेमध्ये केवढे महत्त्वाचे स्थान आहे, हे त्याने दाखवून दिले. त्याच्या मते वाङ्मयाचा हेतू जीवनातील अनुभवांचे स्वरूप स्पष्ट करणे हा आहे. सर्वसामान्यांचे अनुभव म्हणजेच खरे नैसर्गिक अनुभव असतात. त्यांचेच चित्रण वाङ्मयात झाले पाहिजे. हा सर्वसाधारणपणे नैतिक दृष्टिकोण आहे, असे म्हणावे लागते. ह्यामुळे जॉन्सनने मिल्टन व डन या कवींवर त्यांचे काव्य नीट समजावून न घेता टीकास्त्र सोडले.
साहित्यकृतींवरील परामर्शात्मक लेखनामुळे टीकाकारांना वाङ्मयीन जगतामध्ये एक आदरयुक्त भीतीचे स्थान प्राप्त झाले. वाङ्मयव्यापार ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती नीट पायावर उभी राहिली पाहिजे, निकोप राहिली पाहिजे, दर्जेदार पाहिजे, असे सांगणाऱ्या समीक्षकांना एक उच्च दर्जा प्राप्त झाला.
अठराव्या शतकातील इंग्रजी भाषेची घडण : १६६० पासूनच इंग्रजी भाषेच्या सुधारणेचा विचार सुरू झाला; कारण इंग्रजीत प्रचंड संख्येने इतर भाषांतून शब्द व वाक्प्रचार येऊन दाखल झाले होते. परंतु इंग्रजीतील सर्वच शब्दांच्या अर्थांची आणि शब्दांतील अक्षरांची व त्यांच्या उच्चारांची निश्चिती व्हायची होती. इंग्रजी व्याकरणाबाबतही गोंधळाचीच परिस्थिती होती. ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्यावर भाषासुधारणेचे युग सुरू झाले. फ्रेंचांप्रमाणे एक संस्था (अकॅडमी) स्थापून हे कार्य करावे असे विचार ड्रायडन, डीफो, स्विफ्टप्रभृती अनेकांनी व्यक्त केले; पण संस्था स्थापून असले काम होत नाही, असे डॉ. जॉन्सनचे मत होते. प्रत्यक्षात अशी संस्था स्थापन झाली नाहीच. शेवटी अठराव्या शतकातील वाचकवर्गाच्या अपेक्षा व त्या पुऱ्या करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्न ह्यांमुळेच इंग्रजी भाषेत व अभिव्यक्तीत इष्ट ती सुधारणा घडून आली. एक सहजसुगम, वैयक्तिक व तऱ्हेवाईक वैशिष्ट्यांपासून मुक्त अशी इंग्रजी शैली निर्माण झाली. सबंध सुशिक्षित समाजाने एकसंधपणे अशा रीतीने भाषा वापरण्याचा इंग्लंडच्या जीवनातील हा पहिला व शेवटचाच कालखंड.
ह्या संदर्भात ‘रॉयल सोसायटी’ने केलेल्या प्रयत्नांचा अवश्य निर्देश हवा. या संस्थेने जाणीवपूर्वक सोप्या, स्वच्छ, ओजस्वी व थोड्या शब्दांत पूर्णपणे अर्थ व्यक्त करणाऱ्या लेखनशैलीचा व भाषणशैलीचा सातत्याने पुरस्कार केला. त्याचप्रमाणे अॅडिसन, स्विफ्ट, स्टीलप्रभृती लेखकांनी इंग्रजी शैलीत आमूलाग्र बदल घडवून आणले. स्विफ्टने योग्य ठिकाणी योग्य शब्द, अशी शैलीची व्याख्या केली आहे. जॉन ह्यूज ह्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या लेखकाने शैलीवर निबंध लिहिला. त्या त्या लेखनप्रकाराला आणि विषयाला अनुरूप अशी शैली असावी, याचाही जाणीवपूर्वक विचार झाला.
शब्दकोश रचण्याचेही अनेक प्रयत्न झाले. सर्वांनीच शब्दांचे अर्थ, वर्णलेखन (स्पेलिंग), उच्चार व व्युत्पत्ती देण्याचा हेतू बाळगला. त्यात डॉ. जॉन्सनचा प्रयत्न भव्य व मूलगामी आहे. त्याने शब्दांचे सोदाहरण अर्थ दिले; पण शब्दोच्चार मात्र दिले नाहीत.
इंग्रजीची व्याकरणेही अनेक झाली. इंग्रजी भाषेचा प्रचलित वापर लक्षात घेऊन व्याकरण रचायचे, का तर्ककर्कश नियमांत भाषा बसवावयाची, ह्या वादात दुसरी विचारसारणी प्रबळ ठरली. शतकाच्या शेवटीशेवटी शब्दांचे वर्णलेखन व उच्चार ह्यांना सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
काव्याची भाषा मात्र कृत्रिम ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला; कारण प्रचलित भाषा काव्यास अनुकूल नसते, असे मत रूढ होते. यासाठी होमर, व्हर्जिल, स्पेन्सर, मिल्टन इत्यादींच्या शैलींचा अभ्यास झाला. साध्या भाषेत लिहिलेल्या काव्याचे विडंबन होण्याची भीती वाटल्यामुळेही काव्याच्या शैलीत कृत्रिमता जोपासण्यात आली. त्यामुळे ठराविक विशेषणे, वाक्प्रचार, वर्णानांचा तोचतोपणा या काव्यात आला.
एकंदर समाज सर्वच बाबतींत सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी ह्या शतकात जो प्रयत्न झाला, त्याचाच एक भाग म्हणजे भाषेला वळण लावणे हा होता. त्यातूनच एकसंध, सहजसुलभ, लोकशिक्षणाला अनुकूल अशी इंग्रजी भाषा निर्माण झाली.
शैलीसाठी विशेष नावाजलेल्या लेखकांचा स्वतंत्र निर्देश करणे आवश्यक आहे. अॅडिसनने नियतकालिक निबंधास योग्य अशा शैलीची जोपासना केली. स्विफ्टने अत्यंत धारदार व ओजस्वी भाषा निर्माण केली. डॉ. जॉन्सनने अभिव्यक्तीमध्ये विद्वत्तेला साजेसे गांभीर्य आणले. त्याच्या लेखनाने इंग्रजी भाषा प्रगल्भ बनली. गोल्डस्मिथच्या भाषेतील प्रसन्न खेळकरपणा जॉन्सनच्या शैलीच्या तुलनेने अधिकच विलोभनीय वाटतो. गोल्डस्मिथच्या निबंधांमध्ये जे लालित्य दिसते ते आजच्या ललितनिबंधाचे पूर्वरूपच म्हणता येईल. गिबनची शैली डौलदार आहे. त्याची पल्लेदार वाक्ये त्याच्या गंभीर आशयाला साजेशीच आहेत. ह्या सर्व व्यक्तिगत वैशिष्ट्यांशिवाय सर्वांच्याच शैलींमध्ये अठराव्या शतकातील इंग्रजीच्या प्रातिनिधिक खुणा दिसतातच. सर्वांत ठळक खूण म्हणजे आपले लिखाण लोकांच्या नित्याच्या भाषेत करण्याची प्रत्येकाची धडपड; कारण ह्या शतकातील सर्वच लेखनाचे उद्दिष्ट प्रामुख्याने लोकशिक्षण हेच होते.
लेखक : रा. भि. जोशी, ; अ. के. भागवत, ; वा. चिं. देवभर,
स्त्रोत : मराठी विश्वकोश