सध्या ‘टेल-एल्-मुकेयीर’ ह्या नावाने इराकमध्ये प्रसिद्ध असलेले प्राचीन सांस्कृतिक केंद्र. लेनर्ड वुली ह्यांनी येथे विस्तृत उत्खनन (१९२२–३४) करून इ. स. पू. चौथ्या सहस्रकापासून ते इ. स. पू. चौथ्या शतकापर्यंतचा येथील सांस्कृतिक इतिहास उजेडात आणला. त्यानंतर ब्रिटिश वस्तुसंग्रहालय व पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ ह्यांच्यातर्फेही येथे विस्तृत प्रमाणावर उत्खनने झाली. अरची पुनर्रचना अनेक वेळा झाली होती; पण शेवटी इ.स.पू. चौथ्या शतकात अरचा पुराने नाश झाला. येथील सर्वांत प्राचीन वस्तीची घरे मातीची असत. तेथील वापरात असलेली मृत्पात्रे मात्र उत्तम व रंगीत असत. येथील वस्ती महापुरात नष्ट झाली होती. वुलीच्या मते गिलगामेश काव्यात आणिबायबलमध्ये वर्णिलेला महापूर तो हाच. येथील उत्खननांत सापडलेली राजांची थडगी सर्वांत महत्वाची आहेत. इ.स.पू. तिसऱ्या सहस्रकात बांधलेल्या ह्या थडग्यांत राजे, राण्या व त्यांचे नोकर ह्यांचे सांगाडे आणि सोन्याचे दागदागिने, मुकुट, भाले, कट्यारी, लाकडी खटारे व बकऱ्यांचे सोन्याचे पुतळे इ. अवशेष सापडले. ह्याशिवाय अनेक देवळे, मातीचे मनोरे, अनेकमजली घरे, शाळा, लेखमुद्रा इत्यादीही सापडल्या. वुलीच्या मते ह्या शहराचे व त्याच्या उपनगरांचे क्षेत्रफळ सु. दहा चौ.किमी. असावे आणि लोकसंख्या सु. अडीच-तीन लाखांच्या आसपास असावी. शहरातील सर्वांत भव्य आणि प्रसिद्ध देवालय म्हणजे चंद्राचे देवालय होय. त्यास सुमेरियन लोक ‘नन्नार’ व अकेडियन लोक ‘सीन’ म्हणत. तसेच एका पिंपाकृती मृत्पात्रावर काही वस्तूंची यादी कोरलेली आढळते. कदाचित हीच वस्तुसंग्रहालयातील पहिली ज्ञात वस्तुसूची असावी, असे म्हटले जाते.
संदर्भ : Woolley, Sir C. L. Ur of the Chaldees, London, 1938.
लेखक : शां. भा. देव
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/4/2020
ल्येझ : बेल्जियममधील लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकाच...
कुंभकोणम् : तमिळनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील...
प. जर्मनीच्या लोअर सॅक्सनी राज्यातील एक शहर व पूर्...
सोव्हिएट, संघराज्याच्या किरगीझीया राज्याची राजधानी...