ब्रंझविक : प. जर्मनीच्या लोअर सॅक्सनी राज्यातील एक शहर व पूर्वीच्या त्याच नावाच्या राज्याची राजधानी. लोकसंख्या २,६१,६६९ (१९७९ अंदाज). हे हॅनोव्हरच्या आग्नेयीस ७६ किमी. अंतरावर ओकर नदीकाठी वसलेले आहे. राज्यातील हे एक प्रमुख औद्योगिक, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून विशेष प्रसिद्ध असून रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांच्या वाहतुकीचे केंद्र आहे.
सॅक्सनीच्या ड्यूक लूडॉल्फ याचा मुलगा ब्रूनो याने इ. स. ८३१च्या सुमारास हे वसविले, असे मानतात. बाराव्या शतकात हेन्री द लायन (११३१-९५) याच्या कारकीर्दीत शहराचा विकास झाला तेराव्या शतकात हॅन्सिअँटिक लीगचे यास सदस्यत्व मिळाले व चौदाव्या-पंधराव्या शतकांत त्याची भरभारट झाली. यूरोपीय धर्मसुधारण आंदोलनात ब्रंझविकवासियांनी प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला; पण पुढे लीगच्या ऱ्हासामुळे व तीस वर्षांच्या युद्धामुळे (१६१८-४८) शहराची पीछेहाट झाली. १६७१ मध्ये हे शहर वॉलफन-ब्यूटलच्या ड्यूकच्या ताब्यात गेले. १८८४ मध्ये ड्यूक पहिला विल्यम निधन पावला. त्याला मूल नसल्याने प्रशियाचा प्रिन्स अँल्बर्ट येथील रीजंट झाला. १९१८ पर्यंत ब्रंझविकच्या सरदार घराण्याची आणि १९४५ पर्यंत ब्रंझविक राज्याची राजधानी येथेच होती. दुसऱ्या महायुद्धात बाँबवर्षावामुळे शहराची अतोनात हानी झाली. युद्धोत्तर काळात याची पुनर्रचना करण्यात आली.
येथे मोटार, सायकली, यंत्रसामग्री, क्विनीन, पियानो, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकसित झालेले आहेत. ब्रंझविक ही जर्मनीतील साखर व्यापाराची भव्य बाजारपेठ समजली जाते. वैज्ञानिक संशोधनासाठीही हे शहर प्रसिद्ध असून येथील तंत्रविद्या विद्यापीठाने (१७४५) शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कार्य केलेले आहे. येथे रोमन व गॉथिक शैलीतील चर्चवास्तू प्रेक्षणीय आहेत. कॅसल चौकातील हेन्री द लायनचे ब्राँझचे भव्य स्मारक (११६६), सेंट ब्लेझिअस कॅथीड्रल, सेंट क्रथरिन चर्च (११७२), नगरभवन (चौदावे-पंधरावे शतक), रिचमंड प्रासाद (१७६८-६९), पदार्थसंग्रहालय व ठिकठिकाणची कारंजी उल्लेखनीय आहेत.
लेखक - मो. शा. शहाणे, /ना. स. गाडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/24/2020
सोव्हिएट, संघराज्याच्या किरगीझीया राज्याची राजधानी...
ल्येझ : बेल्जियममधील लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकाच...
कुंभकोणम् : तमिळनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील...
सध्या ‘टेल-एल्-मुकेयीर’ ह्या नावाने इराकमध्ये प्रस...