कोकंदच्या खानाने १८४६ मध्ये येथे किल्ला बांधला होता. १८६२ मध्ये रशियनांनी हे ताब्यात घेतले. १९२४ मध्ये तुर्कसिब लोहमार्ग सुरू झाल्यानंतर या शहराचा वेगाने विकास झाला. १९२६ मध्ये याला राजधानीचा दर्जा मिळाला. तत्पूर्वी हे ‘पिश्पेक’ या नावाने ओळखले जाई. १९२६ नंतर येथे जन्मलेल्या रशियाच्या लाल सेनेचा कमांडर म्यिखईल व्हस्यील्येव्ह्यिच फ्रून्झ्ये याचे नाव या शहराला देण्यात आले. लोहमार्ग आणि राष्ट्रीय मार्गाचे केंद्रस्थान असलेले हे शहर औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही महत्त्वाचे आहे. जवळच विमानतळही आहे.
आधुनिक नगररचनेनुसार रुंद व वृक्षाच्छा दित रस्ते, प्रशस्त उद्या ने व उपवने आणि शहराच्या पार्श्वभागी बर्फाच्छादित पर्वतशिखरे यांमुळे शहराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. शासकीय इमारती व कम्युनिस्ट पक्षाची कार्यालये यांखेरीज शहरात विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहेत. त्यांपैकी ऑपेरा, बॅले थिएटर प्रसिद्ध असून तेथे रशियन व किरगीझ भाषांतील कार्यक्रम सादर केले जातात. येथे अकॅडेमी ऑफ सायन्सेस (स्था. १९५४), किरगीझ विद्यापीठ (स्था. १९५१) तसेच कृषिक, वैद्यकीय, शिक्षण संस्था, कला संस्था, शिक्षक-प्रशिक्षण संस्था, संशोधन संस्था यांसारख्या शैक्षणिक सोयी आहेत.
फ्रून्झ्येमध्ये १९४१ पर्यंत अन्नधन्याचे उत्पादन व आसमंतात होणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करून चालविलेले छोटे उद्योगधंदे यांवरच अधिक भर होता. त्यानंतर मात्र मांस-संवेष्टन प्रकल्प, कृषिअवजारे, अन्नप्रक्रिया, धातू-उद्योग, मोटारींचे उत्पादन, कापडगिरण्या, बांधकाम साहित्य, कातडी वस्तू, तंबाखू, साबण, आटा वगैरेंसारखे लहान-मोठे उद्योग शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ‘एम्. व्ही. फ्रून्झ्ये’ हा कृषिअवजारांचा निर्मिती कारखाना प्रख्यात आहे.
लेखक - सुलभा कापडी
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/25/2020